श्रीरामपूरमध्ये जादा दराने रेमडेसिविर विकले, दोघांना कोठडी - Remadecivir sold at extra rate in Shrirampur, both in custody | Politics Marathi News - Sarkarnama

श्रीरामपूरमध्ये जादा दराने रेमडेसिविर विकले, दोघांना कोठडी

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 14 एप्रिल 2021

कोरोनाच्या संकटात रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनचा काळाबाजार करणाऱ्यांवर तत्काळ गुन्हे दाखल करून कडक कारवाईच्या मागणीसाठी भाजपचे प्रकाश चित्ते यांनी काल सायंकाळी शहरातील गांधी पुतळ्यासमोर उपोषण करून स्थानिक प्रशासनाचे लक्ष वेधले.

श्रीरामपूर : चढ्या दराने रेमडेसिविर इंजेक्‍शनची विक्री करताना काल (मंगळवारी) शहर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले होते. याप्रकरणी संजय रूपटक्के (रा. मोरगे वस्ती) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला. न्यायालयासमोर आज हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. 

शुभम श्रीराम जाधव (रा. कोल्हार, ता. राहाता) व प्रवीण प्रदीप खुणे (रा. भातंब्री, ता. बार्शी, जि. सोलापूर), अशी आरोपींची नावे आहेत. शहरातील प्रभाग सहामध्ये एका रुग्णालयाच्या परिसरात मंगळवारी दुपारी 12च्या सुमारास रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन 20 हजार रुपयांना विकताना जाधव यास पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून एक इंजेक्‍शन, दुचाकी, स्मार्ट फोनसह 26 हजार रुपये जप्त केले होते, तर खुणे पोलिसांना चकवा देत पसार झाला होता. त्यानंतर पोलिसांनी अन्न व औषध प्रशासन विभागाला याची माहिती देत, चौकशी करून रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. पसार आरोपी खुणे यालाही रात्री उशिरा ताब्यात घेतले. आज दोघांना न्यायालयासमोर हजर केले असता, दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. 

दरम्यान, कोरोनाच्या संकटात रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनचा काळाबाजार करणाऱ्यांवर तत्काळ गुन्हे दाखल करून कडक कारवाईच्या मागणीसाठी भाजपचे प्रकाश चित्ते यांनी काल सायंकाळी शहरातील गांधी पुतळ्यासमोर उपोषण करून स्थानिक प्रशासनाचे लक्ष वेधले. त्याची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संजय सानप यांनी चित्ते यांच्याशी चर्चा करून उपोषण मागे घेण्याची विनंती केली. गुन्हा दाखल झाल्यानंतर चित्ते यांनी उपोषण मागे घेतले. 

 

हेही वाचा...

खासगी कोविड रुग्णालयांची चौकशी करा : लकी सेठी 

श्रीरामपूर : प्रशासनाने परवानगी दिलेल्या खासगी कोविड रुग्णालयांत रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन मिळत नाहीत. "इंजेक्‍शनचा तुम्ही शोध घेऊन आणून द्या; त्यानंतर आम्ही रुग्णास देऊ,' असे बेजबाबदार वक्तव्य अनेक खासगी कोविड रुग्णालयांतील डॉक्‍टर करीत आहेत. त्यामुळे प्रशासनाने अशा कोविड रुग्णालयांची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे येथील शहराध्यक्ष लकी सेठी यांनी केली आहे. 

शहरातील अन्य औषध दुकानांत रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन मिळत नाही. प्रशासनाने ते कमी परडणार नसल्याचे सांगितले, तरीही या इंजेक्‍शनचा सर्वत्र तुटवडा निर्माण झाला आहे. त्यात कोविड रुग्णालयातील डॉक्‍टर रुग्णांच्या नातेवाइकांना सांगतात, की आम्हाला इंजेक्‍शन मिळत नाही. मिळाले तरी अधिक रक्कम मोजावी लागते. त्यामुळे आम्ही रुग्णांना हे इंजेक्‍शन देऊ शकत नाही. मात्र, अनेक ठिकाणी रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनची चढ्या दराने विक्री होत आहे. रेमडेसिव्हिरचा पुरेसा साठा असल्याचा दावा सरकार करीत असले, तरी हे इंजेक्‍शन 20 ते 25 हजार रुपयांपर्यंत छुप्या मार्गाने विकले जाते. 

 

Edited B - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख