रेमडेसिव्हिर आता रुग्णालयातच उपलब्ध होणार  - Remedivir will now be available at the hospital | Politics Marathi News - Sarkarnama

रेमडेसिव्हिर आता रुग्णालयातच उपलब्ध होणार 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 15 एप्रिल 2021

कोरोनाने अत्यवस्थ असलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांना डॉक्‍टर रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन घेऊन यायला सांगत होते.

नगर : "रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन मिळत नसल्याने रुग्णांच्या नातेवाइकांची धावपळ होत होती. ज्या कोरोनाबाधितांची प्रकृती खालावली आहे, अशा रुग्णांसाठी हे इंजेक्‍शन आता रुग्णालयातच उपलब्ध करून दिले जाणार आहे,'' अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली. 

कोरोनाने अत्यवस्थ असलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांना डॉक्‍टर रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन घेऊन यायला सांगत होते. शहरभरातील औषध दुकानांमध्ये चौकशी करूनही हे इंजेक्‍शन उपलब्ध होत नव्हते. काही ठिकाणी या इंजेक्‍शनचा काळाबाजार झाल्याचे प्रकार उघडकीस आले. प्रशासनाने त्याची दखल घेत संबंधितांवर गुन्हेही दाखल केले आहेत. काही नागरिक या इंजेक्‍शनच्या उपलब्धतेसाठी थेट जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधत होते. 

त्यामुळे जिल्हा प्रशासनाने रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनच्या वापरावर देखरेख ठेवायला सुरवात केली आहे. कंपनीकडून नगर जिल्ह्यातील चार प्रमुख घाऊक औषध विक्रेत्यांकडे हे इंजेक्‍शन येते. या विक्रेत्यांकडील साठा व त्यानंतर हे इंजेक्‍शन कोणत्या रुग्णालयास दिले, याची सर्व माहिती जिल्हा प्रशासनाकडून घेतली जात आहे. रुग्णसंख्येच्या प्रमाणात इंजेक्‍शन उपलब्ध करून देण्याची मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली आहे. 

रुग्णांच्या नातेवाईकांची भटकंती थांबेल

कोरोना रुग्णांना उपचार सुरू असलेल्या रुग्णालयातच इंजेक्‍शन उपलब्ध करून देण्यावर प्रशासनाने भर दिला आहे. रुग्णांच्या नातेवाइकांनी या इंजेक्‍शनसाठी भटकंती करू नये, असे जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले.

हेही वाचा...

लसीकरण केंद्रावर स्वयंसेवकांची नियुक्ती 

शेवगाव : शहरातील ग्रामीण रुग्णालयातील कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्रात येणाऱ्यांना उन्हाचा त्रास होऊ नये, यासाठी शेवगाव रोटरी क्‍लबतर्फे मंडप उभारण्यात आला आहे. तसेच, मदतीसाठी स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

या वेळी रोटरीचे अध्यक्ष प्रा. किसन माने, माजी सहप्रांतपाल डॉ. संजय लड्डा, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रामेश्‍वर काटे, सचिव बाळासाहेब चौधरी, माजी अध्यक्ष भागनाथ काटे, मनेष बाहेती, दीपेश पिटेकर, महेश लाडाणे, दीपक भापकर आदी उपस्थित होते. स्वराज डेकोरेर्टरचे संचालक बबन म्हस्के यांनी मंडपाची सुविधा मोफत उपलब्ध करून दिली. 

लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना स्वयंसेवकांनी ऑनलाइन नावनोंदणीसाठी मदत केली. 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख