संगमनेर पोलिस हल्ला प्रकरणी 22हून अधिक आरोपी, चार अटकेत 

मोगलपुरा भागात गुरुवारी (ता. सहा) कोविडचे नियम डावलून गर्दी केलेल्या जमावाला पांगविण्यासाठी दाखविलेल्या काठीच्या धाकातून हे प्रकरण पेटले.
Crime.jpg
Crime.jpg

संगमनेर :  शहरातील तीन बत्ती परिसरात पोलिसांवर केलेल्या हल्ल्यातील सुमारे 22पेक्षा अधिक आरोपी निष्पन्न करण्यात पोलिसांना, सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून केलेल्या तपासात यश आले. त्यांपैकी चार जणांना आज (शनिवारी) पहाटे अटक करण्यात आली. 

उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल मदने, पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी शुक्रवारी सकाळपासून आरोपींच्या परिसरात छापासत्र सुरू केले होते. या प्रकरणातील मुसेब अलाउद्दीन शेख (वय 31, रा. अपनानगर), आसिफ मेहबूब पठाण (वय 31, रा. मोगलपुरा), युनूस मन्सूर सय्यद (वय 24, रा. गवंडीपुरा) व मोसीन इमाम शेख (वय 35, रा. जम्मनपुरा) या चौघांना अटक करण्यात आली. अटकेच्या भीतीने बहुतेक आरोपी पसार झाले आहेत. अटक केलेल्यांना आज दुपारी संगमनेरच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर उभे केले असता, त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या चौघांच्या चौकशीतून पोलिसांना अन्य संशयितांच्या माहितीसह इतरही गोष्टींची उकल करता येणार आहे. 

हेही वाचा...

मोगलपुरा भागात गुरुवारी (ता. सहा) कोविडचे नियम डावलून गर्दी केलेल्या जमावाला पांगविण्यासाठी दाखविलेल्या काठीच्या धाकातून हे प्रकरण पेटले. नंतर वातावरण चिघळल्याने जमावाने केलेल्या दगडफेकीत एका खासगी वाहनाची काच फुटली, तसेच अन्य वाहनांचे नुकसान झाले. पोलिसांना केलेल्या धक्काबुक्कीचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण तालुक्‍यात जनक्षोभ निर्माण झाला. घरदार सोडून, नागरिकांच्या सुरक्षेसाठी धोका पत्करून काम करणाऱ्या जवानांवर झालेल्या हल्ल्याचा विविध क्षेत्रांतून निषेध करण्यात आला. संगमनेरमधील तीन बत्ती चौक, गवंडीपुरा, शिवाजी महाराज पुतळा (अरगडे गल्ली), रंगार गल्ली, देवी गल्ली, नाइकवाडपुरा, सय्यदबाबा चौक व जोर्वे नाका हा भाग पोलिसांच्या दप्तरी पूर्वीपासून संवेदनशील घोषित करण्यात आला आहे. 

ही घटना घडण्यापूर्वी संगमनेरमध्ये गृहरक्षक दलाचे 23 जवान, आरसीपी कमांडोंची 25 जवानांची प्लाटून, स्थानिक 50 पोलिस, निरीक्षक दर्जाचा एक अधिकारी, असे सुमारे दीडशे जण बंदोबस्तासाठी तैनात होते. गुरुवारच्या घटनेनंतर मात्र बंदोबस्तात काहीशी वाढ झाली आहे. आश्वी, अकोले, घारगाव, लोणी, राजूर, शिर्डी वाहतूक शाखा व साईमंदिर, राहुरी व नियंत्रण कक्ष आदी ठिकाणांहून पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक, हवालदार, कॉन्स्टेबल व गृहरक्षक दल, असे 20 जणांचे अतिरिक्त पथक मागविण्यात आले आहे. 

कायदा-सुव्यवस्था नियंत्रणात

या घटनेनंतर शहरातील कायदा- सुव्यवस्थेची स्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. पोलिस त्यांचे काम चोखपणे करीत असल्याने, कोणत्याही अफवेची नागरिकांनी भीती बाळगू नये. या घटनेतील आरोपींना ताब्यात घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. 
- मुकुंद देशमुख, पोलिस निरीक्षक, शहर पोलिस ठाणे 

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com