विश्वास बसणार नाही पण,कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचे येथे आहे मंदिर !

स्वामींनी आयुष्यात कधीही पैशाला स्पर्श केला नाही. ध्यानधारणा, कीर्तन, प्रवचन, वाचन आणि कॉंग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी आपले आयुष्य खर्ची घातले.
 विश्वास बसणार नाही पण,कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचे येथे आहे मंदिर !

शिर्डी ः देश पातळीवर कॉंग्रेस पक्षाचे नेतृत्व कुणी करावे याबाबतचा सध्या सुरू असलेला वाद समजा मिटला तरी मतमतांतरे सुरूच रहातील. परंतु याच कॉंग्रेससाठी अनेकांनी आपली आयुष्य वेचली आहेत.

नगर जिल्ह्यात कोणे एकेकाळी भगवी वस्त्रे परिधान करून व हातात कमंडलू घेऊन फिरणाऱ्या स्वामी सहजानंद भारती या उच्चविद्याविभुषित संन्याशाने या पक्षाच्या वाढीसाठी आपले आयुष्य समर्पित केले. 

त्यांच्या अध्यात्मिक प्रभावाने भारावलेल्या लोकांनी श्रीरामपूर तालुक्‍यात नाऊर येथे गोदातिरी त्यांचे समाधी मंदिर उभे केले. एखाद्या राजकीय पक्षाच्या जिल्हाध्यक्षांचे मंदिर उभारले जाण्याची ही देशातील एकमेव घटना असावी. 

देशात राजकीय पक्षांना यश मिळवायचे असेल तर त्यांनी येथील हजारो वर्षापासून चालत आलेल्या आस्था आणि चांगल्या परंपरांचा आदर करायला हवा. घराणेशाही व भ्रष्टाचारपासून दूर रहायला हवे. राजकारणाला, भक्तीमार्गाची वाट वर्ज्य नाही, याचे भान ठेवायला हवे, असाच संदेश हे मंदीर सर्वच राजकीय पक्षांच्या धुरिणांना देत उभे आहे. स्वामीजींचे भक्तगण त्यांच्या समाधीची उर्जा देणारे स्थान म्हणून पूजा करतात. 

शेकडो वर्षांपासून समानतेचा आणि माणुसकीचा संदेश देणा-या वारकरी संप्रदायासारख्या विविध परंपरासोबत येथील सामान्य जनतेची नाळ घट्ट जुळली आहे. याच वाटेवरून चालणा-या स्वामीजींनी त्याकाळात कॉंग्रेसच्या राजकारणासाठी अध्यात्म आणि राजकारण यांची सुरेख सांगड घातली. हा महात्मा गांधींचा मार्ग होता. त्यापासून सध्याची कॉंग्रेस भरकटली. 

त्याकाळी महात्मा गांधी आणि विनोबा भावेंसारखे नेते गीतेवरील प्रवचने आणि प्रार्थनेला सर्वाधिक महत्व देत. आठ वर्षापूर्वी या पक्षाच्या पराभवाच्या मीमांसा करण्यासाठी नेमलेल्या ए. के. ऍन्टोनी यांच्या समितीने हाच मुद्दा अधोरेखित केला. कॉंग्रेस बहुसंख्याकापासून दूर जात असल्याचे निरीक्षण नोंदविले. हे लक्षात घेतले तर या मंदिराचे महत्व लक्षात येते. 

स्वामी कोठून आले कोणालाच माहिती नाही 
स्वामीजींचे विविध भाषांवर प्रभुत्व होते. त्यांनी कधीही आपण कुठून आलो ते सांगितले नाही. त्यावेळी कॉंग्रेस पक्षाचे तरूण नेते शंकरराव कोल्हे यांच्या आग्रहावरून स्वामीजी पंडीत नेहरूंना भेटण्यासाठी दिल्लीला गेले. खास बाब म्हणून त्यांच्याकडून संजीवनी सहकारी साखर कारखाना उभारणीची परवानगी मिळविली. मग त्याप्रित्यर्थ या भागाला स्वामी सहजानंदनगर असे नाव देण्यात आले. 

पुढे त्यांचे समाधी मंदिर उभारण्यात ज्येष्ठ नेते कोल्हे यांनी पुढाकार घेतला. काळाचा महिमा असा की, आज कोल्हे यांचे वारस भारतीय जनता पक्षात आहेत.

स्वामींनी आयुष्यात कधीही पैशाला स्पर्श केला नाही. ध्यानधारणा, कीर्तन, प्रवचन, वाचन आणि कॉंग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी आपले आयुष्य खर्ची घातले. स्वातंत्र्यासाठी कारावास भोगलेल्या स्वामीजींचे पंधरा ऑगस्ट 1971 रोजी निधन झाले. त्यांचे समाधी मंदिर कॉंग्रेससह इतही पक्षांतील कार्यकर्ते, नेत्यांना त्यागाची परंपरा शिकवत आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com