"माझा जीव, माझी जबाबदारी' म्हणण्याची वेळ!  राधाकृष्ण विखे पाटील यांची टीका - Time to say "My life, my responsibility"! Criticism of Radhakrishna Vikhe Patil | Politics Marathi News - Sarkarnama

"माझा जीव, माझी जबाबदारी' म्हणण्याची वेळ!  राधाकृष्ण विखे पाटील यांची टीका

आनंद गायकवाड
शनिवार, 8 मे 2021

सरकारची व्यवस्था अपयशी ठरते तेव्हा समाजातील तरुण धैर्याने पुढे येऊन सामान्य माणसाला आधार देण्याचे काम करतात. हीच खरी ईश्वरसेवा आहे. कोविड संकटाची तिसरी लाट येण्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

संगमनेर : "महाविकास आघाडी सरकारच्या घोषणा आणि नियोजन फक्त कागदावर आहे. सरकारची कोणतीच यंत्रणा मदतीला नसल्याने, जनतेवर आता "माझा जीव, माझीच जबाबदारी' असे म्हणण्याची वेळ आली आहे,'' अशी टीका भाजप नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe) यांनी केली. (Time to say "My life, my responsibility"! Criticism of Radhakrishna Vikhe Patil)

जनतेला सल्ले देण्यापेक्षा "प्रवरे'प्रमाणे व्यवस्था उभी केली असती तरी कोविड संकटात तालुक्‍यातील जनतेला दिलासा मिळाला असता, असा टोलाही त्यांनी लगावला. तालुक्‍यातील निमोण येथील पुष्पगंध सेवाभावी संस्था आणि ग्रामपंचायतीतर्फे सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटरच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. 

ते म्हणाले, ""सरकारची व्यवस्था अपयशी ठरते तेव्हा समाजातील तरुण धैर्याने पुढे येऊन सामान्य माणसाला आधार देण्याचे काम करतात. हीच खरी ईश्वरसेवा आहे. कोविड संकटाची तिसरी लाट येण्याची चर्चा आता सुरू झाली आहे. आताच रुग्णांना बेड मिळत नाहीत, इंजेक्‍शने जादा दराने खरेदी करण्याची वेळ आली आहे, तर काही खासगी रुग्णालयांत कंपाउंडरच सल्ले देऊन रुग्ण आणि त्याच्या नातेवाइकांना घाबरवून सोडत आहेत. या संकटात लोकांना मदत करून आधार देण्याची गरज होती; पण मंत्री फक्त दौरे करून काळजी न करण्याचे सल्ले देतात. सरकारी यंत्रणेचे सोडा; मंत्र्यांनी स्वतःहून नागरिकांसाठी काय केले? सरकारची इच्छाशक्ती संपली आहे. त्यामुळेच सामाजिक संस्था आणि तरुण कार्यकर्ते जनतेला आधार देण्यासाठी पुढे आले आहेत.'' 

हेही वाचा...

जामखेडमध्ये जनता कर्फ्यू

गावागावांतून उभी राहिलेली कोविड सेंटरच आता सामान्य माणसाला आधार ठरतील, अशी आशा व्यक्त करून, या कोविड सेंटरला सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली. सेवाभावी संस्थेचे संदीप देशमुख, सरपंच दगडू घुगे, सरपंच शरद पवार, भाजपच्या किसान आघाडीचे अध्यक्ष सतीश कानवडे, गंगाधर कांडेकर, त्र्यंबक गोमासे, कैलास पाटील, साहेबराव घुगे, गोरख घुगे, रोहिणी तपासे, शिवराम इलग, एकनाथ शेळके या वेळी उपस्थित होते. 

सामान्यांची वणवण सुरूच 

प्रवरा ग्रामीण रुग्णालयाने राज्यातील पहिले कोविड रुग्णालय सुरू केले. डॉ. विखे पाटील फाउंडेशन आणि शिर्डी संस्थानच्या रुग्णालयातून एक हजार बेडची व्यवस्था झाली. प्रवरा शिक्षण संस्थेनेही पाचशे बेडचे कोविड रुग्णालय सुरू केले. प्रवरेच्या धर्तीवर संगमनेर तालुक्‍यातील संस्थांच्या माध्यमातून हे काम होणे अपेक्षित होते; मात्र ते न झाल्यानेच सामान्य माणसाला उपचारांसाठी वणवण करावी लागल्याची खंत आमदार विखे यांनी व्यक्त केली. 

 

 

 

 

Edited By - Murlidhar Karale

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख