सत्तेतही राष्ट्रवादी, विरोधातही राष्ट्रवादीच

नगर महापालिकेत सध्या महाविकास आघाडीची सत्ता आहे, असे सांगितले जात असले तरी वस्तुस्थिती काही वेगळीच आहे.
Nagar Mahapalika1.jpg
Nagar Mahapalika1.jpg

नगर ः नगर महापालिका स्थापनेपासूनच अजब राजकीय रसायन ठरली आहे. राज्य व देशातील राजकीय गणिते येथे लागू होत नाहीत. सोयऱ्या-धायऱ्यांभोवती फिरणारे येथील राजकारण नेहमीच नागरिकांच्या चर्चेचा विषय ठरते. नगर महापालिकेत सध्या महाविकास आघाडीची सत्ता आहे, असे सांगितले जात असले तरी वस्तुस्थिती काही वेगळीच आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेसला आपण सत्तेत असल्यासारखे वाटत नाही.

नगर महापालिकेत शिवसेनेला सत्ता दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने बसपला बरोबर घेत भाजपला सत्ता दिली. राष्ट्रवादी व काँग्रेसने बाहेरून पाठिंबा देणे पसंत केले. भाजपने राष्ट्रवादीला विरोधी पक्षनेतेपद दिले. अडीच वर्षांनी महापौर निवडणूक आली. महापौरपदासाठी अनुसूचीत जाती महिला आरक्षण जाहीर झाले. या पदासाठी भाजपकडे उमेदवारच नाही. त्यामुळे महापौरपदाच्या स्पर्धेतून भाजप बाहेर पडले. राज्यात महाविकास आघाडी असल्याने शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते व आमदार संग्राम जगताप यांच्याशी यशस्वी चर्चा करून सत्ता मिळविली. शिवसेना व राष्ट्रवादी सत्तेत आले. 

हेही वाचा...

शिवसेनेचा महापौर तर राष्ट्रवादीचा उपमहापौर झाला. भाजप विरोधी पक्षांतील सर्वात मोठा पक्ष आहे. महापौर निवड होऊन दीड महिना झाला. तरीही भाजपकडून विरोधी पक्षनेताच ठरविण्यात आलेला नाही. याचा फायदा राष्ट्रवादीला होत आहे. त्यांच्याकडे पूर्वीचे विरोधी पक्षनेतेपद व सध्याचे उपमहापौरपद अशी दोन्हीपदे एकाच वेळी आहेत. त्यामुळे सत्तेतही राष्ट्रवादी व विरोधातही राष्ट्रवादीच असा महापालिकेतील अजब राजकीय गुंता आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या निर्णयांना विरोध करण्याऐवजी त्यांच्या समवेत बसूनच सत्तेचा आस्वाद घेण्यातच धन्यता मानली जात आहे. भाजप व राष्ट्रवादी शहर विकासासाठी एकत्र असल्याचे जाहीरपणे सांगत आहेत.

हेही वाचा...

कर्डिलेच ठरविणार
नगर महापालिकेतील राजकारण भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजी कर्डिले व राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप हेच ठरवत आहेत. संग्राम जगताप हे कर्डिले यांचे जावई आहेत. कर्डिले यांनी त्याच्या मोठ्या जावयाला महापौरपद मिळवून दिले होते. तर जगताप यांना दोन वेळा महापौर व दोन वेळा आमदार केले आहे. भाजपचा विरोधी पक्षनेता ठरविण्याचे अधिकार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कर्डिले यांना दिला आहेत. त्यामुळे भाजपने जरी विरोधी पक्षनेता जाहीर केला तरी तो कर्डिले-जगताप यांच्या मर्जीतीलच असेल अशी चर्चा सद्धा नगर शहरात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com