Mohan wagh 2.jpg
Mohan wagh 2.jpg

कृषी विद्यापीठाच्या कुलसचिवांचे तडकाफडकी निलंबन

कृषी विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच कुलगुरूंनी कुलसचिवांचे निलंबन केले आहे. त्यांच्यातील वादाचे व निलंबनाचे कारण गुलदस्तात आहे.

राहुरी : महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलसचिव मोहन रामभाऊ वाघ (Mohan Wagh) यांना सोमवारी (ता. 3) सायंकाळी पाच वाजता तडकाफडकी निलंबित करण्यात आले. तसे पत्र विद्यापीठ प्रशासनाला प्राप्त झाले. कुलसचिवपदाचा कारभार महानंद माने (Mahanand Mane) यांच्याकडे सोपविण्यात आला. कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांनी निलंबनाचा आदेश काढला. (Sudden suspension of registrar of agricultural university)

कृषी विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच कुलगुरूंनी कुलसचिवांचे निलंबन केले आहे. त्यांच्यातील वादाचे व निलंबनाचे कारण गुलदस्तात आहे. कुलगुरू डॉ. पाटील यांनी कामकाजाची सूत्रे हाती घेण्यापूर्वी कृषी विद्यापीठातील कुलसचिव, नियंत्रक व प्रशासनातील अधिकारी यांच्यात समन्वय राहिला नव्हता. कुलसचिव मोहन वाघ यांच्या काळात प्रशासनाचे कामकाज सुरळीतपणे सुरू झाले होते. 

दरम्यान, वाघ यांची एक वर्षासाठी कुलसचिवपदी प्रतिनियुक्ती झाली आहे. त्यांचा कार्यकाळ येत्या जूनमध्ये पूर्ण होणार आहे. त्यास अवघे काही दिवस शिल्लक असताना अचानक निलंबनाची कारवाई झाल्याने, विद्यापीठ वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. 

कृषी सचिवांकडे अपील..! 

कुलसचिव वाघ यांनी राज्याच्या कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यांच्याकडे तत्काळ अपील केले. त्यात म्हटले आहे, की महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या सेवेत प्रतिनियुक्तीवर पाच जून 2020 पासून कार्यरत आहे. सरकार व विद्यापीठाच्या हिताला बाधा येईल, असे कोणतेही नियमबाह्य काम केले नाही, तरी कुलगुरूंनी निलंबनाचे आदेश दिले. वास्तविक, नियुक्ती अधिकारी व शिस्तभंगविषयक प्राधिकारी आपण स्वतः आहात. त्यामुळे निलंबनाचा आदेश आपल्या स्तरावरून रद्द करण्यात यावा. 

हेही वाचा...

कुलगुरूंनी अधिकाराचा गैरवापर केला : दहातोंडे 

राहुरी : महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलसचिव मोहन वाघ यांच्या निलंबनाची कारवाई चुकीची आहे. कुलगुरूंनी अधिकाराचा गैरवापर केला आहे. याविरोधात राज्यपाल व राज्य सरकारकडे दाद मागणार आहे, अन्यथा न्यायालयात धाव घेऊ, असे शेतकरी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी दहातोंडे यांनी सांगितले. 

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दहातोंडे यांनी म्हटले आहे, की महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांनी कुलसचिव वाघ यांच्या निलंबन आदेशात कोणतेही कारण सांगितले नाही. वाघ यांच्यावर जाणीवपूर्वक कारवाई केली. त्यांनी अधिकाराचा गैरवापर केला. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कारवाई झाली पाहिजे. त्यासाठी शेतकऱ्यांसमवेत राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री दादा भुसे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. त्यांनी दखल घेतली नाही, तर न्यायालयात दाद मागणार आहे. 

हेही वाचा...

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com