शरद पवारांना आमदार जगताप भेटले, महापाैराबाबत काय झाली चर्चा

लहान मुलांना कोरोनाचा धोका होण्याची शक्यता गृहित धरून उपाययोजना करण्याची मागणी जगताप यांनी केली असली, तरीया दरम्यान नगरच्या महापाैरपदाबाबत काय करायचे, अशी चर्चा झाली नसेल, तर नवलच.
Pawar and jagtap.jpg
Pawar and jagtap.jpg

नगर : मुंबई येथे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची आमदार संग्राम जगताप यांनी काल भेट घेतली. कोरोनाविषयक नगरची परिस्थिती सांगितली. लहान मुलांना कोरोनाचा धोका होण्याची शक्यता गृहित धरून उपाययोजना करण्याची मागणी जगताप यांनी केली असली, तरी या दरम्यान नगरच्या महापाैर पदाबाबत काय करायचे, अशी चर्चा झाली नसेल, तर नवलच. (Sharad Pawar met MLA Jagtap, what happened about Mahapaira)

नगरचे महापाैरपद सध्या भाजपकडे आहे. यापूर्वी ते राष्ट्रवादीच्याच मदतीने भाजपला मिळाले होते. मुदत संपत आल्याने आता राजकीय खलबते सुरू झाले आहेत. काॅंग्रेसकडे पुरेशे नगरसेवक नाहीत. केवळ पाच नगरसेवकाच्या बळावर काॅंग्रेसचे कार्यकर्ते महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नावाचा वापर करून या पदासाठी दावा ठोकत आहेत.

शिवसेनेच्या नेत्यांनी मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून फिल्डिंग लावली आहे. महापाैरपदाची माळ आपल्याच गळ्यात अशा अविर्भावात शिवसेनेचे नेते `हवेत` आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेतील दोन गटांमध्येच या पदासाठी स्पर्धा लागल्याने दोन्ही गटांत अवमेळ असल्याचे चित्र सध्या पाहण्यास मिळत आहे.

भाजपला एकदा संधी मिळाली, त्यामुळे त्यांचा विषयच नाही. राज्यात महाआघाडी सरकारमध्ये शिवसेना, काॅंग्रेस व राष्ट्रवादी हे एकत्र आहेत. त्यामुळे आघाडीचा धर्म तिनही पक्षांना पाळावा लागणार आहे. साहजिकच भाजपचा पत्ता या वेळी कट होणार आहे.

महापाैरपदी कोणाला बसवायचे, हे सर्वस्वी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार संग्राम जगताप हेच ठरविणार आहेत. शिवसेना किंवा काॅंग्रेसला महापाैरपद हवे असले, तरी जगताप यांनी शिक्कामोर्तब केल्याशिवाय त्यांना हालचाल करता येणार नाही, हे निश्चित आहे.

जगताप यांनी पवार यांच्या भेटीत महापाैरपद कोणाला द्यायचे, याबाबत चर्चा केली असणार, हे निश्चित. ऐनवेळी हे पद राष्ट्रवादीच्याच नगरसेवकाच्या गळ्यात पडण्याबाबत अंतीम निर्णय झाला का, याबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये जोरदार चर्चा रंगू लागली आहे.

कोरोनाविषयक झाली चर्चा

जगताप यांनी पवार यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. कोरोनाच्या प्रादुर्भातील अनुषंगाने आरोग्य सुविधा व त्यांची उपलब्धता याबाबत त्यांनी माहिती दिली. तसेच जिल्ह्यात मागील काळात मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढ झाल्याने उपचारासाठी नगर तालुक्यातील रुग्ण नगरशहरात येत असल्याने शहरातील आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण आल्याचेही त्यांनी सांगितले. परिणामी अनेक रुग्णांना बेड उपलब्ध होण्यास अडचणी निर्माण झाल्या, त्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा व्हेंटिलेटरची कमतरता इत्यादी बाबी प्रकर्षाने जाणवल्या होत्या, ही वस्तुस्थिती शरद पवार यांना सांगितली.

तज्ज्ञांच्या मते जुलै व ऑगस्ट महिन्यात तिसरी लाट येण्याची शक्यता आहे, या काळात मोठ्या प्रमाणात लहान मुले बाधित होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, त्यामुळे खबरदारी म्हणून प्रशासनामार्फत अद्यावत मुबलक प्रमानात सर्व सोयी सुविधायुक्त ऑक्सिजन कोविड सेंटर तालुका स्तरावर उभारण्याबाबत आपण शासनास सूचित करावे, जास्तीत जास्त प्रमाणात कोरोना प्रतिबंधक लस मिळावी, अशी विनंतीही आमदार जगताप यांनी पवार यांच्याकडे केली.

सुप्रिया सुळेंचीही घेतली भेट

खासदार सुप्रियाता सुळे यांना भेटून अमृत योजने अंतर्गत सावेडी भुयार गटार योजना मंजूर करण्याबाबत केंद्र स्तरावर मदत करण्याबाबत मागणी आमदार जगताप यांनी केली. तसेच उच्चतंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांना भेटून नगर शहर हे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने या ठिकाणी शासकीय अभियांत्रिकी पदवी महाविद्यालय मंजुर करण्याबाबत मागणी केली.

हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com