संगमनेर तालुक्यातील प्रकल्पाला आॅक्सिजननिर्मितीसाठी आमदार विखेंची मदत - MLA Vikhe's help for oxygen generation project in Sangamner taluka | Politics Marathi News - Sarkarnama

संगमनेर तालुक्यातील प्रकल्पाला आॅक्सिजननिर्मितीसाठी आमदार विखेंची मदत

आनंद गायकवाड
रविवार, 2 मे 2021

लोहारे येथे भाऊराव पोकळे यांनी काही दिवसांपूर्वी साई गॅस या नावाने ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभा केला. मात्र हा प्रकल्प सुरू होण्यात काही प्रशासकीय अडथळे होते.

संगमनेर : संगमनेर तालुक्यातील लोहारे येथील साई गॅस निर्मिती प्रकल्पाला ऑक्सिजन तयार करण्यासाठी आवश्यक असलेला द्रवरुप पदार्थ ( लिक्वीड ) भाजपाचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपलब्ध करून दिल्याने या प्रकल्पातून आज ऑक्सिजन निर्मितीला प्रारंभ झाला. यामुळे जिल्ह्यातील नागरीकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

लोहारे येथे भाऊराव पोकळे यांनी काही दिवसांपूर्वी साई गॅस या नावाने ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभा केला. मात्र हा प्रकल्प सुरू होण्यात काही प्रशासकीय अडथळे होते. आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी तातडीने शिर्डी येथील अधिकाऱ्यांच्या बैठकीतून जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याशी संपर्क साधून हा प्रकल्प तातडीने सुरू होण्यासाठी आवश्यक परवाने तातडीने मंजूर करण्याची विनंती केली.

नाशिक येथील अन्न व औषध प्रशासन विभागातही विखे यांनी स्वतः जावून पाठपुरावा करून हा प्रकल्प सुरू होण्यातील सर्व अडथळे दूर केले होते. सध्याच्या कोविड संकटात ऑक्सिजनची भासणारी टंचाई दूर होण्यासाठी या प्रकल्पाला तातडीने लिक्विड मिळावे, यासाठी विखे पाटील यांनी विशेष पुढाकार घेवून शुक्रवारी (ता. 30) सुमारे 9 टन लिक्विडचे टँकर उपलब्ध करुन दिल्याने या प्रकल्पातून ऑक्सिजन निर्मितीला शनिवारपासून प्रत्यक्ष सुरवात झाली. या प्रकल्पातून एकूण 800 सिलेंडर ऑक्सिजन निर्माण करण्याचा मार्ग मोकळा झाला. या प्रकल्पाचा प्रारंभ आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

या वेळी शिर्डी विभागाचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे, साई गॅसचे प्रवर्तक भाऊसाहेब पोकळे उपस्थित होते. ऑक्सिजन निर्मितीला सुरवात झाल्याने याचा मोठा दिलासा जिल्ह्य़ातील जनतेला मिळेल, असा विश्वास आमदार विखे पाटील यांनी व्यक्त केला. यासाठी आवश्यक असलेल्या लिक्विडची उपलब्धता सातत्याने व्हावी, यासाठी आपला प्रयत्न सुरू राहाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पोकळे कुटुंबियांचा ऋणानुबंध जुनाच

या प्रकल्पाची उभारणी करणाऱ्या पोकळे कुटूंबियांचा आणि आमचा ॠणानुबंध खूप जुना आहे. भाऊराव पोकळे यांचे वडील आणि चुलते आमच्याकडे शेती मास्तर म्हणून कार्यरत आहेत. एका शेतकऱ्याच्या मुलाने जिरायती भागात सुरू केलेल्या या प्रकल्पाचे महत्व आजच्या संकटाच्या काळात अधोरेखीत झाले आहे.
- आमदार राधाकृष्ण विखे पाटील
 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख