साईसंस्थान "कोविड'मधील सेवकांवर पोलिस कारवाई

जिवाची बाजी लावून साईसंस्थानच्या कोविड रुग्णालयात सेवा देणाऱ्या सुमारे दोनशे सेवकांच्या दृष्टीने आजचा दिवस हा असा अपेक्षाभंग करणारा ठरला. हेची फळ काय मम तपाला, असे म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली.
saibaba.jpg
saibaba.jpg

शिर्डी : जागतिक परिचारिका दिनानिमित्त आपुलकीचे चार शब्द राहिले बाजूला; समान काम समान वेतनाची मागणी करत संपाची हाक देणारे परिचारक व परिचारिकांच्या नशिबी आज पोलिसी (Police) कारवाईचे भोग आले. (Police action against employees of Sai Sansthan "Kovid")

जिवाची बाजी लावून साईसंस्थानच्या कोविड रुग्णालयात सेवा देणाऱ्या सुमारे दोनशे सेवकांच्या दृष्टीने आजचा दिवस हा असा अपेक्षाभंग करणारा ठरला. हेची फळ काय मम तपाला, असे म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली. 

या कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याचा अधिकार जिल्हा प्रधान न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील तदर्थ समितीला आहे. त्याबाबत साईसंस्थान अधिकाऱ्यांनी प्रस्ताव व पत्रव्यवहारदेखील केला आहे. समितीने बैठकीत निर्णय घेतल्यानंतर उच्च न्यायालयाची परवानगी घ्यायची आहे. अद्याप ही बैठक झालेली नसल्याने, हा पेच निर्माण झाला. 

तथापि, ही मागणी काही आजची नाही. गेल्या दहा वर्षांपासून साईसंस्थान रुग्णालयात काम सारखेच; मात्र ही कंत्राटी मंडळी दरमहा अठरा हजार रुपये, तर कायम सेवेतील मंडळी दरमहा साठ ते पासष्ट हजार रुपये वेतन घेतात.

यापूर्वीच्या विश्वस्त मंडळांनादेखील ही तफावत दूर करावीशी वाटली नाही. मागील वर्षीपासून कोविडचा प्रकोप सुरू झाला. जोखीम आणखी वाढली आणि वेतनातील तफावत तशीच राहिली. कोविडने गाठले, अन्य रुग्णालयात उपचाराची वेळ आली, तर साईसंस्थानकडून वैद्यकीय मदतीची हमी नाही. पगारी सुट्या नाहीत. या असंतोषातून आठ महिन्यांपूर्वी या कामगारांनी "काम बंद' आंदोलन केले. आश्वासनाशिवाय पदरात काहीही पडले नाही. 

जिवाची जोखीम पत्करून काम करणाऱ्या या मंडळींच्या सहनशीलतेचा काल अंत झाला. त्यांनी आज सकाळपासून काम बंद करणार असल्याचे जाहीर केले. आज सकाळी साडेआठच्या सुमारास हे कर्मचारी रुग्णालयासमोर जमले. ध्यानीमनी नसताना अचानक पोलिसांनी कारवाईला सुरवात केल्याने बाचाबाची झाली. अनेक कर्मचाऱ्यांना पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करून वाहनात बसविले. पंधरा जणांवर साथरोग अधिनियमाचे उल्लंघन केल्याबाबतच्या आशयाचे गुन्हे दाखल झाले. 

"काम बंद' आंदोलन सुरूच 

दरम्यान, काही कर्मचाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांच्याशी चर्चा केली. "तदर्थ समितीच्या बैठकीत ही मागणी मांडू. निर्णयाचे अधिकार समितीला आहेत. तुम्ही आंदोलन मागे घ्या,' अशी भूमिका बगाटे यांनी मांडली. तोडगा न निघाल्याने या कर्मचाऱ्यांनी आपले "काम बंद' आंदोलन सुरूच ठेवले. कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन चौगुले यांनी आंदोलनस्थळी जाऊन कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा व्यक्त केला. 

आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना कामगारांच्या मागण्यांविषयी सहानुभूती आहे. त्यांचेही प्रयत्न सुरू आहेत. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी आज मोबाईलद्वारे आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. मागण्या मान्य करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. "कोविड प्रकोप सुरू असल्याने ही आंदोलनाची वेळ नाही; मी तुमच्यासोबत आहे. तुम्ही कामावर हजर व्हा,' अशी भूमिका भाजप नेते नितीन कोते यांनी मांडली. 

हेही वाचा...

खासदार सदाशिव लोखंडे यांनी साईसंस्थानच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. कोविडची साथ सुरू असल्याने आंदोलकांनी आंदोलन मागे घ्यावे. आपण मागण्या मान्य करण्यासाठी पाठपुरावा करू. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटू, अशी भूमिका घेतली, असे मत शिवसेना नेते कमलाकर कोते यांनी व्यक्त केले.

गुन्हे दुर्दैवी 

केवळ पंचवीस टक्के वेतन घेत जिवाची बाजू लावून शेकडो कोविड रुग्णांना जीवदान देण्यासाठी आम्ही रात्रीचा दिवस करतो. जीवन-मरणाच्या या लढाईत आम्ही सर्वांत पुढे आहोत. दुर्दैव असे, की आज जागतिक परिचारिकादिनी आमच्या सहकाऱ्यांवर कोविड साथ अधिनियमान्वये गुन्हे दाखल झाले. हे फार मोठे दुर्दैव आहे. आम्ही पुरते निराश झालो आहोत, अशी खंत एका आंदोलनकर्ती परिचारिकेने व्यक्त केली. 

Edited By - Murlidhar Karale

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com