जिल्हा बॅंकेत शेळकेंकडून चांगले काम होईल : हजारे यांना विश्वास - Shelke will do a good job in District Bank: Hazare believes | Politics Marathi News - Sarkarnama

जिल्हा बॅंकेत शेळकेंकडून चांगले काम होईल : हजारे यांना विश्वास

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 9 एप्रिल 2021

नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला मोठी परंपरा आहे. सॉलिसिटर गुलाबराव शेळके वकील असूनदेखील त्यांनी बॅंक उत्तम चालविली. महानगर बॅंकेचे त्यांनी वटवृक्षात रूपांतर केले. तोच वारसा उदय शेळके पुढे चालवतील.

राळेगणसिद्धी : "बॅंकिंग क्षेत्रात काम करण्याचा अनुभव असल्याने शेळके यांच्याकडून चांगले काम होईल. वडिलांचे उत्तम संस्कार असल्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतही त्यांच्याकडून चांगले कामकाज होईल,'' असा आशावाद ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष उदय शेळके यांच्याबाबत व्यक्त केला. 

अध्यक्ष झाल्यानंतर उदय शेळके यांनी हजारे यांची राळेगणसिद्धी येथे जाऊन भेट घेत तब्येतीची विचारपूस केली. दोघांमध्ये तब्बल एक तास चर्चा झाली. प्राचार्य दिलीप देशमुख व वन समितीचे सचिव सुनील हजारे उपस्थित होते.

हजारे म्हणाले, ""नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला मोठी परंपरा आहे. सॉलिसिटर गुलाबराव शेळके वकील असूनदेखील त्यांनी बॅंक उत्तम चालविली. महानगर बॅंकेचे त्यांनी वटवृक्षात रूपांतर केले. तोच वारसा उदय शेळके पुढे चालवतील.'' यावेळी दोघांनी गुलाबराव शेळके यांच्या आठवणींना उजाळा दिला. 

जिल्हा बॅंकेत कर्जदार आणि ठेवीदार या दोघांचे हित पाहणार असून, कर्जदारांना कर्जफेडीची सवय लावणार आहे. व्यावसायिक बॅंकांप्रमाणेच जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून सुविधा देऊन तरुणांनाही जिल्हा बॅंकेकडे आकर्षित करणार असल्याची माहिती शेळके यांनी दिली.

जिल्ह्यातील सर्व सेवा संस्थांचे लवकरच संगणकीकरण एकाच प्रणालीद्वारे होईल. कोरोनाचे संकट असतानाही प्रशासनास योग्य सूचना दिल्याने, या वर्षी चांगली वसुली झाली. याशिवाय बॅंकेच्या विविध योजनांची माहिती शेळके यांनी हजारे यांना दिली. 

 

हेही वाचा...

निर्बंधाचे पालन न करणारांवर कारवाई करा

राहुरी : प्रत्येक गावात कोरोना ग्राम दक्षता समिती सक्रिय करा. त्यात तलाठी, ग्रामसेवक, पोलिस पाटील, सरपंच, आशा सेविका यांचा समावेश असावा. कोरोना निर्बंधांचे पालन करीत नाहीत. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा. प्रसंगी पोलिसांची मदत घ्या. अशा सक्त सूचना तहसीलदार फसियोद्दीन शेख यांनी वीस गावांतील प्रतिनिधींच्या बैठकीत दिल्या.

आज (शुक्रवारी) मांजरी येथे कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणासाठी वीस गावांमधील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलिस पाटील, वैद्यकिय अधिकारी, आशा सेविका, मुख्याध्यापक यांच्या संयुक्त बैठकीत तहसीलदार शेख बोलत होते. प्रांताधिकारी दयानंद जगताप, गट विकास अधिकारी गोविंद खामकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपाली गायकवाड उपस्थित होते.

तहसीलदार शेख म्हणाले, "पंधरा पेक्षा अधिक कोरोना बाधित आढळले. तेथे कंटेनमेंट झोन करून, परिसर सील करा. कोरोना रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींच्या त्वरित रॅपिड टेस्ट करा. प्रशासनाला सहकार्य करीत नसलेल्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करा. कोरोना ग्राम दक्षता समितीने जबाबदारीने काम करावे."

गटविकास अधिकारी खामकर म्हणाले, "शनिवार-रविवार पूर्ण बंद पाळा. विनाकारण गर्दी करू नका. मास्कचा वापर करा. कोरोना नियंत्रणात येईल." अशोक विटनोर यांनी आभार मानले.
 

 

Edited By- Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख