आजचा वाढदिवस, मधुकरराव पिचड - Today's birthday, Madhukarrao Pichad | Politics Marathi News - Sarkarnama

आजचा वाढदिवस, मधुकरराव पिचड

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 1 जून 2021

पंचायत समितीचे सभापती झाल्यानंतर पिचड यांनी संपूर्ण तालुका त्यांनी पायी फिरून पिंजून काढला. ग्रामस्थांचे प्रश्न समजून घेतले.

अकोले : भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड (Madhukarrao Pichad) यांचा आज वाढदिवस. अकोले तालुक्यातील आदिवासी पट्ट्यात आधार ठरलेले हे व्यक्तीमत्त्व महाराष्ट्राला परिचित आहे. आज 80 वर्षे पूर्ण करून 81व्या वर्षात पदार्पण करणारा हा "तरुण' नेता कोरोना संकटातही सातत्याने तालुक्‍यातील जनतेच्या आरोग्यासाठी धडपड करताना दिसत आहे. (Today's birthday, Madhukarrao Pichad)

पंचायत समितीचे सभापती झाल्यानंतर पिचड यांनी संपूर्ण तालुका त्यांनी पायी फिरून पिंजून काढला. ग्रामस्थांचे प्रश्न समजून घेतले. 1980मध्ये आमदार झाल्यानंतर तालुक्‍यातील पाणी शेतीला कसे मिळेल, याचे नियोजन केले.

"भंडारदरा चाक बंद' आंदोलन करून तालुक्‍याच्या वाट्याला पाणी देऊन पाणीदार नेता, अशी ओळख मिळवली. पंचायत समितीच्या सभापतिपदापासून सुरू झालेला त्यांचा कार्यकर्तृत्वाचा राजकीय आलेख दिवसेंदिवस उंचावतच गेला. आमदार, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, विरोधी पक्षनेते, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, राज्यातीलच नव्हे, तर देशातील आदिवासींचे नेते म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली. विविध खात्यांचा पदभार सांभाळताना अफाट क्षमतेचे राजकीय नेते, असे बिरुद त्यांना लावले गेले.

अकोले तालुक्‍यात निळवंडे प्रकल्प उभारण्यात, अगस्ती साखर कारखाना, अमृतसागर दूध संघ, कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी-विक्री संघ या संस्थांच्या उभारणीत त्यांचे अतुलनीय योगदान आहे. टिटवी, घोटी-शिळवंडी, बलठण, पिंपळगाव खांड, आंबीत असे छोटे-मोठे 24 जलप्रकल्प उभारले. त्याद्वारे अकोले तालुक्‍यातील उजाड, ओसाड शिवार समृद्धीने फुलविण्याचे काम या "भगीरथा'ने केले. आदिवासी मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. शरद पवार यांनी पिचड यांना आदिवासी विकास मंत्रिपदाची संधी दिली. आदिवासींचा स्वतंत्र अर्थसंकल्पही केला. 

निळवंडे धरणाच्या घळभरणीचे काम सुरू करण्यास प्रकल्पग्रस्तांचा ठाम विरोध होता. त्यामुळे हे काम ठप्प झाले होते. ज्या प्रकल्पग्रस्तांना जमिनी नको होत्या, त्यांना हेक्‍टरी आठ लाख 87 हजार 300 रुपये दराने रोख स्वरूपात सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय झाला. हे अनुदान स्वीकारण्यास बहुतेक खातेदारांनी मान्यता दिल्याने पुनर्वसन प्रश्‍नाची तीव्रता कमी झाली. प्रकल्पग्रस्तांना पाणीपरवाने देण्याचेही मान्य करण्यात आले. पिचड यांच्या वाढदिवसाच्या दिवशी निळवंडेच्या घळभरणीच्या कामास प्रारंभ झाला. धरणात पाणी साठविण्याचा मार्ग मोकळा झाला. 

भोजदरीच्या 132 केव्ही वीज उपकेंद्राच्या प्रस्तावास शासनाने मंजुरी दिली. या केंद्रामुळे तालुक्‍यातील पश्‍चिम भागातील वाड्या-वस्त्यांवर वीज पोचली. समशेरपूर, कोतूळ, सांगवी, पाडाळणे या उपकेंद्रांनाही मंजुरी मिळाली. खावटी कर्जाची पद्धत बंद करून आदिवासींच्या बॅंक खात्यांमध्ये रकमा जमा करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय पिचड यांनी घेतला. त्यामुळे हा "पिचड पॅटर्न' राज्यात सुरू केल्याची भावना आदिवासी आमदार व्यक्त करीत आहेत. 

जिल्ह्यातील व तालुक्‍यातील पुढारी 1980मध्ये पिचड यांना तिकीट मिळू नये म्हणून प्रयत्न करीत होते. मात्र पिचड थेट दिल्लीत पोचले. तेथून त्यांचे तिकीट निश्‍चित झाले. वसंतदादा पाटील यांनी पिचड यांना मंत्रिपदाची संधी दिली. "भंडारदरा चाक बंद' आंदोलनाच्या वेळी सरकारने त्यांच्यावर खटले भरले. ते मागे घेण्याचे काम वसंतदादा यांच्यामुळेच झाले. स्वाभिमानी नेता म्हणून त्यांची ओळख आहे. 

गेली चार दशके अकोल्याच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, सहकार, शेतीजीवनाशी एकरूप झालेले पिचड 81व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. शरीर थकले असले, तरी मानाने ते थकलेले, खचलेले नाहीत. आजारपणाशी यशस्वी लढा देत अकोल्याच्या समाजजीवनाशी आजही एकरूप आहेत. कोविड काळात तालुक्‍यातील जनतेला उपचार मिळावेत, यासाठी ते बसल्या जागेवरून प्रयत्न करीत आहेत. चिरंजीव वैभव पिचड त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करीत आहेत. 

 

हेही वाचा...

कोरोनामुळे पालक गमावलेल्या मुलांसाठी योजना

 

 

 

 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख