रोज 50 हजार इंजेक्शनचे उत्पादन, आठ दिवसांत रेमडेसिव्हिरचा तुटवडा हटणार - Production of 50,000 injections per day, the shortage of remedivir will be eliminated in eight days | Politics Marathi News - Sarkarnama

रोज 50 हजार इंजेक्शनचे उत्पादन, आठ दिवसांत रेमडेसिव्हिरचा तुटवडा हटणार

सतीश वैजापूरकर
शुक्रवार, 16 एप्रिल 2021

रोज पन्नास हजार इंजेक्‍शनचे उत्पादन सुरू केले आहे. मानवतेच्या भूमिकेतून त्याची किंमत अवघी नऊशे रुपये ठेवली आहे.

शिर्डी : कोविड महामारीत डॉक्‍टरांच्या वर्तुळात "वंडर ड्रग' म्हणून संबोधल्या जाणाऱ्या रेमडेसिव्हिरचा तुटवडा येत्या आठ दिवसांत कमी होईल. या इंजेक्‍शनचे सर्वाधिक उत्पादन करणाऱ्या कॅडिला कंपनीने रोज पन्नास हजार इंजेक्‍शनचे उत्पादन सुरू केले आहे. मानवतेच्या भूमिकेतून त्याची किंमत अवघी नऊशे रुपये ठेवली आहे. अन्य तीन कंपन्यांनीही उत्पादन सुरू केले. निर्यातबंदीमुळेदेखील तुटवडा कमी होण्यास हातभार लागेल, असा या क्षेत्रातील जाणकारांचा अंदाज आहे. 

शहरातील अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. विनय पाटील यांनी कॅडिला कंपनीच्या व्यवस्थापनाशी आज संपर्क साधला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीकडे कच्चा माल मोठ्या प्रमाणावर आहे. देशभरातील तुटवडा लक्षात घेता, रोज पन्नास हजार इंजेक्‍शनचे उत्पादन सुरू आहे. मागील ऑक्‍टोबर महिन्यात कोविडची पहिली लाट अकस्मात ओसरली. मागणी जवळपास शून्यावर आल्याने उत्पादन बंद करण्यात आले. पहिला लॉट उत्पादित झाल्यानंतर पंधरा दिवस थांबावे लागते. ही साखळी पूर्ण झाली, की वेगाने पुरवठा सुरू होईल. अन्य तीन कंपन्यांचे उत्पादनदेखील बाजारात येईल. आमचा उत्पादनखर्च तुलनेत कमी असल्याने, मानवतेच्या भूमिकेतून आम्ही या इंजेक्‍शनची किंमत नऊशे रुपये ठेवली आहे.'' 

महाराष्ट्र औषध संघटनेचे जनसंपर्क अधिकारी अजित पारख म्हणाले, ""कॅडिला कंपनी कमी किमतीत आपले उत्पादन बाजारात आणत आहे. हेट्रो, मायलॉन, सिप्ला व सन फार्मा या कंपन्यांकडून नव्याने उत्पादित झालेल्या इंजेक्‍शनची किंमत बाराशे ते पंधराशे रुपये असेल. आणखी आठ दिवसांत तुटवडा कमी होईल. त्यानंतर परिस्थिती सुरळीत होईल, असा अंदाज आहे. ट्रायल ड्रग म्हणून त्यास केंद्र सरकारने मान्यता दिली होती. त्यामुळे बाटलीवर "तीन महिने सेल्फ लाइफ' असा उल्लेख होता. आता तो बारा महिने करण्यात आला. त्यामुळे स्टिकर लावून त्याची काही काळ विक्री झाली. त्यात फसवणुकीचा प्रकार नव्हता, हे लक्षात घ्यायला हवे.'' 

दीड हजार इंजेक्शनची गरज

पुढील आठ दिवस या इंजेक्‍शनची गरज असलेल्या रुग्णांच्या दृष्टीने कसोटीचे ठरतील. राहाता तालुक्‍यात दीड हजार इंजेक्‍शनची गरज आहे. प्रत्यक्षात गेल्या दोन दिवसांत प्रत्येकी 66 इंजेक्‍शन मिळाले. इंजेक्‍शनचे वितरण करताना भेदभाव केला जाऊ नये. रुग्णांच्या बेडची संख्या लक्षात घेऊन वितरण व्हावे, अशी डॉक्‍टर मंडळींची अपेक्षा आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख