तिसऱ्या लाटेची तयारी : ऑक्सिजन उपलब्धतेबाबत खासगी हाॅस्पिटलला ही आहेत बंधणे 

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीसंदर्भात आता जिल्हा प्रशासनाने तयारी सुरु केली आहे.
Dr. rajendra bhosale.jpg
Dr. rajendra bhosale.jpg

नगर : जिल्ह्यात कोरोना रुग्ण कमी होत आहेत. परंतु तिसरी संभाव्य लाट येण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाने जोरदार तयारी सुरू केली आहे. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले (Rajendra Bhosale) यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकाऱ्यांची टीम यासाठी कामाला लागली आहे. खासगी रुग्णालयांत आॅक्सिजनचा पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी विशेष नियोजन केले असून, नियमावली करण्यात आली आहे. (Preparing for the third wave: These are the restrictions on the availability of oxygen to a private hospital)

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासंदर्भात जे नियोजन केले जात आहे. ते मूर्त स्वरुपात येण्यासाठी तालुकास्तरावर सर्व यंत्रणांनी तेथील खासगी हॉस्पिटल्स तसेच स्थानिक इंडियन मेडीकल असोसिएशनच्या पदाधिकारी यांच्याशी चर्चा करुन संबंधित ठिकाणी पुरेसा ऑक्सिजन उपलब्ध होईल, यासाठीची कार्यवाही करावी, अशा सूचना डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिल्या आहेत.

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीसंदर्भात आता जिल्हा प्रशासनाने तयारी सुरु केली आहे. त्याचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे घेतला. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, उपजिल्हाधिकारी डॉ. अजित थोरबोले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. विरेंद्र बडदे आदी जिल्हा मुख्यालय येथून, तर उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी हे तालुका स्तरावर उपस्थित होते.

या वेळी जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, की सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांनी इंडियन मेडीकल असोसिएशनच्या स्थानिक पदाधिकारी यांच्यासोबत बैठका घेऊन संभाव्य लाटेच्या अनुषंगाने आवश्यक आॅक्सिजनसाठी कार्यवाही करणे अपेक्षित आहे. जी हॉस्पिटल्स ५० पेक्षा जास्त बेडस क्षमतेची आहे, त्यांनी त्यांना आवश्यक असणारा आॅक्सिजन साठवण्यासाठीची व्यवस्था कऱणे अपेक्षित आहे. त्यासाठी आॅक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणी, जम्बो सिलिंडर, ड्युरा सिलींडरची व्यवस्था आदींची सुविधा करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आॅक्सिजन निर्मिती करणाऱ्या उद्योगांबरोबर करार करुन घेणे आवश्यक आहे.

तालुका पातळीवर ही कार्यवाही वेगाने होणे अपेक्षित आहे. प्रत्येक हॉस्पिटल्सने किमान तीन दिवस पुरेल एवढा आॅक्सिजन साठा राखीव ठेवणे बंधनकारक असणार आहे. त्यामुळे त्यासाठी आतापासूनच तयारी कऱणे अभिप्रेत आहे. ज्या हॉस्पिटल्सची आॅक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणी क्षमता नाही, अशा छोट्या हॉस्पिटल्सने एकत्र येत लिक्विड मेडीकल आॅक्सिजनसाठी साठवणूकीची क्षमता निर्माण करणे आणि आॅक्सिजन मिळण्यासाठी संबंधित कंपन्यांबरोबर करार करणे आवश्यक आहे.

संभाव्य लाटेच्या अनुषंगाने ही तयारी आताच केली, तर आरोग्य यंत्रणांवर येणारा ताण कमी होण्यास मदत होईल, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, ही लाट लगेच येऊ नये  यासाठी सर्वांनी कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन करणे अत्यावश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्यांवर कडक कार्यवाही आवश्यक आहे.  तसेच, लक्षणे आढळून येणाऱ्या रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी आवश्यक आहे. संभाव्य रुग्ण शोधून त्यांची चाचणी केली जाणे महत्वाचे आहे. त्यामुळे संसर्गाचा धोका कमी होऊ शकेल. त्यामुळे आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या वाढविण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

हेही वाचा..

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com