साडेसहा लाख रुपये भरूनही मिळेना जामखेडमध्ये रेमडेसिव्हिर  - Remdesivir did not get even after paying Rs | Politics Marathi News - Sarkarnama

साडेसहा लाख रुपये भरूनही मिळेना जामखेडमध्ये रेमडेसिव्हिर 

वसंत सानप
शनिवार, 24 एप्रिल 2021

रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन व ऑक्‍सिजनची परिस्थिती गंभीर झाल्यामुळे या आठवड्यात कोविड सेंटर चालक नव्याने रुग्ण दाखल करून घेण्यास असमर्थता दर्शवित आहेत.

जामखेड : तालुक्‍यातील दोन औषधविक्रेत्यांनी रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनसाठी कंपनीकडे दहा दिवसांपूर्वी साडेसहा लाख रुपये भरले आहेत. मात्र अद्यापही हे इंजेक्‍शन न मिळाल्याने तालुका ऑक्‍सिजनवर आहे. 

रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन व ऑक्‍सिजनची परिस्थिती गंभीर झाल्यामुळे या आठवड्यात कोविड सेंटर चालक नव्याने रुग्ण दाखल करून घेण्यास असमर्थता दर्शवित आहेत. त्यामुळे अत्यवस्थ रुग्णांना न्यायचे कोठे, असा प्रश्‍न नातेवाईकांसमोर आहे. मागील पंधरा दिवसांपासून जामखेडला एकही रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन मिळालेले नही. या इंजेक्‍शनच्या वितरणासाठी दोन औषधविक्रेत्यांची शासनाने नियुक्ती केली आहे. 

या दोघा औषधविक्रेत्यांनी 12 एप्रिल रोजी पुण्यातील एका इंजेक्‍शन कंपनीकडे मागणी नोंदवली आहे. त्यापोटी दोघांनी अनुक्रमे दोन लाख व साडेचार लाख रुपये कंपनीकडे भरले आहेत. मात्र दहा दिवस होऊनही अद्याप एकही इंजेक्‍शन मिळालेले नाही. त्यामुळे तालुक्‍यातील अत्यवस्थ रुग्णांचे नातेवाईक हवालदिल झाले आहेत. 

 

तहसीलदार, पोलिस निरीक्षक ठरले संकटमोचक 

जामखेडमध्ये ऑक्‍सिजन सिलिंडरची स्थिती गंभीर बनली आहे. दोनदा खासगी कोविड सेंटरमधील ऑक्‍सिजन संपेल, अशी स्थिती निर्माण झाली. मात्र येथील स्थानिक प्रशासनातील संकटमोचक म्हणून तहसीलदार व पोलिस निरीक्षक मदतीला धावल्याने रुग्णांचे प्राण वाचले. 

जामखेडला पाच कोविड सेंटर आहेत. तेथे साडेसहाशे रुग्ण उपचार घेत आहेत. पैकी तब्बल दोनशे रुग्ण ऑक्‍सिजन बेडवर आहेत. त्यामुळे जामखेडकरांना दररोज दोनशे ऑक्‍सिजन सिलिंडरची गरज भासत आहे. नगर येथून त्याचा पुरवठा होतो. 
मात्र मागणी पूर्ण करताना प्रशासनाच्या नाकी नऊ येत आहे. ऑक्‍सिजन पुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले की प्रशासनासह कोविड सेंटर चालक ऑक्‍सिजनवर येतात. असेच दोन प्रसंग या आठवड्यात अनुभवयास आले. मात्र या दोन्ही वेळी तहसीलदार विशाल नाईकवाडे व पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी लढविलेल्या क्‍लृप्तीमुळे कोरोना संकटातून नागरिकांचे प्राण वाचले. 

त्यांनी स्वतःला झोकून देऊन काम केले. पोलिस व महसूल कर्मचाऱ्यांना बरोबर घेऊन संपूर्ण तालुका पिंजून काढला आणि लहान-मोठ्या व्यवसायिकांकडे उपलब्ध असलेले ऑक्‍सिजन सिलिंडर मिळविले अन्‌ वेळेत कोविड सेंटरला पुरविले. त्यामुळे संकट टळले. मागचा धडा घेवून खासगी कोविड सेंटरचालकांनी आता तरी पर्यायी व्यवस्था उभी करण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. 

 

"जय श्रीराम'ने दिले एक लाख तहसीलदार विशाल नाईकवाडे व पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड या जय-वीरू च्या जोडीने गुरुवारी (ता.22) हळगाव (ता.जामखेड) येथील जय श्रीराम शुगर फॅंक्‍टरीला भेट देऊन त्यांच्याकडून चौदा ऑक्‍सिजन सिलिंडर आणले. तसेच आरोळे कोविड सेंटरला आर्थिक मदत करण्याचा प्रस्ताव लेखापाल सोमनाथ शिंदे यांच्या समोर मांडला. त्यांनी शुक्रवारी (ता.23) रोजी एक लाख रुपयांची मदत रवी आरोळे यांच्याकडे सुपूर्द केली. 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख