लोक रस्त्यावर मरतात, पालकमंत्री मुश्रीफ काय करतात : राम शिंदे यांचा टोला - People die on the streets, what does Guardian Minister Mushrif do: Ram Shinde | Politics Marathi News - Sarkarnama

लोक रस्त्यावर मरतात, पालकमंत्री मुश्रीफ काय करतात : राम शिंदे यांचा टोला

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 16 एप्रिल 2021

राज्य सरकारला परिस्थिती हाताळण्यात पूर्णपणे अपयश आले आहे. जिल्हा प्रशासनाच्या आवाक्‍याच्या बाहेर गेली आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना जिल्ह्याचे प्रशासन सोडविण्यास वेळ नाही.

नगर : कोरोना परिस्थिती हाताळण्यात सरकारला अपयश आले आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ जिल्ह्याचे प्रश्‍न सोडविण्यास वेळ देत नाही. त्यांचा प्रशासनावर वचक राहिलेला नाही. कोरोना रुग्णांना ऑक्‍सिजन, रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन मिळत नाही. लोक रस्त्यावर मरत आहे, ही परिस्थिती अत्यंत दुर्दैवी आहे. राज्य सरकार ही परिस्थिती हाताळण्यात अयशस्वी ठरले आहे, अशी टीका माजी मंत्री राम शिंदे यांनी केली. 

भारतीय जनता पक्षाचे राज्य सरचिटणीस व माजी मंत्री राम शिंदे, आमदार बबनराव पाचपुते, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांच्या शिष्टमंडळाने कोरोनाच्या परिस्थितीवर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची भेट घेतली. कोरोना उपचारासाठी सुविधा वाढविण्याच्या मागणीचे निवेदन दिले. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

शिंदे म्हणाले की, राज्य सरकारला परिस्थिती हाताळण्यात पूर्णपणे अपयश आले आहे. जिल्हा प्रशासनाच्या आवाक्‍याच्या बाहेर गेली आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना जिल्ह्याचे प्रशासन सोडविण्यास वेळ नाही. जिल्हा प्रशासनावर कोणताही वचक राहिलेला नाही. त्यामुळेच सर्वाधिक रुग्ण असलेल्या दहा जिल्ह्यात नगर जिल्ह्याचा समावेश होत आहे. जिल्हा प्रशासनाच्या परिस्थिती आवाक्‍याच्या बाहेर गेली आहे. रुग्णांना औषधोपचार मिळत नाहीत. ऑक्‍सिजन, रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन मिळत नाही. रुग्ण रस्त्यावर मरून पडत आहेत. एवढी भयानक परिस्थिती झाली आहे. 
राज्यात 144 कलम लागू करण्यात आले आहे. त्यामुळे आंदोलने, मोर्चाद्वारे म्हणणे सादर करता येत नाही. जनतेच्या मनात तीव्र नाराजी निर्माण झालेली आहे. 

बागा जळाल्यावर पाणी 

कुकडी प्रकल्पाचे पाणी जिल्ह्यातील दक्षिणेतील श्रीगोंदे, कर्जत, जामखेड तालुक्‍याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे.6 या भागातील फळबाग पाण्याअभावी जळून जात आहेत. कर्जत-जामखेडच्या लोकप्रतिनिधींना याकडे लक्ष देण्यास वेळ नाही. कुकडी प्रकल्पाचे आवर्तनाचे पाणी थेट 10 मे रोजी मिळणार आहे. तोपर्यंत बागा जळून जातील. त्यांचे सर्व लक्ष बाहेर आहे, अशी टीका आमदार रोहित पवार यांचे नाव न घेता, शिंदे यांनी केली. 

 

हेही वाचा...

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख