आमदार काळे यांचे नाव अध्यक्षपदासाठी पुढे येताच कोपरगावात अतिषबाजी

उद्या विधी व न्याय विभागाकडून अध्यक्ष व विश्वस्तांच्या नावाची यादी अधिकृतपणे जाहिर केली जाईल.
आमदार काळे यांचे नाव अध्यक्षपदासाठी पुढे येताच कोपरगावात अतिषबाजी
Aushutosh kale.jpg

शिर्डी : साईसंस्थानच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने कोपरगावचे आमदार आशुतोष काळे (Ashutosh Kale) यांच्या नावास आज सायंकाळी हिरवा कंदिल दाखविल्याचे समजते. ‘सकाळ'ने गेल्या शुक्रवारच्या (ता. १८) अंकात ते अध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार आहेत, असे वृत्त प्रसिध्द केले होते. आज त्यावर एका अर्थाने शिक्कामोर्तब झाले. काळे यांचे नाव पक्षाने नक्की केल्याचे वृत्त समजताच, कोपरगाव शहरासह तालुक्यातील अनेक गावात त्यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी करीत आपला आनंद साजरा केला. उद्या विधी व न्याय विभागाकडून अध्यक्ष व विश्वस्तांच्या नावाची यादी अधिकृतपणे जाहिर केली जाईल. (As soon as MLA Kale's name comes up for the post of president, there is exaggeration in Kopargaon)

काळे हे कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. नगर जिल्ह्यातील आघाडीच्या कारखान्यापैकी एक असलेल्या या कारखान्याने उसाला सर्वाधिक भाव देणाऱ्या अन्य कारखान्यांच्या बरोबरीने भाव देण्याची परंपरा जपली. कारखान्यावर कुठलेही कर्ज नाही. शेतकरी व कामगारांची थकीत देणी नाहीत. उत्तम व्यवस्थापन कौशल्याच्या आधारे त्यांनी कारखाना व उस उत्पादकांचे हित जपले. अमेरिकेतून आभियांत्रिकीची पदवी प्राप्त केलेले केलेले काळे मागील विधानसभा निवडणुकीत तरूण वयात आमदार झाले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या गुड बुक मधील युवा आमदार म्हणून ते राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वर्तुळात परिचित आहेत. त्यांची कामाची पध्दत व माजी खासदार कै. शंकरराव काळे यांचा वारसा लक्षात घेऊन पवार यांनी त्यांची यापूर्वी रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. आता साईसंस्थानचे अध्यक्षपदासाठी त्यांच्या नाव निश्चित करून पक्षाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविण्याचा निर्णय घेतला.

साईसंस्थानवर विश्वस्त मंडळ नियुक्त करावे, असे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने यापूर्वीच दिले होते. आदेशाकडे दुर्लक्ष झाल्यास अवमानतेची कारवाई करण्याचा तोंडी इशारा न्यायालयाने मागील सुनावणीच्या वेळी दिला होता. उद्या (ता. २३) यावरील जनहित याचिकेची सुनावणी होणार आहे. त्यात याबाबत राज्य सरकारला खुलासा करून त्याबाबत न्यायालयात भूमिका मांडावी लागणार होती. हे लक्षात घेऊन आज तातडीने या हालचाली करण्यात आल्या.

दरम्यान, आज महाविकास आघाडीच्या समन्वय समितीच्या बैठकीत आज साईसंस्थान राष्ट्रवादीकडे तर पंढपूरचे विठ्ठल रूख्मिणी देवस्थान कॉंग्रेसकडे या विभागणीवर एकमत झाले. साईसंस्थान उपाध्यक्षपदासाठी शिवसेना आग्रही असल्याचे कळते. उपाध्यक्षपदी शिवसेनेकडून रविंद्र मिर्लेकर यांचे नाव नक्की झाले आहे.

फटाके वाजवून आनंदोत्सव

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठनेते खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष मंत्री जयंत पाटील यासर्वांनी आमदार आशुतोष काळे यांना साईसंस्थानचे अध्यक्ष या नात्याने काम करण्याची संधी देण्याचे नक्की केले. हे कळताच कोपरगाव विधानसभा मतदारसंघात फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा झाला. समाजहिताला प्राधान्य देण्याचा आजोबा माजी खासदार कै. शंकरराव काळे, वडील आमदार अशोक काळे यांचा वारसा ते पुढे चालवतील.
- बाबासाहेब कोते, अध्यक्ष गौतम बॅंक, कोपरगाव

हेही वाचा..

Edited By - Murlidhar Karale

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in