... तर पुण्यातील एकाही बंधाऱ्यात पाणी जावू देणार नाही, राहुल जगतापांनी फुंकले रणसिंग - So water will not be allowed to flow in any of the dams in Pune, said Rahul Jagtap | Politics Marathi News - Sarkarnama

... तर पुण्यातील एकाही बंधाऱ्यात पाणी जावू देणार नाही, राहुल जगतापांनी फुंकले रणसिंग

संजय आ. काटे
मंगळवार, 11 मे 2021

पिंपळगावजोगे धरणातील पाण्यावर न्यायालयाने स्थगिती दिल्याने अडचणीत भर पडली आहे. मात्र आम्हाला जर पाणी मिळाले नाही, तर पुणे जिल्ह्यातील एकाही बंधाऱ्यात पाणी सोडू देणार नाही.

श्रीगोंदे : कुकडीच्या डाव्या कालव्यातून ठरलेले शेतीचे आवर्तन  सोडण्यासाठी आम्ही पाठपुरावा करीत आहोत. सरकारही त्याबाबत सकारात्मक आहे. मात्र पिंपळगावजोगे धरणातील पाण्यावर न्यायालयाने स्थगिती दिल्याने अडचणीत भर पडली आहे. मात्र आम्हाला जर पाणी मिळाले नाही, तर पुणे जिल्ह्यातील एकाही बंधाऱ्यात पाणी सोडू देणार नाही, त्यासाठी वाट्टेल तो संघर्ष करण्याची तयारी असल्याचा इशारा राष्ट्रवादीचे नेते, माजी आमदार राहुल जगताप (Rahul Jagtap) यांनी दिला. (... So water will not be allowed to flow in any of the dams in Pune, said Rahul Jagtap)

जगताप यांनी याबाबत न्यायालयात याचिका दाखल केली असून, पुणे जिल्ह्यातील बंधाऱ्यात सोडले जाणाऱ्या बेकायदा पाण्याबाबत त्यांनी थेट आक्षेप घेतला आहे.

जगताप म्हणाले, न्यायव्यवस्थेवर आमचा पुर्ण विश्वास आहे. शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय उद्या होईल. मात्र ज्या पध्दतीने जुन्नर, पारनेर, श्रीगोंदे, कर्जत व करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचा पाणी अडविण्याचा प्रयत्न होत आहे तो दुर्देवी आहे.
कुकडीच्या पाण्यात श्रीगोंदेकरांना कायमच संघर्ष करावा लागतोय असे सांगत जगताप म्हणाले, आमच्याकडे सोडण्यात येणाऱ्या पाण्याबाबत सगळेच नियम दाखवून मोकळे होतात. मात्र आम्ही त्यांच्याकडे काय सुरु आहे याची वाच्यता करीत नाही. या संघर्षाला कंटाळून मी मध्यंतरी पुणे जिल्ह्यातील नद्यांवर असणाऱ्या बंधाऱ्यात टंचाई काळात पाणी सोडले जावू नये यासाठी लवादाकडे याचिका दाखल केली होती.

हेही वाचा..

रक्षक बनला भक्षक

सदर याचिकेचा निकाल आपल्या बाजूने लागतानाच बंधाऱ्यात पाणी सोडू नये असे आदेश झालेले आहेत. मात्र तरीही असे पाणी सोडलेच जात आहे. आता आमच्या पाण्यावर जर कुणी टाच आणणार असेल तर आम्हीही त्या बंधाऱ्यांमध्ये पाणी सोडू देणार नाही. नगरकरांचे कुणी नाक दाबणार असले तर आम्हीही पुणेकरांचे तोंड दाबू शकतो हे सगळ्यांनीच लक्षात ठेवले पाहिजे. कुकडीच्या पाण्याबाबत अजूनही सकारात्मक व चर्चेतून मार्ग निघावा यासाठी आपण प्रयत्नशिल असून याप्रश्नी राष्ट्रवादीचे नेते योग्य निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे असेही जगताप म्हणाले.

 

 

 

 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख