सत्ता विरोधी पक्षांना वाकविण्यासाठी असते का ! - Is power to bend the opposition! | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

सत्ता विरोधी पक्षांना वाकविण्यासाठी असते का !

प्रकाश पाटील
बुधवार, 23 जून 2021

भाजपच्या काळात आपल्याला त्रास झाला, असा गौप्यस्फोट मंत्री शंकरराव गडाख यांनी केला आहे.

नगर ः शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांच्या पाठोपाठ नेवाशाचे आमदार आणि मंत्री शंकरराव गडाख यांनीही माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Phadnvis) यांचे नाव न घेता जे काही सांगायचे आहे, ते सांगितले आहे. म्हणजेच त्यांना नेमके काय म्हणायचे आहे, हे महाराष्ट्राला कळले. त्यांच्या विधानाची येथे मुळात दखल घेण्याचे कारण असे की कोणताही पक्ष सत्तेवर असो, तो विरोधकांना वाकवित असतो की काय, असा प्रश्‍न पडतो. (Is power to bend the opposition!)

भाजपच्या काळात आपल्याला त्रास झाला, असा गौप्यस्फोट मंत्री शंकरराव गडाख यांनी केला आहे. वास्तविक ठाण्यातील शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या लेटरबॉम्बनंतर राज्याच्या राजकारणात चर्चा होणे स्वाभाविक होते. कारण असे की सरनाईक हे सत्ताधारी शिवसेनेचे नेते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कडवे समर्थक म्हणून ओळखले जातात.

मोदींनी राजकारणाची दिशाच बदलली

२०१४ मध्ये देशात मोदी लाट आली अन्‌ देशाच्या राजकारणाची दिशाच पार बदलून गेली. जी शिवसेना भाजपच्या हातात हात घालून पंचवीस वर्षांपासून राजकारण करीत होती, तिलाही धक्के बसले. मोदी सत्तेवर आल्यानंतर राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत युती तुटली. दोन्ही काँग्रेसही स्वतंत्र लढले. जर का त्यावेळी युती असती, तर शिवसेनेचा मुख्यमंत्री बनला असता. पण तसे झाले नाही. राजकारणात काहीही होऊ शकते, हे त्यावेळी पुन्हा एकदा स्पष्ट झाले होते. शिवसेना विरोधी बाकावर बसली आणि पुढे ती सत्तेतही सहभागी झाली. या पाच वर्षांत शिवसेनेने बरंच काही सहन केले. मोदी लाट मान्य केली. सबुरीने घेण्याचा निर्णय घेतला आणि २०१४ चे उट्टे तिने २०१९ मध्ये काढले. ज्या दोन्ही काँग्रेसशी दोन हात करीत होती, त्याच शिवसेनेने भाजपला दोन्ही कॉंग्रेसबरोबर आघाडी करून सत्तेपासून दूर ठेवले. हा सर्व इतिहास आहे.

घाबरून भाजपमध्ये

२०१४ ते २०१९ पर्यंत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. त्यांनी दोन्ही कॉंग्रेसला खळखिळे करण्याचा प्रयत्न केला. दोन्ही कॉंग्रेसचे रथीमहारथी निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये दाखल झाले. केंद्रात मोदी सरकार आणि राज्यात फडणवीस सरकार. त्यामुळे राज्यात कारभार करताना विरोधकांना वाकविण्याची एकही संधी भाजपने सोडली नाही. काही नेते घाबरून (भ्रष्टाचाराला) भाजपमध्ये गेले. या पाच वर्षांत भाजपने सत्तेचा पुरेपूर वापर करीत विरोधकांना चारीमुंड्या चित केले. लावरे तो व्हिडिओ सांगत लाखोच्या सभा जिंकणाऱ्या राज ठाकरे यांनाही शेवटी ईडीची नोटीस आलीच. तसेच राज्यात शिवसेनेची सत्ता येऊनही ईडीने काही मंडळींचा भ्रष्टाचार बाहेर काढला आहे. चौकशीचा ससेमिरा मागे लावला आहे. त्यापैकी एक प्रताप सरनाईक हे ही आहेत. मोदींना विरोध करण्यापेक्षा भाजपशी युती बरी, असा समज काही मंडळींनी करून घेतला असावा. सरनाईक यांच्या पत्रानंतर गडाख यांनीही आपणास कसा त्रास झाला, हे कथन केले आहे. याचा अर्थ असा निघतो की जो पक्ष सत्तेवर असतो, तो सत्तेचा पुरेपूर वापर करून विरोधकांना वाकविण्याचा प्रयत्न करतो.

आपली लोकशाही ग्रेट

खरंतर आपली लोकशाही जगात ग्रेट आहे. सत्ताधारी इतकेच विरोधीपक्ष नेत्याला महत्त्व असते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या काही महिन्यांत ठाकरे सरकारचे जे जाहीर वाभाडे काढले आहेत, त्यावरून हे स्पष्टही होते.

आज भाजप सत्तेवर असल्याने त्यांच्याकडून सत्तेचा गैरवापर होत असल्याची टीका होत असली, तरी कॉंग्रेस सत्तेवर असतानाही त्यांनीही वेगळे काहीच केले नाही. सध्या राज्यात कॉंग्रेस कुठे आहे, याचा विचारच केलेला बरा. भाजप असो की कॉंग्रेस हे दोन्ही पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असे म्हणणे गैर ठरणार नाही.

गांधीजींना तुरुंग मंदिर वाटायचे, पण आजच्या नेत्यांचे काय

महात्मा गांधींनी बलाढ्य अशा ब्रिटिश साम्राज्याविरोधात आवाज बुलंद केला. त्यांना अनेकदा तुरुंगात जावे लागले. पण, देशासाठी. त्यांना तुरुंग म्हणजे मंदिर वाटायचे. आजकालच्या पुढाऱ्यांना मात्र तुरुंगाची भीती वाटते. जे नेते भ्रष्ट आहे. चुकीच्या मार्गाने कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार करतात. जनतेचा पैसा खातात. त्यांच्यामागे चौकशी लागली त्यांना भीती का वाटते. जर चुकीच्या मार्गाने पैसा कमवायचा असेल, तर तुरुंगात जावेच लागेल. आपण चुकीचे असे काहीच केले नसेल, तर तुरुंगाची भीती का वाटावी. कर नाही तर डर कशासाठी असा प्रश्‍न उपस्थिती होतो.

गडाख यांच्यावर सुडबुद्धीने कारवाई झाली असेल, तर ते चुकीचे आहे. त्याचे कधीही समर्थन करता येणार नाही. पक्ष कुठलाही सत्तेवर असो तो सुडबुद्धीनेचे विरोधीपक्षांबरोबर वागतो, असे चित्र सध्या दिसून येत आहेत. याचा अर्थ कॉंग्रेस धुतल्या तांदळासारखा आहे, असे समजण्याचे मुळी कारणच नाही.

जर भ्रष्ट नेते भाजपमध्ये आले, तर ते पवित्र होतात आणि विरोधीपक्षात असले की ते खलनायक असतात, असे आपण मानायचे का ! कोणत्याही पक्षातील नेते असू द्या त्यांचा कारभार पारदर्शीच हवा, ही जनतेची अपेक्षा असली, तरी निष्कलंक नेते किती, हा ही प्रश्‍न यानिमित्ताने पडतो.

 

हेही वाचा..

माझी झोप उडालीय, मंत्र्यांनाही झोपू देणार नाही

 

 

 

 

Edited By - Murlidhar Krale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख