नगरमध्ये अशी आली वेळ ! स्मशानभूमीवर ताण, इतर तीन ठिकाणी होणार अंत्यसंस्कार - Such a time has come in the city! Tensions at the cemetery, funerals will take place in three other places | Politics Marathi News - Sarkarnama

नगरमध्ये अशी आली वेळ ! स्मशानभूमीवर ताण, इतर तीन ठिकाणी होणार अंत्यसंस्कार

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 16 एप्रिल 2021

शहरातील नालेगाव अमरधाम स्मशानभूमीत कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्यांवर रोज मोठ्या प्रमाणात अंत्यविधी करण्यात येत आहेत. अंत्यविधीसाठी अनेक वेळा नातेवाइकांना प्रतीक्षा करावी लागत आहे.

नगर : नगर शहर मुख्यालय असल्यामुळे जिल्ह्यासह बीड येथील अत्यवस्थ कोरोनाबाधित रुग्ण उपचारासाठी येथे येत आहेत. या रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्यावर नगर शहरातील नालेगाव अमरधाममध्ये अंत्यविधी करण्यात येत आहेत. तेथे जागा अपुरी पडत असल्याने केडगाव, रेल्वेस्थानक परिसर, नागापूर येथील अमरधाममध्येही अंत्यविधीची सुविधा उपलब्ध करून देणार असल्याची माहिती महापौर बाबासाहेब वाकळे यांनी दिली. 

नगर शहरातील नालेगाव अमरधामची पाहणी महापौर वाकळे यांनी काल केली. त्यावेळी ते बोलत होते. भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, महापालिकेचे सभागृह नेते रवींद्र बारस्कर, अजय चितळे, बाळासाहेब जगताप, ऋग्वेद गंधे, अमरधाम येथील व्यवस्थापक स्वप्नील कुऱ्हे आदी उपस्थित होते. 

वाकळे म्हणाले, "शहरातील नालेगाव अमरधाम स्मशानभूमीत कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्यांवर रोज मोठ्या प्रमाणात अंत्यविधी करण्यात येत आहेत. अंत्यविधीसाठी अनेक वेळा नातेवाइकांना प्रतीक्षा करावी लागत आहे. रुग्णवाहिकांच्या लागलेल्या रांगांची छायाचित्रे, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 

या पार्श्‍वभूमीवर नालेगाव अमरधाम स्मशानभूमीची पाहणी करून, अंत्यविधी करण्यासाठी नेमणूक केलेल्या संस्थेच्या संचालकांशी त्यांनी चर्चा केली. मृतांमध्ये वयोवृद्धांची संख्या मोठी आहे. याचबरोबर नगरसह अन्य जिल्ह्यांतील कोरोना रुग्णांचाही मृतांत समावेश आहे. मात्र, नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेणे गरजेचे आहे. 

शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून, कोरोनावर मात करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. विनाकारण शहरामध्ये फिरून निष्पाप नागरिकांचा जीव धोक्‍यात घालू नये, असे महापाैर बाबासाहेब वाकळे यांनी सांगितले.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख