जामखेडमध्ये "ऑक्‍सिजन लेव्हल' घटली  - 'oxygen level' dropped in Jamkhed | Politics Marathi News - Sarkarnama

जामखेडमध्ये "ऑक्‍सिजन लेव्हल' घटली 

वसंत सानप
शुक्रवार, 16 एप्रिल 2021

नगर जिल्ह्यात पाच ऑक्‍सिजन प्लॅंट असून, त्यांपैकी तीन नगर एमआयडीसीत आहेत. त्यांतील दोन प्लॅंटद्वारे जिल्हा ग्रामीण रुग्णालय व विळद घाटातील हॉस्पिटलला ऑक्‍सिजनचा पुरवठा केला जातो.

जामखेड : तालुक्‍यात कोरोना रुग्णांकरिता लागणाऱ्या प्राणवायूचा तुटवडा निर्माण झाला आहे. जामखेडला रोज 200 ऑक्‍सिजन सिलिंडरची गरज आहे. प्रत्यक्षात मात्र 90 ते 100 सिलिंडरच मिळत आहेत. त्यामुळे रुग्णांना ऑक्‍सिजन पुरवठा कसा करायचा, असा प्रश्‍न ऐरणीवर आल्याने कोविड सेंटरचालकच "ऑक्‍सिजन'वर आहेत.

नगर जिल्ह्यात पाच ऑक्‍सिजन प्लॅंट असून, त्यांपैकी तीन नगर एमआयडीसीत आहेत. त्यांतील दोन प्लॅंटद्वारे जिल्हा ग्रामीण रुग्णालय व विळद घाटातील हॉस्पिटलला ऑक्‍सिजनचा पुरवठा केला जातो. केवळ एका प्लॅंटद्वारे जिल्हाभरात ऑक्‍सिजनचा पुरवठा होतो. संगमनेर व नेवासे येथील दोन प्लॅंट तेथील गरज भागवून अन्य तालुक्‍यांची ऑक्‍सिजनची गरज भागवतात. मात्र, दक्षिणेतील बहुतांश तालुके एमआयडीसीतील प्लॅंटवर अवलंबून आहेत. त्यामुळे मागणीप्रमाणे सिलिंडरचा पुरवठा होत नाही. 

जामखेड तालुक्‍याला सिलिंडरचा पुरवठा करणाऱ्या तीन एजन्सी आहेत. जामखेडला शासन-संस्था व लोकसहभागातून एक, तर तीन खासगी कोविड सेंटर आहेत. या चारही ठिकाणी मिळून 190 ऑक्‍सिजन बेड आहेत. तेथे 425हून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. जामखेडला रोज 200 ऑक्‍सिजन सिलिंडरची गरज आहे. मात्र, 90 ते 100 सिलिंडरचाच पुरवठा होत आहे.

उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या पाहता, सिलिंडरच्या पुरवठ्यात मोठी तफावत आहे. यासंदर्भात वेळीच दक्षता घेतली नाही, तर मोठ्या संकटाचा सामना करावा लागण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. 

बंदीमुळे पेच 

बीड, उस्मानाबाद, जालना, बारामती येथील प्लॅंटवरून जामखेडला ऑक्‍सिजन सिलिंडर मिळत होते. मात्र, तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी तेथील ऑक्‍सिजन सिलिंडर स्थानिक कोविड सेंटरला पुरविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे जामखेडकरांची संपूर्ण भिस्त नगर एमआयडीसीतील प्लॅंटवर अवलंबून आहे. दरम्यान, आमदार रोहित पवार यांच्या सहकार्यामुळे बीड येथील प्लॅंटमधून जामखेडच्या सीआरएचपीच्या कोविड सेंटरकरिता रोज पन्नास सिलिंडर दिले जातात. हा केवळ अपवाद आहे. 

 

Edited By- Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख