जिल्हा रुग्णालयातच होणार ऑक्‍सिजननिर्मिती, मंत्री तनपुरेंनी केली पाहणी - Oxygen generation will be done in the district hospital itself | Politics Marathi News - Sarkarnama

जिल्हा रुग्णालयातच होणार ऑक्‍सिजननिर्मिती, मंत्री तनपुरेंनी केली पाहणी

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 22 एप्रिल 2021

तनपुरे गुरुवारी दिवसभर नगरमध्ये होते त्यांनी जिल्हाधिकारी कार्यलय येथे येऊन निवासी उपजिल्हाधिकारी यांची भेट घेऊन जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला.

नगर : जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या पाहता राज्याचे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्‍त तनपुरे यांनी आज जिल्हा रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी कोरोना रुग्णांचा वॉर्ड व हवेतून ऑक्‍सिजन तयार करणाऱ्या जिल्हा रुग्णालयात उभारल्या जाणाऱ्या प्रकल्पाची पाहणी केली. 

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी जिल्हा रुगणालयास भेट देऊन येथील विविध विभागांची पाहणी केली यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा उपस्थित होते. यावेळी त्यांनी अनेक रुग्णांचे नातेवाईक यांची देखील चौकशी केली. यावेळी प्राजक्त तनपुरे म्हणाले, ""जिल्हा रुग्णालयात हवेतून ऑक्‍सिजन तयार करण्याचे प्लॅंटचे काम अंतिम टप्यात आले आहे. त्यामुळे लवकर येथील रुग्णांना दिलासा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

तनपुरे गुरुवारी दिवसभर नगरमध्ये होते त्यांनी जिल्हाधिकारी कार्यलय येथे येऊन निवासी उपजिल्हाधिकारी यांची भेट घेऊन जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच जिल्ह्यातील अनेक नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे आता त्यांनी दुसरा डोस घेणे महत्त्वाचे आहे. जिल्ह्यातील लसीकरण केंद्रांची संख्या वाढवण्यात येऊन लसीकरणासाठी आलेले नागरिकांना सोयी सुविधा देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांनी नियमाचे पालन करून घरीच राहावे व कोरोनाला हद्दपार करावे, असे आवाहन त्यांनी केले. 

हेही वाचा...

महापालिकेने ऑक्‍सिजन प्लॅंट उभारावा 

नगर : शहरातील वाढता कोरोना प्रादुर्भाव पाहता महापालिकेने पुढाकार घेऊन ऑक्‍सिजन प्लॅंट उभारावा, अशी मागणी शिवसेनेच्या नेते व नगरसेवकांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले व महापालिका आयुक्‍त शंकर गोरे यांच्याकडे केली आहे. 

शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आज जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांची कार्यालयात जाऊन भेट घेतली. यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, संभाजी कदम, गणेश कवडे, परेश लोखंडे, सुवेंद्र गांधी, राहुल रासकर आदी उपस्थित होते. शिष्टमंडळाने शहरात महापालिकेकडून ऑक्‍सिजन प्लॅंट बसविला जावा, अशी मागणी केली. जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत महापालिका आयुक्‍तांशी चर्चा करणार असल्याचे सांगितले.

शिवसेनेच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्‍तांकडेही ऑक्‍सिजन प्लॅंटची मागणी केली. हा प्लॅंट सुरू करण्यासाठी 12 ते 15 लाख रुपये खर्च येतो. महापालिका आयुक्‍तांना 25 लाख रुपयांपर्यंत खर्च करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे त्यांनी हा प्रकल्प उभारण्याचे आदेश तातडीने द्यावेत, अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केली. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख