`त्या` व्हिडिओबाबत जिल्ह्याबाहेरील लोकांना उत्तर देणार नाही : डाॅ. विखे - People from outside the district will not respond to the video: Dr. Vikhe | Politics Marathi News - Sarkarnama

`त्या` व्हिडिओबाबत जिल्ह्याबाहेरील लोकांना उत्तर देणार नाही : डाॅ. विखे

निलेश दिवटे
सोमवार, 26 एप्रिल 2021

माझा व्हिडिओ व्यवस्थित पहिला, तर मी त्यामध्ये किती इंजेक्‍शन्स आणले, याबाबत उल्लेख नाही. मी कुठे गेलो होतो, काय केले, याबाबत कुणीही टिप्पणी करू नये.

कर्जत : "आम्ही फसवेगिरी केली असती, तर जिल्ह्याने पन्नास वर्षे आम्हाला साथ दिली नसती. "रेमडेसिव्हिर'बाबत राजकारण चालू आहे. मी व्हिडिओमध्ये दाखविलेल्या बाॅक्समध्ये काय आहे, हे जिल्ह्याबाहेरील लोकांना सांगण्याची गरज नाही. परंतु जिल्ह्यातील लोकनियुक्त लोकप्रतिनिधींना शंका असल्यास त्यांना उत्तर देईल,'' असे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. 

खासदार विखे पाटील यांनी कर्जत तालुक्‍यातील मिरजगाव, माहिजळगाव, कर्जत शहर आणि राशीन येथे भेट देत कोरोना संसर्गाबाबत आढावा घेतला. तसेच याबाबत मार्गदर्शक सूचना केल्या. त्यांच्यासमवेत उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, जिल्हा बॅंकेचे संचालक अंबादास पिसाळ, माजी तालुकाध्यक्ष अशोक खेडकर, किसान सेलचे जिल्हा सरचिटणीस सुनील यादव, युवक नेते दादासाहेब सोनमाळी, प्रकाश शिंदे, प्रकाश कदम आदी या वेळी उपस्थित होते. या वेळी बोलताना त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला. 

माझा व्हिडिओ नीट पहा

ते म्हणाले, की माझा व्हिडिओ व्यवस्थित पहिला, तर मी त्यामध्ये किती इंजेक्‍शन्स आणले, याबाबत उल्लेख नाही. मी कुठे गेलो होतो, काय केले, याबाबत कुणीही टिप्पणी करू नये. त्या बॉक्‍समध्ये काय आहे, याबाबत ज्यांना शंका आहे, त्यांनी अधिकृतपणे बोलावे. मी त्यांना व्यक्तिशः उत्तर देईल. माझी बांधिलकी नगर जिल्ह्यापुरती आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना त्या बॉक्‍समध्ये काय होते, ते मोकळे होते की त्यामध्ये बिस्किट, चॉकलेट होते, हे मी त्यांना सांगेन. जिल्ह्याच्या बाहेरच्या कुठल्याही व्यक्तीला उत्तर देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

 

हेही वाचा...

महापालिकेच्या दक्षता पथकाला हवे पोलिसांचे बळ 

नगर : नगर तालुका बाजार समितीतील भाजी मार्केट सध्या बंद आहे. मात्र या भाजी मार्केटमधील विक्रेते रस्त्यावर येऊन शेतमाल खरेदी करून विकत आहेत. त्यामुळे मार्केट यार्डमधील भाजी मार्केटसमोरील रस्त्यावर पहाटे गर्दी होते. ही गर्दी हटविण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या दक्षता पथकालाही हे विक्रेते जुमानत नाहीत. मात्र सकाळी पोलिस पाहताच हे विक्रेते गाशा गुंडाळत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या दक्षता पथकाला पोलिसांच्या बळाची गरज भासू लागली आहे. 

शहरातील वाढती कोरोना स्थिती पाहता जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी नगर तालुका बाजार समिती व नेप्ती उपबाजार समिती बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या दोन्ही बाजार समित्यांतील भाजीबाजारही बंद आहेत. शेतकरी पहाटे शेतमाल घेऊन मार्केट यार्डमधील भाजीबाजारासमोर येत आहेत. ही बाब लक्षात घेऊन मार्केट यार्डमधील काही विक्रेते रस्त्यावरच ठाण मांडतात.

शेतकऱ्यांची ओळख असल्याने ते माल तेथेच विकत घेतात. तो माल ते शहरातील किरकोळ विक्रेत्यांना तेथेच विकतात. त्यामुळे तेथे मोठ्या संख्येत शेतकरी व विक्रेत्यांची गर्दी होते. 

ही गर्दी हटविण्यासाठी महापालिकेचे दक्षता पथक गेले तरी कोणीही ऐकत नसल्याची बाब पथकाने महापालिका आयुक्‍तांना सांगितली. त्यानुसार महापालिका आयुक्‍त शंकर गोरे यांनी चारही प्रभाग समित्यांतील दक्षता पथकांना पहाटे एकत्रित जाऊन कारवाई करण्याचे आदेश आज दिले. हे संयुक्‍त पथक पहाटे चार वाजताच मार्केट यार्डसमोर गेले. मात्र विक्रेत्यांनी महापालिकेच्या दक्षता पथकाला जुमानले नाही. दक्षता पथकाच्या आवाहनाकडे त्यांनी कानाडोळा केला. मात्र, सकाळी सातनंतर पोलिसांच्या वाहनांचे सायरन वाजताच विक्रेत्यांनी गाशा गुंडाळला. 

मागील वर्षीचे नियोजन यंदा नाही 

मागील वर्षी तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी मार्केट यार्ड बंद ठेवले होते. मात्र, नेप्ती बाजार समितीत भाजीबाजार भरविला होता. नेप्ती बाजार समितीही केडगावपासून दूर आहे. शिवाय, या बाजार समितीत विक्रेत्यांना एकाआड एक गाळे खुले ठेवण्याची परवानगी दिली होती. हे नियोजन यंदा न दिसल्याने मार्केट यार्ड रस्त्यावरच भाजीबाजार भरत असल्याची चर्चा विक्रेत्यांमध्ये होती. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख