नगर जिल्ह्यात "रेमडेसिव्हिर'साठी नातेवाइकांची धावाधाव  - Relatives rush for "Remedivisvir" in Nagar district | Politics Marathi News - Sarkarnama

नगर जिल्ह्यात "रेमडेसिव्हिर'साठी नातेवाइकांची धावाधाव 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 9 एप्रिल 2021

शिल्लक असतानाही औषध दुकानांमधून इंजेक्‍शन दिले जात नसल्याचा आरोप आता केला जात आहे.

नगर : जिल्ह्यात रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन मिळविण्यासाठी नागरिकांची धावाधाव सुरू झाली असून, थेट जिल्हाधिकाऱ्यांसह प्रशासनालाच दूरध्वनी करून इंजेक्‍शन उपलब्ध करून देण्याची मागणी सुरू झाली आहे.

शिल्लक असतानाही औषध दुकानांमधून इंजेक्‍शन दिले जात नसल्याचा आरोप आता केला जात आहे. हा काळा बाजार रोखण्यासाठी प्रशासनाने हे इंजेक्‍शन सरकारी रुग्णालयांतून उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढला असून, रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. रुग्णांसाठी सध्या रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनचा वापर केला जात आहे. मात्र, या इंजेक्‍शनचा सध्या काळा बाजार सुरू आहे. बाजारात चढ्या भावाने त्याची विक्री केली जात आहे. त्यामुळे सध्या अनेक रुग्णांचे नातेवाईक जिल्ह्यासह परजिल्ह्यांत फिरून इंजेक्‍शन उपलब्ध करीत आहेत.

800 रुपयांच्या इंजेक्‍शनसाठी अनेक ठिकाणी पाच हजारांपर्यंत रक्कम घेतली जात असल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाइकांकडून केला जात आहे. या इंजेक्‍शनसाठी काहींनी थेट जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून तक्रारी केल्या. घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हाधिकारीही क्षणात रुग्णांच्या नातेवाइकांना इंजेक्‍शन उपलब्ध करून देण्यासाठी संबंधितांना सूचना देत आहेत. 

काळाबाजार झाल्यास कारवाई

डॉक्‍टरांनी रुग्णांच्या नातेवाइकांना इंजेक्‍शन आणायला लावू नये. त्यांच्याजवळ असलेला साठा वापरावा. साठा करण्यासाठी काही जण रुग्णांच्या नातेवाइकांना इंजेक्‍शन आणायला लावत असल्याचे निदर्शनास येत आहे. असे प्रकार आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिला.

 

मंत्री थोरातांकडे मागणी

रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनची विक्री औषध दुकाने तथा एजन्सीमार्फत सुरू आहे. सध्या या इंजेक्‍शनचा काळा बाजार होत आहे. त्यामुळे या इंजेक्‍शनची थेट विक्री बंद करून प्रशासकीय यंत्रणेद्वारेच करण्यात यावी, अशी मागणी आपण महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली आहे, असे जिल्हा युवक काॅंगेसचे उपाध्यक्ष तुषार पोटे यांनी सांगितले.

 

निधी उपलब्ध करावा

रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनचा सध्या काळा बाजार सुरू आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेने हे इंजेक्‍शन खरेदी करून त्याची विक्री केल्यास काळा बाजार थांबून नागरिकांना फायदा होईल. त्यासाठी आता निधी उपलब्ध करून प्रक्रिया राबवावी, असे जिल्हा परिषदेचे सदस्य जालिंदर वाकचौरे यांनी सांगितले.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख