थोरात आणि माझ्या विरोधात कोणीही गरळ ओकू नये : आमदार डाॅ. लहामटे - No one should lash out against Thorat and me: MLA Dr. लहामटे | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक
कोल्हापूर : खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनास सुरवात

थोरात आणि माझ्या विरोधात कोणीही गरळ ओकू नये : आमदार डाॅ. लहामटे

शांताराम काळे
शुक्रवार, 23 एप्रिल 2021

बाळासाहेब थोरात हे अकोले तालुक्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आले होते. त्यांचा आणि माझा येण्याच्या अगोदरच संपर्क झाला होता.

अकोले : मंत्री बाळासाहेब थोरात यांचे अकोले तालुक्यासाठी कायमच मोठे योगदान आहे. ते नाकारता येणार नाही, पण सध्या सोशल माध्यमात आमच्या दोघांच्या विरोधात गरळ ओकण्याचा प्रयत्न केला जात आहे, तो अतिशय खेदजनक आहे, असे मत आमदार डॉ. किरण लहामटे यांनी व्यक्त केले.

मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अकोले येथील आढावा बैठकीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष रवी मालुंजकर यांनी गोंधळ घातल्यावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहे. याबद्दल आमदार डॉ. लहामटे यांनी नाराजी व्यक्त केली.

या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या तालुक्यातील नेते मंडळींनी पत्रकार परिषद घेत आमदार लहामटे यांच्यावर टीका केली होती. या संदर्भात लहामटे यांनी पत्रकारांशी बोलताना मत व्यक्त केले. त्याच अनुषंगाने राष्ट्रवादी व काँग्रेसचे कार्यकर्ते स्वतःच्या नेत्यांच्या समर्थनार्थ सध्या एकमेकावर सोशल माध्यमात तुटून पडले आहेत. त्यामुळे सध्या संगमनेर-अकोले असा दुजाभाव केला जात असल्या बद्दल आमदार लहामटे यांना खंत व्यक्त केली.

आमदार लहामटे म्हणाले, की बाळासाहेब थोरात हे अकोले तालुक्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आले होते. त्यांचा आणि माझा येण्याच्या अगोदरच संपर्क झाला होता. त्यांनी अकोले तालुका असेल किंवा संगमनेर तालुका असेल असा कधी दुजाभाव केला नाही. अकोले तालुक्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचीही ग्वाही थोरात यांनी दिली आहे. त्या आढावा बैठकीत जो गोंधळ झाला. याचे मी नक्कीच समर्थन करणार नाही. त्या व्यक्तीच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या, पण त्या व्यक्त करण्याची पध्दत नक्कीच चुकली होती. त्याबद्दल मी त्यांना समजही दिली आहे. आणि त्या विषयी थोरात यांच्याशीही मी चर्चा केली आहे. तरी काही नेते व कार्यकर्ते त्या प्रकरणाला वेगळे वळण देत आहेत. हे खुप क्लेशदायक आहे. माझी काम करण्याची पद्धत जनतेत जाऊन त्यांना मदत करण्याची असल्याने हे काहींना पटणारे नाही. पण सध्या चालू असलेला कठीण काळ बघता मी कोणत्याही गोष्टीचे राजकारण करणार नाही. मला प्रथम तालुक्यातील जनतेचे आरोग्य महत्वाचे आहे. तरी कुणीही चुकीच्या पद्धतीने राजकारण करू नये, असे आवाहन आमदार डॉ. लहामटे यांनी केले आहे.

थोरात यांनी कोणत्याही प्रकारचा अकोले तालुक्याविषयी दुजाभाव केला नाही, कारण ते राज्याचे नेते आहेत. राष्ट्रवादी कार्यकर्त्यानी कोणतेही चुकीचे मेसेज सोशल माध्यमात फिरवू नये, असे आवाहन डॉ. लहामटे यांनी केले. 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख