संगमनेर नगरपालिका ! थोरातांची सत्ता हिसकावण्यासाठी भाजपचा एल्गार

संगमनेर शहर व तालुक्यावर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या काँग्रेस पक्षाचा एकछत्री अंमल आहे.
Thorat and vikhe.jpg
Thorat and vikhe.jpg

संगमनेर : आगामी नोव्हेंबर महिन्यात संगमनेर नगरपालिकेतील १४ प्रभागांसाठी राजकीय चुरस रंगणार आहे. या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे आधिपत्य असलेल्या या नगरपालिकेतील सत्ता हस्तगत करण्यासाठी भाजप सरसावली आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनुषंगाने काल शहरातील भाजप कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली. या वेळी योग्य नियोजन केल्यास नगरपालिकेत १७ नगरसेवक विजयी होऊ शकतात, असे भाकीत जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी केले.

संगमनेर शहर व तालुक्यावर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या काँग्रेस पक्षाचा एकछत्री अंमल आहे. अनेक वर्षांपासून नगरपालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांची सत्ता अबाधित राखण्यात काँग्रेसला यश आले. नगरपालिकेतही मोठ्या संघर्षानंतर मेधा भगत यांच्या रूपाने भाजपची केवळ एक नगरसेविका निवडून आली. स्थानिक पातळीवरही विरोधक म्हणून भाजप निष्क्रिय ठरला.

बैठकीत काल विविध विषयांवर चर्चा झाल्याचे शहराध्यक्ष ॲड. श्रीराम गणपुले यांनी सांगितले. काँग्रेसचा एकछत्री अंमल व बालेकिल्ला असलेल्या संगमनेर नगरपालिकेत योग्य व नियोजनबद्ध प्रयत्न केल्यास १७ जागांवर भाजपचे नगरसेवक विजयी होण्याचे गोंदकर यांचे भाकीत सर्वेक्षण व राजकीय आडाख्यांवर आधारित असले, तरी कार्यकर्त्यांचे मनोधैर्य वाढविणाऱ्या या भाकितानुसार नगरपालिकेवर झेंडा फडकवण्यासाठी भाजप काय चमत्कार करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या विधानामुळे राजकीय निरीक्षक व जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत. या सर्व घडामोडीत आमदार राधाकृष्ण विखे पाटील किती लक्ष घालतात, यावरच भाजपच्या जागांचे भवितव्य ठरणार आहे.

हेही वाचा..

थोरात कारखान्याच्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात

संगमनेर : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्यातर्फे सुरू असलेल्या नव्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाच्या उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. यातून येत्या तीन चार दिवसांमध्ये ऑक्सिजन निर्मिती सुरू होणार आहे.

या कामाची पहाणी संचालक इंद्रजित थोरात, चंद्रकांत कडलग, मीननाथ वर्पे, भाऊसाहेब शिंदे, अनिल काळे, विनोद हासे, उपाध्यक्ष संतोष हासे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, किरण कानवडे आदींनी केली.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. मानवी जीवनासाठी आवश्यक असलेल्या प्राणवायू निर्मितीसाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने नवीन ऑक्सिजन प्लॅंट निर्मितीचा निर्णय घेतला. त्यानुसार तैवानमधून यासाठीची अत्याधुनिक यंत्रसामुग्री आयात करण्यात आली आहे.

या प्रकल्पातून दररोज अकराशे किलो ऑक्सिजनची निर्मिती होणार आहे. या प्लांटच्या उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले असून येत्या तीन, चार दिवसांमध्ये शासकीय तपासणी पूर्ण झाल्यानंतर या प्लॅंटमधून ऑक्सिजनचे नियमित उत्पादन सुरू होणार आहे. यामुळे संगमनेर शहर व परिसरातील रुग्णालये आणि कोरोना रुग्णांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे. 

हेही वाचा..

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com