नगर जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळणार, दौंड-मनमाड रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण सुरू - Tourism in Nagar district will get a boost, doubling of Daund-Manmad railway line started | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात आठवडाभरात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या वाढदिवसाला अभिष्टचिंतन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजभवनाकडे रवाना

नगर जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळणार, दौंड-मनमाड रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण सुरू

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 2 जून 2021

देशभरातील साईभक्तांना अल्पखर्चात शिर्डीत येण्याची संधी तसेच शिंगणापूर, पंढरपूर व तिरुपती ही देवस्थाने शिर्डी सोबत जोडण्याची किमया त्यामुळे साधली जाईल.

शिर्डी : दक्षिण व उत्तर भारताला जोडणारा देशातील सर्वाधिक महत्त्वाचा रेल्वेमार्ग अशी दौंड-मनमाड रेल्वेमार्गाची ओळख आहे. त्याचे दुहेरीकरण यंदा पूर्ण होणे अपेक्षित होते. कोविड प्रकोपामुळे मुहूर्त टळला.

देशभरातील साईभक्तांना अल्पखर्चात शिर्डीत येण्याची संधी तसेच शिंगणापूर, पंढरपूर व तिरुपती ही देवस्थाने शिर्डी सोबत जोडण्याची किमया त्यामुळे साधली जाईल. पुढील दीड ते दोन वर्षात हे काम पूर्ण होईल. देशातील धार्मिक पर्यटनाला चालना देण्यात महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी हा दुहेरी रेल्वेमार्ग सिद्ध होतो आहे. 

चार वर्षापूर्वी केंद्रातील मोदी सरकारने सुमारे दोन हजार 350 कोटी खर्चाचे हे काम सुरू करण्याचा निर्णय घेतला. निधीचे अडथळे पार करीत कामाने वेग घेतला. मात्र कोविड प्रकोपामुळे हे काम रेंगाळले. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मनमाड ते कोपरगाव या अंतरात समांतर लोहमार्ग अंथरण्याचे तसेच त्यापुढे खडीची गादी अंथरण्याचे काम जवळपास पूर्ण होत आले.

विद्युतीकरण यापूर्वीच पूर्ण झाले आहे. पुलांची कामे सुरू आहेत. पुढील दीड दोन वर्षात काम पूर्ण होऊ शकतील. तथापि, या अंतरातील रेल्वेस्थानकांवर नव्या लाइन व अन्य व्यवस्था कराव्या लागतील. 

सुमारे 247 किलोमीटर लांबीचे हे दुहेरीकरण पूर्ण झाल्यानंतर, लॉकडाउनचा काळ वगळता, सध्या सुरू असलेल्या चाळीस प्रवासी रेल्वे प्रवासी गाड्या व मालगाड्यांची संख्या दुप्पट होईल. वाहतुकीचा वेग वाढेल. प्रवासाचा वेळ किमान तीन तासांनी कमी होईल. सध्याच्या एकेरी मार्गामुळे वाहतूक संथ असते. बऱ्याचदा क्रॉसिंग व मालमोटारी व अन्य प्रवासी गाड्यांमुळे बऱ्याच रेल्वे बाजूला उभ्या कराव्या लागतात. हा खोळंबा लक्षात घेतला तर प्रवासात अडीच ते तीन तासांची बचत होईल. या लोहमार्गावरून कांदा, भाजीपाला, फळे, दूध, धान्य, लोखंड व सिमेंटची मोठी वाहतूक होते. मात्र मार्ग एकेरी व वाहतूक संथ त्यामुळे महत्त्वाचा लोहमार्ग असूनही रेल्वेगाड्यांची संख्या मर्यादित होती. 

दक्षिणेतील भाविकांना शिर्डीला यायला या मार्गाची उपयुक्तता आणखी वाढेल. पुणे, नगर व नाशिक जिल्ह्यांना मोठा फायदा होईल. 

सातत्याने पाठपुरावा करीत होतो

प्रवासी संघटना गेल्या पंचवीस वर्षांपासून दौंड मनमाड रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण व्हावे, यासाठी सातत्याने पाठपुरावा करीत होती. माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील व माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी त्यात महत्त्वाची भूमिका बजावली. आता पुणतांबा ते शिर्डी हा रेल्वेमार्गाचे तातडीने दुहेरी करणे. शिर्डी रेल्वेस्थानकावर रेल्वेगाड्या उभ्या करण्यासाठी सुविधा निर्माण करणे. यासाठी खासदार सदाशिव लोखंडे यांनी पाठपुरावा करायला हवा. 
- रणजित श्रीगोड, अध्यक्ष, प्रवासी संघटना 

 

हेही वाचा...

तीन वर्षाची काव्या खासदार विखेंचा फोटो काढते तेव्हा

 

 

 

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख