अनेकांचे जीव वाचविले, त्यांचे आशिर्वाद नक्की मिळतील ! हजारे यांच्याकडून तहसीलदारांचे काैतुक - The struggle for oxygen is important: thousands | Politics Marathi News - Sarkarnama

अनेकांचे जीव वाचविले, त्यांचे आशिर्वाद नक्की मिळतील ! हजारे यांच्याकडून तहसीलदारांचे काैतुक

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 29 एप्रिल 2021

पारनेर तालुक्‍यातील कोरोना रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी ऑक्‍सिजन आणण्यासाठी केलेली धडपड खूप महत्त्वाची आहे. अनेकांचे जीव वाचल्यानंतर त्यांचे आशीर्वाद तुम्हाला नक्कीच मिळतील.

राळेगणसिद्धी : पारनेर तालुक्‍यातील कोरोना रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी ऑक्‍सिजन आणण्यासाठी केलेली धडपड खूप महत्त्वाची आहे. अनेकांचे जीव वाचल्यानंतर त्यांचे आशीर्वाद तुम्हाला नक्कीच मिळतील, अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी तहसीलदार ज्योती देवरे यांच्या कामाचे कौतुक केले.

तालुक्‍याची काळजी घेत असताना तुम्ही तुमची स्वतःचीही काळजी घ्या, असा सल्लाही हजारे यांनी त्यांना दिला. पारनेर तालुका आणखी पाच दिवसांसाठी बंदचे आदेश काढल्यानंतर तहसीलदार ज्योती देवरे यांनी बुधवारी (ता. 28) येथे येऊन हजारे यांची भेट घेतली. त्यांना पारनेर तालुक्‍यात कोरोना आपत्ती काळात सुरू असलेल्या कामांविषयीची माहिती दिली. त्यावेळी अण्णा बोलत होते.

ते म्हणाले, की कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांनी "लॉकडाउन'चे नियम पाळावेत, मास्क लावणे, सोशल डिस्टन्सचे पालन करणे, नियमित हात धुणे या शासनाच्या सूचनांची अंमलबजावणी केली पाहिजे. कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घेण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी घरी न थांबता जवळच्या कोव्हिड सेंटरमध्ये उपचार घ्यावेत, असे ते म्हणाले. 

अण्णा हजारे यांनी देशाच्या हितासाठी संघर्ष केला. वेळोवेळी आंदोलने केली. त्यांची काळजी घेणे ही आपल्या सर्वांचेच कर्तव्य आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात अण्णांना कुणीही भेटू नका, असे आवाहन तहसीलदार देवरे यांनी या वेळी उपस्थितांना केले.

गावातील ज्या लोकांचे अत्यंत महत्त्वाचे काम असेल त्याच लोकांनी सुरक्षित अंतर ठेवून अण्णांना भेटू द्यावे, अशा सूचनाही त्यांनी अण्णांच्या सुरक्षा रक्षकांना दिल्या. 

 

हेही वाचा...

गावोगावी कोविड सेंटर उभारा 

टाकळी ढोकेश्वर : "कोविड महामारीत संसर्ग रोखण्याच्या अनुषंगाने आणि बाधितांवर उपचार होण्याच्या अनुषंगाने, माणसे जिवंत ठेवण्याची भावना कर्जुलेकरांच्या मनात निर्माण झाली. त्यातून उभारण्यात आलेले कोविड सेंटर कौतुकास्पद आहे. गावोगावी कोविड सेंटर उभारल्यास या महामारीस अटकाव निर्माण होईल,'' असा आशावाद नाशिक विभागाचे महसूल उपायुक्त गोरक्ष गाडीलकर यांनी व्यक्त केला. 

कर्जुले हर्या (ता. पारनेर) येथे श्री हरेश्‍वर ग्रामीण विकास ट्रस्ट आणि ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या शंभर बेडच्या कोविड सेंटरला उपायुक्त गाडीलकर यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.

तहसीलदार ज्योती देवरे, गटविकास अधिकारी किशोर माने, आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे उपस्थित होते. गावकऱ्यांच्या सहभागातून आणि शासनाच्या सहकार्याने उभारण्यात आलेले हे कोविड सेंटर आणि येथील सुविधांबाबत तहसीलदार ज्योती देवरे यांनी समाधान व्यक्त केले. गावासह परिसरातील नागरिकांना त्रास, संसर्ग अथवा लक्षणे आढळली तर त्यांनी या कोविड सेंटरमध्ये दाखल व्हावे, असे आवाहन तहसीलदार ज्योती देवरे यांनी केले. सरपंच संजीवनी आंधळे, उपसरपंच मिनीनाथ शिर्के, सेवा संस्थेचे उपाध्यक्ष नितीन आंधळे, अशोक आंधळे, देवेंद्र उंडे उपस्थित होते. 
 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख