परिस्थितीच अशी बदलली की फडणविसांऐवजी शरद पवार प्रमुख पाहुणे ठरले... - situation so changed that Sharad Pawar become chief guest instead of Fadnavis | Politics Marathi News - Sarkarnama

परिस्थितीच अशी बदलली की फडणविसांऐवजी शरद पवार प्रमुख पाहुणे ठरले...

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 23 जानेवारी 2021

अकोल तालुक्यातील राजकारणाची दिशा ठरविणारा कार्यक्रम असल्याची चर्चा... 

अकोले : राष्ट्रवादीचे अध्यक्ष व खासदार शरद पवार हे अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असल्याने राजकीय घडामोडींची चर्चा सुरू आहे.

जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर त्यांचा हा दौरा महत्वाचा मानला जात आहे. यासोबतच त्यांच्या उपस्थितीत अकोले तालुक्यात शेतकरी मेळावा होत आहे. ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांच्या कट्टर विरोधक अशोक भांगरे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमास पवार महाविकास आघाडीतील नेत्यांसह उपस्थित राहणार आहेत.

महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर पवारांचा रविवारी (ता. 23 जानेवारी) होत असलेला पिचडांच्या मतदारसंघातील हा पहिलाच दौरा असल्याने ते पिचडांसंबंधी काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे. मुख्य म्हणजे ज्या कार्यक्रमासाठी पवार येत आहेत, तो कार्यक्रम पूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार होता. मात्र, मधल्या काळात संयोजकांनीच पक्षांतर केल्याने पाहुणेही बदलण्यात आले. तर आमदार डॉ.किरण लहामटे यांना पुढच्या पंचवार्षिक चे टेन्शन आले असल्याची जोरदार तालुक्यात चर्चा सुरू झाली आहे. मेळावा यशस्वितेसाठी अशोक भांगरे कुटुंबीय घरोघरी संपर्क करत आहेत.

पिचड समर्थकांना राष्ट्रवादीमध्ये घेण्यासाठी बरीच फिल्डींग लावण्यात आली होती. मात्र त्यात यश आले नाही. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिचड यांनी भेट घेताच सर्व सुरळीत झाल्याची चर्चा आहे. तरी देखील या कार्यक्रमात कोण बाजी मारतो यावर पुढील काहीसे राजकारणाची गणिते ठरणार आहेत

शरद पवार यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम होणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी दिली. पवार सकाळी साडेदहा वाजता शेंडी (ता. अकोले) येथे हॅलिकॉप्टरने येणार आहेत. तेथे (कै.) यशवंतराव भांगरे यांच्या पुतळ्याचे अनावरण त्यांच्या हस्ते होईल. त्यानंतर नगर शहरातील गुलमोहर रस्ता भागातील सुरभी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्‌घाटन दुपारी दोन वाजता, तसेच औद्योगिक वसाहतीजवळील ऍपल हॉस्पिटलचे उद्‌घाटन दुपारी तीन वाजता त्यांच्या हस्ते होईल. सायंकाळी चार वाजता हॅलिकॉप्टरने त्यांचे मुंबईकडे प्रयाण होईल.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख