जे मला सोडून गेले, त्यांचा पराभव झाला, पवारांचा पिचडांना टोला  - Those who left me were defeated, Pawar tore the pitches | Politics Marathi News - Sarkarnama

जे मला सोडून गेले, त्यांचा पराभव झाला, पवारांचा पिचडांना टोला 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 24 जानेवारी 2021

तालुक्‍यातील रस्ते, पर्यटनविकासाबाबत पालकमंत्री मुश्रीफ यांनी माझ्यासमक्ष तुम्हाला आश्वासन दिले आहे

अकोले, ता. 24 : "" मधुकर पिचड यांना मंत्री केले, पक्षाचा प्रदेशाध्यक्ष, विरोधी पक्षनेता केले, मात्र ते मला सोडून गेले व पराभूत झाले. येथील पहिल्या परिवर्तन सभेतच लोकांच्या मनात काय चालले, ते मला समजले होते.'' असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला. 

""आपण 1980 मध्ये 56 आमदारांचा विरोधी पक्षनेता होतो. कामानिमित्त इंग्लडला गेलो, तर इकडे 50 आमदार फुटले. सोबत फक्त 6 आमदार राहिले, मात्र मी स्थिर होतो. सोडून गेलेल्या 50 पैकी 48 आमदार पराभूत झाले. पिचड यांच्याबाबतही तेच झाले.'' असेही श्री. पवार म्हणाले. 

शेंडी येथे यशवंतराव भांगरे यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पवार बोलत होते. ते म्हणाले, ""लोणीला नववीत असताना सायकलवर एकदा रंधा फॉल पाहिला, तेव्हापासून हा भाग माझ्या स्मरणात आहे. या भागासाठी काही तरी करणे आवश्‍यक आहे. पवनचक्कीसाठी स्थानिकांनी जमिनी देणाऱ्या शेतमालकांची मुले नोकरीवर घेतली का, त्यांना लाभ मिळाला का, याचा अभ्यास करून माझ्याकडे या. आपण संबंधित मालकाला जाब विचारू. तालुक्‍याचा विकास झाला नाही, हे ऐकून मला खाली मान घालावी लागते.'' 

अगस्ती साखर कारखाना 35 कोटींचा, त्यावर कर्ज 300 कोटींचे असल्याचे सांगण्यात आले. मी "वसंतदादा शुगर'चा अध्यक्ष आहे. अल्कोहोल निर्मिती, वीजनिर्मिती, सीएनजी निर्मिती करून "अगस्ती'समोरील समस्या दूर करू; परंतु झारीतील शुक्राचार्य ओळखून त्यांना बाजूला करा,'' असा टोला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पिचड यांचे नाव न घेता लगावला. 

तालुक्‍यातील रस्ते, पर्यटनविकासाबाबत पालकमंत्री मुश्रीफ यांनी माझ्यासमक्ष तुम्हाला आश्वासन दिले आहे. ते पूर्ण करण्यात त्यांना काही अडचण आल्यास आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी बोलू, अशी ग्वाही पवार यांनी दिली. 

भांगरे यांनाही चिमटा 
कार्यक्रमाच्या निमंत्रणपत्रिकेत आमदार डॉ. किरण लहामटे यांचे नाव नव्हते. याबाबत समजताच पवार यांनी यापुढे विकासकामांसाठी, निवडणुकीसाठी एकत्र व समन्वयाने काम होणे आवश्‍यक असल्याचा चिमटा भांगरे यांना काढला. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख