तिसगाव पाणी योजना 25 दिवसांपासून बंद : अक्षय कर्डिलेंनी दिला हा इशारा - Tisgaon water scheme closed for 25 days: Akshay Kardile will agitate | Politics Marathi News - Sarkarnama

तिसगाव पाणी योजना 25 दिवसांपासून बंद : अक्षय कर्डिलेंनी दिला हा इशारा

मुरलीधर कराळे
शुक्रवार, 26 मार्च 2021

महाविकास आघाडीच्या कारभाराला जनता आता वैतागली आहे. जनतेचे कुठलेही प्रश्‍न मार्गी लागत नाहीत. त्यांचे एक एक कारनामे आता बाहेर येत आहेत.

नगर : वीज बिल न भरल्याने नगर व तालुक्यातील 29 गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेची वीज खंडीत करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या 25 दिवसांपासून या या गावांना पाणी नाही. येत्या चोवीस तासात वीजपुरवठा सुरू न केल्यास पांढरीपूल येथे आंदोलन केले जाईल, असा इशारा भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस अक्षय कर्डिले यांनी दिला आहे.

याबाबत कर्डिले म्हणाले, की महाविकास आघाडीच्या कारभाराला जनता आता वैतागली आहे. जनतेचे कुठलेही प्रश्‍न मार्गी लागत नाहीत. त्यांचे एक एक कारनामे आता बाहेर येत आहेत. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी यांच्याजवळ वेळ नाही. गेल्या एक वर्षापासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे अनेकांच्या हाताचे काम गेले आहे. त्यांच्यावर बेरोजगारीचे संकट कोसळले.

शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नाही. भर उन्हाळ्यामध्ये या सरकारने तिसगाव पाणी योजनेच्या नगर तालुका व पाथर्डी तालुक्‍यातील २९ गावांचा पाणीपुरवठा वीज बिल न भरल्यामुळे गेल्या २५ दिवसांपासून बंद केला आहे. या मतदान संघाचे आमदार प्राजक्त तनपुरे हे ऊर्जा राज्यमंत्री असतानाही नागरिकांवर पाण्यासाठी वनवन भटकावे लागत आहे. मंत्र्यांना जनतेच्या प्रश्नाची कुठलीही जाण नसल्यामुळे गेल्या दीड वर्षापासून राहुरी मतदारसंघातील जनता यांना वैतागली आहे. जनतेला पाणी देऊ शकत नसणारे मंत्री काय कामाचे? असा सवाल नागरिकांमधून होत आहे, असा आरोप त्यांनी केला.

शेतकरी आर्थिक संकटात असताना त्यांचे पिण्याचे पाणी बंद करणे, हे धोरण योग्य नाही. माजीमंत्री शिवाजी कर्डिले या मतदारसंघाचे दहा वर्षे प्रतिनिधीत्व करीत असताना एकदाही वीजबिलोपाटी ही योजना बंद झाली नाही. तिसगाव पाणी योजना येत्या २४ तासात सुरु न केल्यास पांढरीचा पूल येथे पाण्यासाठी जनआंदोलन करु, असा इशारा भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणीस अक्षय कर्डिले यांनी दिला आहे.

 

 

हेही वाचा...

कारेगावच्या निवडणुकीचा वाद न्यायालयात 

श्रीरामपूर : कारेगाव ग्रामपंचायत निवडणुकीचा वाद न्यायालयात गेला असून, निवडणुक प्रक्रियेत सदोष असल्याने निवडणूक रद्द करण्याची मागणी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी बाळासाहेब पटारे, योगेश उंडे यांच्यासह 13 उमेदवारांनी केली आहे.

निवडणुकीचा वाद येथील दिवाणी न्यायालय तथा निवडणूक न्यायाधिकरण यांच्यासमोर गेला असून, ग्रामपंचायत अधिनियमानुसार दाखल झालेल्या तक्रार याचिकेत निवडणुक निर्णय अधिकारी, ग्रामपंचायतीसह निवडून आलेल्या 13 व निवडणूकीच्या रिंगणातील अन्य तीन उमेदवार असे एकूण 19 व्यक्तींना प्रतिवादी केल्याची माहिती पटारे यांनी दिली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख