लंकेंच्या या "अदे'वर श्रीगोंद्याची तरुणाई "फिदा' - Shrigonda's youth "fida" on this "ade" of Lanka | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक
कोल्हापूर : खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनास सुरवात

लंकेंच्या या "अदे'वर श्रीगोंद्याची तरुणाई "फिदा'

संजय आ. काटे
बुधवार, 28 एप्रिल 2021

हाकेला धावणाऱ्या या शेजारच्या तालुक्‍यातील आमदारावर येथील अनेक गावांतील कार्यकर्ते फिदा असून, लंके हेही वेळ काढून श्रीगोंद्यात येऊन या कार्यकर्त्यांमध्ये ऊठ-बस करीत असल्याचे चित्र आहे. 

श्रीगोंदे : तालुक्‍यातील राजकीय कार्यकर्ते आपापल्या नेत्यांच्या राजकारणासाठी वेडे आहेत. आपल्या नेत्यावर कुणी टीका केली, की लगेच विरोधात उत्तरे देणाऱ्या येथील विशेषत: आघाडीचे कार्यकर्ते सध्या मात्र पारनेरचे आमदार नीलेश लंके यांच्या प्रेमात पडले आहेत.

हाकेला धावणाऱ्या या शेजारच्या तालुक्‍यातील आमदारावर येथील अनेक गावांतील कार्यकर्ते फिदा असून, लंके हेही वेळ काढून श्रीगोंद्यात येऊन या कार्यकर्त्यांमध्ये ऊठ-बस करीत असल्याचे चित्र आहे. 

जिल्ह्यातील तरुण कार्यकर्त्यांचा तालुका असलेल्या श्रीगोंद्यात गेल्या काही वर्षांत तरुण चेहऱ्यांचा वावर कमी झाला आहे. माजी आमदार राहुल जगताप यांची एक टर्म झाल्याने व त्यांनी गेल्या वेळी विधानसभेच्या रिंगणातून माघार घेतल्याने, काही प्रामाणिक तरुणांचे त्यांच्याभोवतीचे घोळके कमी झाल्याचे जाणवते.

आमदार बबनराव पाचपुते यांचे पुत्र विक्रमसिंह व पुतणे साजन हे दोघे अजूनही राजकारणात थेट सामील होत नसल्याचे वास्तव आहे. एके काळी आमदार पाचपुते यांना त्यांच्या तरुणाईत जनतेने डोक्‍यावर घेतले होते. दिवंगत नेते शिवाजीराव नागवडे यांच्याविषयी तरुणांमध्ये राजकारणविरहित मोठा आदर राहिला, तर कुंडलिकराव जगताप हे कायम तरुणांच्या पाठीवर हात ठेवून बोलणारे व समस्या सोडविणारे नेते ठरल्याने, त्यांच्याकडे तरुणाईचा असणारा ओढा नंतर राहुल जगताप यांच्यासोबत राहिला.

कॉंग्रेस नेत्या अनुराधा नागवडे यांच्याविषयी महिला व तरुण मुलींमध्ये मोठे आकर्षण आहे. राष्ट्रवादीचे घनश्‍याम शेलार व बाबासाहेब भोस यांची मुले सक्रिय राजकारणात नाहीत. बाळासाहेब नाहाटा यांच्याभोवती तरुणांचा घोळका दिसतो; मात्र कायमस्वरूपी ते तरुणांमध्ये राहत नसल्याचा आक्षेप आहे. दत्तात्रेय पानसरे यांच्याकडे ही हातोटी असली, तरी शिक्षणसम्राट असल्याचा फटका त्यांना तरुणाई जवळ करताना बसतो, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. 

दरम्यान, सध्याच्या तरुणांना कधीही उपलब्ध होणारा व पाठीवर हात ठेवून "लढ' म्हणणारा नेता आकर्षित करतो. तालुक्‍यात असे नेते असले, तरी सध्या मात्र पारनेरचे आमदार नीलेश लंके यांची भुरळ श्रीगोंदेकरांवर जास्त पडली आहे. अनेक गावांतील तरुणांची व्हॉट्‌सऍप स्टेटस त्यांच्यावरच असतात. किरकोळ ते मोठ्या कार्यक्रमांना ते हजेरी लावत तरुणांना मदत करीत असल्याने, त्यांना "श्रीगोंद्यात या,' असे निरोप रोज सुरू आहेत. लंके यांचा भलेही येथील तरुणांना आधार वाटत असला, तरी तालुक्‍यातील नेत्यांसाठी ही अडचणीची बाजू आहे, हेही लक्षात घ्यावे लागेल. कारण, ते कमी पडत असल्याचे त्यातून प्रकर्षाने पुढे येत आहे. 

 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख