भाजपच्या स्थापना दिनानिमित्त विखे पाटलांच्या वाड्यावर फडकला पक्षध्वज - On the occasion of BJP's founding day, the party flag was hoisted at Vikhe Patil's palace | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपच्या स्थापना दिनानिमित्त विखे पाटलांच्या वाड्यावर फडकला पक्षध्वज

सतीश वैजापूरकर
मंगळवार, 6 एप्रिल 2021

चार दशकांपूर्वी कार्यकर्त्यांनी शिर्डी ग्रामपंचायतीवर राज्यात पहिल्यांदा पक्षाचा झेंडा फडकविला. आज जिल्ह्यातील अनेक मातब्बर नेत्यांच्या घरांवर कमळाचे झेंडे फडकत आहेत.

शिर्डी : अवघ्या चाळीस वर्षांच्या वाटचालीत भाजप देशभर वेगाने फैलावला. कॉंग्रेसच्या प्रस्थापित नेत्यांसोबत चिवटपणे झुंज देत कार्यकर्त्यांनी हा पक्षविस्तार केला. आधी उपहास, नंतर संघर्ष आणि आता मान्यता, हे तीन टप्पे पार करणाऱ्या भाजपला सत्तास्थानी पोचविण्यात नगर जिल्ह्यातील समर्पित नेते व कार्यकर्त्यांचे मोलाचे योगदान लाभले आहे. 

चार दशकांपूर्वी कार्यकर्त्यांनी शिर्डी ग्रामपंचायतीवर राज्यात पहिल्यांदा पक्षाचा झेंडा फडकविला. आज जिल्ह्यातील अनेक मातब्बर नेत्यांच्या घरांवर कमळाचे झेंडे फडकत आहेत. या परिवर्तनात सूर्यभान वहाडणे, अण्णा पाटील कदम, कृष्णराव बडदे, ऍड. राजाभाऊ झरकर, शंकरलाल जाजू, ल. का. देशपांडे आणि चंपालाल सांड आदी समर्पित नेत्यांच्या मोलाचा वाटा आहे. 

त्या काळात जुन्या मोटारसायकलवर बसून सूर्यभान वहाडणे वाड्या-वस्त्यांवर पक्षविस्तारासाठी फिरायचे. ते पुढे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष झाले. त्यांच्या कारकिर्दीत भाजप राज्यात पहिल्यांदा सत्तेत आला. राहुरीचे अण्णा पाटील कदम यांच्या देवळाली प्रवरा सेवा संस्थेवर त्या काळापासून पक्षाचे वर्चस्व राहिले. ऍड. राजाभाऊ झरकर संघटनमंत्री होते. त्यांनी गावोगावी कार्यकर्ते उभे केले. रामभाऊ म्हाळगी, उत्तमराव पाटील, सूर्यभान वहाडणे, मोतीराम लहाने यांच्यानंतरची गोपीनाथ मुंडे व प्रमोद महाजन ही जोडगोळी मैदानात आली.

रणनीतीकार वसंतराव भागवत यांनी पक्षाची फेरमांडणी केली. "माधव'चा प्रयोग त्यांनी यशस्वी करून दाखविला. पदवीधर मतदारसंघातून प्रा. ना. स. फरांदे आमदार झाले. तोपर्यंत पक्षवाढीसाठी जिल्ह्यात ज्ञानदेव खेतमाळस, बंडोपंत कुलकर्णी, विष्णुपंत देहाडराय, तुळशीराम मुळे, वसंतराव चांदेकर, बाबूराव पुरोहित, दिलीप संकलेचा, आसाराम ढूस, चंद्रशेखर कदम, पी. डी. देशमुख, राधावल्लभ कासट, राधेश्‍याम व्यास, रामदास खैरे, अशा अनेक कार्यकर्त्यांनी मोठे योगदान दिले. 

साखरसम्राटांच्या या जिल्ह्यात मुंडे- महाजन जोडगोळीने फासे टाकायला सुरवात केली. कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्याला मोठा हादरा बसला. भीमराव बडदे यांच्या रूपाने जिल्ह्यात भाजपला पहिला खासदार मिळाला. पुढे दक्षिण नगरमध्ये दिलीप गांधी खासदार झाले. कोणे एके काळी कॉंग्रेसचे, त्यानंतर राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेल्या या जिल्ह्यात भाजपने स्वतःचे असे वेगळे स्थान निर्माण केले. 

वाजपेयींचा सायकलवरून प्रवास 

जनसंघाच्या संघटनात्मक बांधणीसाठी त्यावेळचे खासदार अटलबिहारी वाजपेयी नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. वाहन न मिळाल्याने त्यांनी बेलापूर ते पढेगावदरम्यानचा प्रवास बद्री शिंदे या कार्यकर्त्याच्या सायकलच्या नळीवर डबल सीट बसून केला. अशा अनेक सोनेरी आठवणी भाजपच्या जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी जपून ठेवल्या आहेत. आजही भाजपमध्ये संघटनेला सर्वाधिक महत्त्व आहे. 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख