आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना खासदार लोखंडे यांनी सुनावले खडे बोल - In the review meeting, MP Lokhande told the officials to speak up | Politics Marathi News - Sarkarnama

आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना खासदार लोखंडे यांनी सुनावले खडे बोल

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 16 एप्रिल 2021

कठीण काळात प्रत्येकाचा जीव महत्त्वाचा आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तालुक्‍याचा आढावा घेऊन त्याप्रमाणे इंजेक्‍शन व औषधांची मागणी नोंदवावी.

संगमनेर : सरकारी रुग्णालयांत बेड शिल्लक नसल्याने, एखादा रुग्ण खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला, ही त्याची चूक आहे का, असा प्रश्‍न उपस्थित करून, प्रत्येक रुग्णाचा जीव वाचविण्याची जबाबदारी शासकीय यंत्रणेवर असून, रुग्णांना आवश्‍यकतेनुसार प्रशासनाने इंजेक्‍शन उपलब्ध करून द्यावीत, अशी सूचना खासदार सदाशिव लोखंडे यांनी केली. 

संगमनेर येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते. तालुक्‍यात निर्माण झालेला कोविड प्रतिबंधक लस व रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनचा तुटवडा, खासगी रुग्णालयांकडून होणारी आर्थिक लूट, याबाबत कार्यकर्त्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. त्याबाबत लोखंडे यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला.

ते म्हणाले, ""अशा कठीण काळात प्रत्येकाचा जीव महत्त्वाचा आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तालुक्‍याचा आढावा घेऊन त्याप्रमाणे इंजेक्‍शन व औषधांची मागणी नोंदवावी. गेल्या वर्षी कोविडबाबत संगमनेरच्या प्रशासनाने समन्वयातून उत्तम कामगिरी बजावली. आताही तशाच कामाची अपेक्षा आहे.'' या संकटात संधी शोधून आर्थिक लूट करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाईचे संकेत त्यांनी दिले. प्रत्येक रुग्णाचे बिल भरारी पथकामार्फत तपासल्याशिवाय अदा न करण्याची सूचना त्यांनी केली. 
प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल मदने, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजकुमार जऱ्हाड, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर आदींसह अमर कतारी, अशोक सातपुते, जनार्दन आहेर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. 

रुग्णालयांच्या दर्शनी भागात फलक लावा 

तालुक्‍यातील खासगी रुग्णालये, त्यातील उपलब्ध असलेली साधने, ऑक्‍सिजन, व्हेंटिलेटर बेडची संख्या, त्यांचे एक दिवसाचे भाडे, आवश्‍यक असलेली औषधे, याचबरोबर भरारी पथकातील सदस्यांच्या नावाचा मोठा फलक रुग्णालयांच्या दर्शनी भागात तातडीने लावण्याची सूचना खासदार सदाशिव लोखंडे यांनी प्रशासनाला केली.

 

हेही वाचा...

शहरातील 12 भाजीबाजार बंद 

नगर : शहरात संचारबंदीची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी महापालिका आयुक्‍त शंकर गोरे यांची सक्षम प्राधिकारी म्हणून नियुक्‍ती केली आहे. आयुक्‍त गोरे यांनी शहरातील 12 भाजीबाजार संचारबंदीच्या काळात बंद ठेवण्याचा आदेश काढला आहे. 

नगर शहरात संचारबंदीच्या काळात गर्दी होऊ नये, यासाठी भाजीबाजार बंद ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला. अमरधामजवळील गाडगीळ पटांगण, दिल्ली गेटजवळील पटांगण, चितळे रस्ता, गंज बाजार भाजी मार्केट, प्रोफेसर कॉलनी चौक, पाइपलाइन रस्त्यावरील यशोदानगर, एकवीरा चौक, नगर-मनमाड रस्त्यावरील नागापूर गावठाण, केडगाव येथील अंबिकानगर, केडगाव देवी मंदिर परिसर, शाहूनगर भागातील पाच गोदाम परिसर, भूषणनगर चौकातील भाजीबाजार यांचा बंद केलेल्या बाजारांत समावेश आहे. 

 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख