पोलिसांना पाहताच दरोडेखोर पळाले, अखेर एक पकडला, राहुरी तालुक्यातील घटना - The robbers fled on seeing the police, finally catching one, the incident in Rahuri taluka | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

पोलिसांना पाहताच दरोडेखोर पळाले, अखेर एक पकडला, राहुरी तालुक्यातील घटना

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 21 जुलै 2021

मध्यरात्री साडेबारा वाजता देवळाली प्रवरा रस्त्यावर दरोडेखोरांची टोळी फिरत असल्याची माहिती पोलिसांच्या गस्तीपथकाला मिळाली.

राहुरी : टाकळीमियाँ येथे मंगळवारी (ता. २०) मध्यरात्री एक वाजता गस्तीवरील पोलिसांना पाहताच दरोडेखोरांच्या टोळीने पोबारा केला; मात्र पोलिसांनी पाठलाग करून एकास अटक केली. राहुरी पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सलीम महंमद हनीफ शेख (रा. गुलशनबाद, मालेगाव, जि. नाशिक) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. अनोळखी चार आरोपी पसार झाले.

टाकळीमियाँ येथे सोमवारी (ता. १९) मध्यरात्री साडेबारा वाजता देवळाली प्रवरा रस्त्यावर दरोडेखोरांची टोळी फिरत असल्याची माहिती पोलिसांच्या गस्तीपथकाला मिळाली. सहायक फौजदार पोपट टिक्कल, कॉन्स्टेबल सचिन ताजणे, गणेश फाटक, लक्ष्मण खेडकर यांच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. बाळासाहेब जगन्नाथ निमसे (रा. टाकळीमियाँ) यांच्या घरासमोर पाच संशयित पोलिसांना आढळले. पोलिसांचे वाहन पाहताच, अंधाराचा फायदा घेऊन चार जण पसार झाले. एका आरोपीला पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले. त्याच्याकडून स्क्रू-ड्रायव्हर, मिरचीपूड व एक लोखंडी टॉमी, असे दरोड्याचे साहित्य पोलिसांनी हस्तगत केले. पोलिस कॉन्स्टेबल गणेश फाटक यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

हेही वाचा..

वरिष्ठ महिला अधिकाऱ्याच्या विनयभंगप्रकरणी गुन्हा दाखल

शेवगाव : येथील वरिष्ठ महिला अधिकाऱ्याचा फोन, संदेशाद्वारे व प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन विनयभंग केल्याप्रकरणी एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संबंधित महिला अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी विशाल विजयकुमार बलदवा (रा. मारवाड गल्ली, शेवगाव) याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.

याबाबत फिर्यादीत म्हटले आहे, की शेवगाव येथे शासकीय पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मे २०२० पासून संबंधित व्यक्ती कार्यालयात चकरा मारून व फोनद्वारे ओळख वाढवत आहे. कार्यालयात येऊन ‘मी अवैध व्यवसाय सुरू ठेवण्यास मदत करतो, त्यातून येणारे पैसे तुम्हास पोच केले जातील,’ असे म्हणून जवळीक साधण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, ‘कार्यालयीन काम असेल तेवढेच बोला; इतर वैयक्तिक बाबींची चर्चा करू नका,’ असे त्यास फोनवरून सांगण्याचा प्रयत्न केला असता त्याने अश्लील भाषा वापरली. त्यानंतर कार्यालयीन कामकाजात माझ्याविरोधात वरिष्ठांकडे वेगवेगळे अर्ज देऊन त्रास देऊ लागला. उपोषण व इतर आंदोलनांच्या नावाखाली माझ्याविरुद्ध विचित्र मजकूर सोशल मीडियावर पाठवून माझी व कुटुंबाची बदनामी केली. पती व मुलीबद्दल फोनवर अश्लील व अर्वाच्य भाषेत बोलून, पतीला संदेश पाठवून मानसिक त्रास दिला.

 

हेही वाचा..

यशवंतराव गडाखांची कोरोनावर मात

 

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख