परिचारिका, वॉर्ड बॉयकडून नगरमध्ये रेमडेसिव्हिरचा काळाबाजार  - Nurse, the black market of Remdesivir from Ward Boy | Politics Marathi News - Sarkarnama

परिचारिका, वॉर्ड बॉयकडून नगरमध्ये रेमडेसिव्हिरचा काळाबाजार 

गोरक्षनाथ बांदल
गुरुवार, 15 एप्रिल 2021

नगर-पुणे महामार्गावर केडगाव उपनगरात एका रुग्णालयातील परिचारिका आणि वॉर्ड बॉयला रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन 18 हजार रुपयांना काळ्या बाजारात विकताना पकडण्यात आले.

नगर : कोरोना रुग्णांना रेमडेसिव्हिर औषध देणाऱ्या परिचारिका आणि वॉर्ड बॉय यांच्याकडूनही काळाबाजार केला जात असल्याचा एक प्रकार केडगाव उपनगरात उघडकीस आला.

परिचारिका ईशा राजू जाधव व शुभम विजय नांदूरकर (दोघे रा. संकल्प कॉलनी, बुऱ्हाणनगर) या दोन आरोपींविरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नगर-पुणे महामार्गावर केडगाव उपनगरात एका रुग्णालयातील परिचारिका आणि वॉर्ड बॉयला रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन 18 हजार रुपयांना काळ्या बाजारात विकताना पकडण्यात आले. परिचारिका ईशा राजू जाधव व शुभम विजय नांदूरकर हे दोघे रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन घेऊन मंगळवारी (ता. 13) रात्री सव्वाअकरा वाजता नालेगावातील गाडगीळ पटांगण येथे एका व्यक्‍तीला अठरा हजार रुपयांना विकत होते. पोलिसांना याबाबत खबऱ्यांकडून माहिती मिळाली. त्यानुसार सापळा लावून या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून अठरा हजार रुपये जप्त करण्यात आले. सहायक पोलिस निरीक्षक नितीन रणदिवे तपास करीत आहेत. 

इंजेक्‍शनच्या खात्रीची गरज 

पोलिसांच्या तपासात संबंधित रुग्णालयातील 12 रुग्णांना रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन देण्यात आले. त्यांच्याकडील औषधाचे सर्व रेकॉर्ड व्यवस्थित आहे. त्यामुळे परिचारिका आणि वॉर्ड बॉय एखाद्या रुग्णाला प्रत्यक्ष इंजेक्‍शन न देता ते काळ्या बाजारात विकत असल्याची शक्‍यता आहे. कोरोना रुग्णांच्या नातेवाइकांनी इंजेक्‍शन दिल्याची स्वतः खात्री करून घ्यावी. 

 

हेही वाचा..

आमदार कानडेंनी केली कोविड सेंटरची पाहणी 

श्रीरामपूर : शिरसगाव येथील आदिवासी मुलांच्या व मुलीच्या वसतिगृहात उभारलेल्या शासकीय कोविड सेंटरला आमदार लहू कानडे, प्रांताधिकारी अनिल पवार यांनी भेट देऊन आज सुविधांची पाहणी केली. 

कोविड सेंटरमधील पिण्याच्या पाण्यासह रस्तादुरुस्तीच्या सूचना आमदार कानडे यांनी संबंधितांना दिल्या. कोविड सेंटरमध्ये काही रुग्ण तंबाखू खाऊन थुंकत असल्याचे आढळल्याने कारवाईच्या सूचना देण्यात आल्या. शिरसगाव ग्रामपंचायतीने वसतिगृहामध्ये पाणीपुरवठा योजनेची जोडणी केली. त्याचे काम तातडीने पूर्ण केले जाणार असल्याने, आता टॅंकरच्या पाण्याची गरज भासणार नाही. येत्या काळात ग्रामीण रुग्णालयासोबत आणखी एक रुग्णालय अधिग्रहीत करून ऑक्‍सिजन बेडच्या सुविधेसाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा सुरू असल्याचे आमदार कानडे यांनी सांगितले. प्रांताधिकारी अनिल पवार, प्रभारी तहसीलदार दीपक गोवर्धने, पोलिस निरीक्षक संजय सानप, तालुका आरोग्याधिकारी डॉ. मोहन शिंदे व ज्ञानेश्वर मुरकुटे, सतीश बोर्डे, राजेंद्र औताडे उपस्थित होते. 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख