पुतळा शिवाजी चौक परिसरातच होणार ! नगराध्यक्षा आदिक यांनी ठणकावून सांगितले

आपण विकासकामे करूनच बिले काढली आहेत. स्वच्छता ठेकेदाराने काम बंद केले. त्यानंतर पालिकेकडे स्वच्छतेचे साहित्य नसल्याने ते खरेदी केले. ते झाडू व सादिल खर्चात दाखविले.
Anuradha Aadik.jpg
Anuradha Aadik.jpg

श्रीरामपूर : नगरपालिकेतील बोगस बिलांसह विरोधकांनी केलेले आरोप चुकीचे असून, त्यांच्या कार्यकाळात झालेल्या बोगस कामांच्या बिलांच्या फाईली साडेचार वर्षांपासून आपल्या टेबलवर पडून आहे. ज्या बिलांवरुन आरोप झाले, अद्याप ते मंजूर केलेली नसल्याची माहिती नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी दिली. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा शिवाजी चौक परिसरातच होणार असल्याचे देखील नगराध्यक्षा आदिक यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

या वेळी नगरसेवक राजेंद्र पवार, रवी पाटील, दीपक चव्हाण, मुक्तार शहा, प्रकाश ढोकणे, कलीम कुरेशी, अल्तमश पटेल, नगरसेविका वैशाली चव्हाण, दीपक चरण चव्हाण उपस्थित होते.

उपनगराध्यक्ष करण ससाणे यांच्यासह काँग्रेस नगरसेवकांनी पत्रकार परिषदेत सत्ताधारी गटावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर नगराध्यक्षा आदिक यांनी काल नगरपालिकेत पत्रकार परिषद घेवून विरोधकांचे आरोप फेटाळुन लावले.

नगराध्यक्षा आदिक म्हणाल्या, की आपण विकासकामे करूनच बिले काढली आहेत. स्वच्छता ठेकेदाराने काम बंद केले. त्यानंतर पालिकेकडे स्वच्छतेचे साहित्य नसल्याने ते खरेदी केले. ते झाडू व सादिल खर्चात दाखविले. त्यात बोगस बिले काढण्याचा प्रश्‍न येत नाही. मात्र मागील सत्ताधार्‍यांनी कामे न करता बोगस बिले काढली. त्यातील अनेक बिले साडेचार वर्षांपासून आपल्या टेबलवर पडून आहे. त्याची रक्कम सुमारे ८० हजाराहून अधिक आहेत.

विरोधकांना कामे न करता बोगस बिले काढण्याचा अनुभव आहे. त्यातील बारकावे त्यांना माहिती आहे. प्रभाग १२ मध्ये बगीचा केला जाणार असून, त्या ठिकाणी गोविंदनगर नाव देण्याचा ठराव केला आहे. त्यामुळे त्या परिसरातील इतर भागाचे नाव बदलण्याचा प्रश्‍न येत नाही. विरोधकांनी सोशल मिडीयाद्वारे त्याबाबत अफवा पसरविल्याने नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोनामुळे ऑनलाइन सभा घेण्याच्या राज्य सरकारच्या सुचना आहे. सभा ऑफलाइन घेण्यासाठी विरोधकांनी जिल्हाधिकारी व मुख्याधिकार्‍यांकडे मागणी केली होती. त्यांच्याकडून कोणतीही सूचना अथवा आदेश न आल्याने सभा ऑनलाइन घेतली. त्यात १८ ते २० सदस्यांनी सहभाग नोंदविल्याचे आदिक यांनी सांगितले.

श्रीरामपुरात साडे २२ कोटीची विकासकामे

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्याचा सन २०१५ मध्ये पालिकेच्या सभेत ठराव केला आहे. पुतळ्याचा प्रस्ताव टाऊन प्लॅनिंग विभागाकडून नामंजूर झाला. शिवाजी चौकात पर्यायी जागा निर्माण करण्यासाठी नव्याने प्रस्ताव पाठविण्यासंदर्भात सभेत मंजुरी घेतली. सदरचा पुतळा शासनाच्या चौकटीत बसवून शिवाजी चौक परिसरातच बसविला जाणार आहे. तसेच बेलापूर रस्त्यावरील वेशीला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव दिले जाईल. कॅनॉलजवळ जिरेटोप उभारून सुशोभिकरण केले. तर प्रत्येक प्रभागात अनेक विकासकामे झाली. असून सुमारे २२ कोटी ५० लाख रुपयांच्या निधीची शहर परिसरात विकासकामे झाली आहे.

- नगराध्यक्षा अनुराधा आदिक

विरोधकांचा रडीचा डाव

विरोधकांच्या काळात केवळ दहा मिनिटात सभा संपायची. कोणीही बोलायचे नाही, असा प्रकार सुरु होता. शहरातील विकासकामे झपाट्याने व दर्जेदार होत असल्याने विरोधक रडीचा डाव खेळत आहे. यांना कुठलेही काम शिल्लक नसल्याने विरोधक पालिकेपुढे विनाकारण आंदोलने करीत आहे. विरोधी गटाचे अतिक्रमणाचे व्यवसाय सर्व शहराला माहिती आहे. सार्वजनिक मुताऱ्या पाडून तेथे गाळे बांधले गेले. रस्त्यावर मोठमोठी बांधकाम करून अतिक्रमण केली. हा प्रकार थांबवल्यामुळे विरोधक वैतागले असल्याने शहरात खोट्या अफवा पसरविल्याचा आरोप नगराध्यक्षा आदिक यांनी केला आहे.
 

हेही वाचा..

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com