पाठलाग करताच दरोडेखोरांकडून पोलिसांवर हल्ला, अखेर टोळी जेरबंद - Police in riot gear stormed a rally on Friday, removing hundreds of protesters by truck | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगलीकडे रवाना, पूरग्रस्त भागाची पाहणी करणार

पाठलाग करताच दरोडेखोरांकडून पोलिसांवर हल्ला, अखेर टोळी जेरबंद

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 21 जुलै 2021

पोलिसांना पाहताच दरोडेखोर पळून जाऊ लागले. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून चौघांना जेरबंद केले. दरोडेखोरांनी पोलिसांवर दगडफेक करून सत्तूरने हल्ला केला. या झटापटीत एक दरोडेखोर पळून जाण्यात यशस्वी झाला.

संगमनेर : तालुक्याच्या पठार भागातील माळवाडीत (बोटा) दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला आज (बुधवार) घारगाव पोलिसांनी पाठलाग करून जेरबंद केले. या वेळी दरोडेखोरांनी पोलिसांवर दगड व सत्तूरने हल्ला केला. त्याचा फायदा घेत पाचपैकी एक दरोडेखोर पळून जाण्यात यशस्वी झाला. दरोड्याच्या साहित्यासह ४० हजारांचा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आला.

जानकू लिंबाजी दुधवडे, संजय निवृत्ती दुधवडे (दोघेही रा. गाढवलोळी, अकलापूर, ता. संगमनेर), दत्तू बुधा केदार (रा. नांदूर खंदरमाळवाडी), राजू सुरेश खंडागळे (रा. माळवाडी), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. भाऊ लिंबाजी दुधवडे पसार झाला. घारगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांना माळवाडी परिसरात संशयास्पदरीत्या युवकांची टोळी फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी पहाटे साडेतीनच्या सुमारास पोलिस पथकाला माळवाडीकडे पाठविले.

पोलिसांना पाहताच दरोडेखोर पळून जाऊ लागले. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून चौघांना जेरबंद केले. दरोडेखोरांनी पोलिसांवर दगडफेक करून सत्तूरने हल्ला केला. या झटापटीत एक दरोडेखोर पळून जाण्यात यशस्वी झाला. पोलिस नाईक गणेश लोंढे यांच्या फिर्यादीवरून घारगाव पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई हवालदार संजय विखे, पोलिस नाईक गणेश लोंढे, पोलिस कॉन्स्टेबल किशोर लाड, हरिश्चंद्र बांडे, प्रमोद चव्हाण, संतोष फड यांच्या पथकाने केली.

हेही वाचा..

‘दातेंच्या माध्यमातून पदाचे महत्त्व तालुक्याला समजले’

टाकळी ढोकेश्वर : ‘‘विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटींमुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली. जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ दाते यांनाही जिल्हा परिषदेत सभापतिपदाची संधी मिळाली. त्यांनीही कोट्यवधींचा निधी आणला. दातेंच्या माध्यमातून पदाचे महत्त्व तालुक्याला समजले,’’ असे प्रतिपादन पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके यांनी केले.

टाकळी ढोकेश्वर (ता. पारनेर) येथे दाते यांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेमार्फत मंजूर झालेले, वासुंदे चौक ते टाकळी ढोकेश्वर ते ढोकी रस्ता मजबुतीकरण, नागरी सुविधा योजनेंतर्गत पायमोडे वस्ती रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण या ५५ लाखांच्या विकासकामांचे भूमिपूजन जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समिती सभापती काशिनाथ दाते व पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

उपसभापती विलास झावरे, अशोक कटारिया, उपसरपंच सुनील चव्हाण, माजी सरपंच सुनीता झावरे, शिवाजी खिलारी, रावसाहेब झावरे, महेश पाटील, अक्षय गोरडे उपस्थित होते. सभापती दाते म्हणाले, ‘‘तालुक्यातील सर्वच जिल्हा परिषद गटांत जिल्हा परिषदेमार्फत निधी देण्यात येत आहे. विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांच्या मार्गदर्शनाखाली, दिलेल्या संधीचा उपयोग तालुक्याच्या विकासासाठी करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.’’

 

हेही वाचा..

यशवंंतराव गडाखांची कोरोनावर मात

 

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख