राधाकृष्ण विखे पाटलांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस, केले हे आवाहन - Radhakrishna Vikhe Patil took the corona vaccine, appealed | Politics Marathi News - Sarkarnama

राधाकृष्ण विखे पाटलांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस, केले हे आवाहन

सरकारनामा ब्युरो
रविवार, 4 एप्रिल 2021

कोरोना संकटामुळे भयभीत झालेल्या समाज जीवनाला कोरोना प्रतिबंधात्मक लस उत्पादनाचा  मोठा दिलासा मिळाला. प्रतिबंधात्मक लस उत्पादन करणारा देश म्हणून भारताची ओळखही जगात निर्माण झाली.

नगर : कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी सर्व जेष्ठांबरोबरच आरोग्य विभागातील कर्मचारी, पोलिस यांना प्राधान्यक्रमाणे देण्यात आली आहे. आता 45 वर्षांपुढील नागरिकांनाही लस देण्यात येत आहे. बहुतेक नेत्यांनी लस घेत लोकांनी लस घ्यावी, असे आवाहन केले आहे.

भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या ग्रामीण रुग्णालयात जाऊन कोरोना प्रतिबंधात्मक लसचा पहिला डोस घेतला. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने लसीकरण मोहिमेची व्याप्ती वाढविल्यामुळे पात्र व्यक्तींनी आत्मनिर्भरतेने लस घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

कोरोना संकटामुळे भयभीत झालेल्या समाज जीवनाला कोरोना प्रतिबंधात्मक लस उत्पादनाचा  मोठा दिलासा मिळाला. प्रतिबंधात्मक लस उत्पादन करणारा देश म्हणून भारताची ओळखही जगात निर्माण झाली.

इतर देशांना सुध्दा लस उपलब्ध करून देणारा देश म्हणून भारताचा नावलौकीक झाला असल्याकडे लक्ष वेधून आमदार विखे पाटील म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासाठी देशाच्या वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ, वैज्ञानिक, जागतिक आरोग्य संघटना यांच्याकडे केलेला पाठपुरावा आणि लस उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना दिलेले प्रोत्साहन तितकेच महत्त्वाचे असल्याचे विखे पाटील म्हणाले.

देशातील सर्वच कोरोना योध्दे, ज्येष्ठ नागरिकांना प्रथम लस घेता यावी, यासाठी शासकीय आणि खासगी रुग्णालयात लसीकरणाचा महत्वपूर्ण कार्यक्रम हाती घेण्यात आला. केंद्र सरकारने आता ४५ वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येकालाच लस देण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे लसीकरण मोहिमेची व्याप्ती अधिक वाढली असल्याचे विखे पाटील म्हणाले.

कोरोना संकटावर मात करण्यासाठी सर्वांनाच नियमाचे पालन करावे लागणार आहेच, परंतू उपलब्ध झालेल्या लसीचा डोस घेवून या संकटावर मात करण्याची स्वतःपासून सुरूवात करण्याचे कर्तव्यही महत्वाचे असल्याने पात्र व्यक्तींनी प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी आत्मनिर्भरतेने पुढे येण्याचे आवाहन विखे पाटील यांनी केले.

शिर्डी मतदारसंघात ग्रामीण आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ठरवून दिलेल्या दिवसांप्रमाणे लसीकरण सुरू आहे. लसीकरण मोहिमेबरोबरच कोरोनाची वाढती रुग्ण संख्या अटोक्यात आणण्यासाठी आमदार विखे पाटील, महसूल आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून दररोज आढावा घेवून उपाय योजना तसेच आरोग्य सुविधांबाबत सूचना देत आहेत.

 

Edited By - Murlidhar Karale

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख