परमवीर सिंग यांची चौकशी केली पाहिजे : हसन मुश्रीफ  - Paramvir Singh should be questioned: Hasan Mushrif | Politics Marathi News - Sarkarnama

परमवीर सिंग यांची चौकशी केली पाहिजे : हसन मुश्रीफ 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 30 एप्रिल 2021

विशेष म्हणजे परमवीर सिंग यांचे अंडरवर्ल्डशी संबंध होते, ही पुढे आलेली बाब अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे या प्रकरणाची आता राज्य सरकारने चौकशी करण्याची मागणी केली.

नगर : "माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या संदर्भात 100 कोटींबाबत चौकशी केली जाते; मात्र परमवीर सिंग यांच्या संदर्भामध्ये एक हजार कोटीचा दावा केला जात असताना त्याची चौकशी आता व्हायला पाहिजे. विशेष म्हणजे परमवीर सिंग यांचे अंडरवर्ल्डशी संबंध होते, ही पुढे आलेली बाब अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे या प्रकरणाची आता राज्य सरकारने चौकशी करण्याची मागणी केली,'' अशी माहिती ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

नगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आढावा बैठक झाल्यानंतर ते बोलत होते. यावेळी आमदार रोहित पवार, बबनराव पाचपुते, लहू कानडे, किरण लहामटे, आशुतोष काळे, तसेच जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, महापालिकेचे आयुक्त शंकर गोरे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित आदी उपस्थित होते. 

मुश्रीफ म्हणाले, ""शंभर कोटी रुपयांच्या संदर्भामध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची चौकशी होते; मात्र ज्या परमवीर सिंह यांच्या संदर्भामध्ये एक हजार कोटीचा आरोप होतो व अकोला येथे गुन्हा दाखल होतो, त्याची मात्र चौकशी होत नाही. दोन दिवसांपूर्वी तक्रार केली. त्यामध्ये त्यांनी त्यांचे अंडरवर्ल्ड गुन्हेगारीशी संबंध असल्याचे म्हटले आहे. म्हणून आता या प्रकरणाची राज्य सरकारने चौकशी तत्काळ केली पाहिजे, असे ते म्हणाले. 

मुश्रीफ म्हणाले, की रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनचा पुरवठा निर्यातबंदीनंतर कमी झाला आहे. पूर्वी राज्याला 50 हजार मिळत होते. आता 26 हजार मिळतात, ही वस्तुस्थिती आहे. कच्चा माल येथे तयार करणे व इंजेक्‍शन सेटिंगला दहा दिवस लागत असल्याचे कारण सांगितले जाते. मात्र, दुसरीकडे भाजपच्या लोकांना इंजेक्‍शन कसे मिळते, असा सवाल त्यांनी या वेळी केला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख