रुग्णवाहिकेची मागणीच नाही, केवळ राजकीय हेतूने त्रास देण्याचा प्रयत्न : लोखंडे - No ambulance demand, just an attempt to harass for political motives: Lokhande | Politics Marathi News - Sarkarnama

रुग्णवाहिकेची मागणीच नाही, केवळ राजकीय हेतूने त्रास देण्याचा प्रयत्न : लोखंडे

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 15 मे 2021

खासदार लोखंडे यांच्या अंगरक्षकाने सामाजिक कार्यकर्ते उदय लिप्टे यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर पढेगाव ग्रामस्थांनी खासदार लोखंडे यांची आज भेट घेतली.

श्रीरामपूर : रुग्णवाहिकेसाठी आपल्याकडे कुठल्याही व्यक्तीने मागणी केलेली नसून, केवळ राजकीय हेतूने, तसेच कुणाच्या तरी सांगण्यावरून आपणास त्रास देण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती खासदार सदाशिव लोखंडे यांनी दिली. 

खासदार लोखंडे यांच्या अंगरक्षकाने सामाजिक कार्यकर्ते उदय लिप्टे यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर पढेगाव ग्रामस्थांनी खासदार लोखंडे यांची आज भेट घेतली. 

लिप्टे हे आपले कार्यकर्ते असून, निवडणुकीत त्यांनी शिवसेनेचा प्रचार केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करणे योग्य आहे का, असा सवाल ग्रामस्थांनी खासदार लोखंडे यांना केला. त्यावर खासदार लोखंडे म्हणाले, हो. लिप्टे हे आपले कार्यकर्ते असून, आपण मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी असल्याने आपल्याकडे कामे घेऊन येणे, हा नागरिकांचा हक्क आहे. जनतेची कामे करण्यासाठी आपण निवडून आलो आहोत. मात्र, संबंधित व्यक्तीने आपल्याकडे अथवा आपल्या कार्यालयाकडे रुग्णवाहिकेसाठी कुठलीही मागणी केलेली नाही. 

केवळ राजकीय हेतूने आपणास त्रास देण्याचा उद्देश असून, हा प्रकार घडविणारी दुसरी व्यक्ती असण्याची शक्‍यता आहे. संबंधित व्यक्ती एकदा नव्हे, तर दोन वेळा निवासस्थानी आली होती. दोन्ही वेळी त्यांनी सुरक्षारक्षकाशी हुज्जत घातली, तसेच ज्या वाहनांची मागणी केली, ती वाहने रुग्णवाहिका नसल्याचे सांगूनदेखील त्यांनी वाहनांवरील कापड फाडून गोंधळ घातला. हे कृत्य संबंधितांनी कुणाच्या तरी सांगण्यावरून केले. वास्तविक, कारण जनतेसमोर आले पाहिजे, असेही खासदार लोखंडे म्हणाले. 

दरम्यान, या प्रकरणाची चर्चा महाराष्ट्रात सुरू आहे.

हेही वाचा...

जामखेडला होणार आॅक्सिजन प्रकल्प

खासदार लोखंडे यांनी उभी असलेली दोन्ही वाहने दाखवून, त्यांची रुग्णवाहिका होऊ शकते का, असा सवाल ग्रामस्थांना केला. 

पढेगाव येथे कोविड सेंटरसाठी बेड, पीपीई किट, तसेच औषधे उपलब्ध करून दिली आहेत. तेथील एका महिलेस पंतप्रधान निधीतून आर्थिक मदत मिळवून दिल्याचेही खासदार लोखंडे यांनी सांगितले. सरपंच किशोर बनकर, रणजित बनकर, ऍड. प्रवीण लिप्टे, दत्तात्रेय लिप्टे, गौरव कांदळकर, विकास झगडे, सचिन भुजबळ उपस्थित होते. 

 

 

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख