संगमनेर : पीसीपीएनडीटी ( प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान कायदा) च्या कलमान्वये दाखल झालेल्या आरोपातून समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख ( इंदोरीकर ) यांची संगमनेरच्या जिल्हा सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. याबद्दल आज त्यांच्या ओझर खुर्द येथील निवासस्थानी आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी सदिच्छा भेट दिली.
या लढाईत आपण कालही महाराजांच्या बरोबर होतो, उद्याच्या लढाईतही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा सूचक संदेश आमदार विखे पाटील यांनी या भेटीतून दिला. या वेळी इंदोरीकर महाराज आणि त्यांच्या पत्नी या उभयतांचा यथोचित सत्कार करुन न्यायालयीन लढाईत यशस्वी झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
या वेळी विखे पाटील यांनी महाराजांकडुन न्यायालयीन निकालाची माहिती जाणून घेतानाच, भविष्यात या संदर्भात कराव्या लागणाऱ्या प्रक्रीयेवरही चर्चा केली. इंदोरीकर महाराज यांच्या विरोधात याचिका दाखल झाल्यानंतर आमदार विखे पाटील यांनी त्यांची भेट घेवून, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका जाहीर केली होती. आजच्या भेटीतूनही त्यांनी उद्याच्या लढाईत महाराजांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे संकेतच दिले आहेत.
या वेळी डॉ. विखे पाटील साखर कारखान्याचे संचालक रामभाऊ भूसाळ, भाजपचे नेते अॅड. रामदास शेजूळ, पंचायत समिती सदस्य गुलाबराव सांगळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरुनाथ उंबरकर, भाजयुमोचे जिल्हा सचिव सचिन शिंदे, रविंद्र गाढे आदी उपस्थित होते.
हेही वाचा...
शिर्डी विमानतळ होतेय हायटेक
पोहेगाव : दोन महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर शिर्डी विमानतळ आधुनिक व डिजिटल केले असून, यात आता डिजिटल स्क्रीन डिस्प्ले, सुरक्षेसाठी नवीनतम सीसीटीव्ही कॅमेरे, डिजिटल स्पीकर्स, बॅगेज बेल्ट व डिजिटल स्क्रीन यासह आधुनिक सुविधा व उपकरणे यांचा समावेश आहे. यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विमानतळ प्राधिकरण व प्रवाशांचा मोठा फायदा होईल, अशी माहिती महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी दिली आहे.
शिर्डी विमानतळाचे संचालक दीपक शास्त्री यांचे मार्गदर्शनाखाली दोन महिन्यांच्या अथक प्रयत्नानंतर विद्युत व दूरसंचारचे सहाय्यक कार्यकारी अभियंता अजय देसाई यांच्या टीमने सदर काम पूर्ण केले आहे.
प्रवाशांना व विमानतळ प्राधिकरण यांना या सेवांचा लाभ घेता येईल, अशी माहिती शिर्डी विमानतळाचे संचालक दीपक शास्त्री यांनी दिली आहे. याठिकाणी अत्याधुनिक सुविधा व्हाव्यात, यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी विमानतळ प्राधिकरणाकडे मागणी केली होती, तसेच पाठपुरावाही सुरु होता.
शिर्डी विमानतळवरुन मागील महिन्यात 25 तारखेला माल वाहतूकही सुरु करण्यात आली आहे. या ठिकाणी विमानांची संख्या वाढत आहे. या विमानतळास प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. नाईट लॅंडीगही येत्या दिड महिन्यांत सुरू करण्याचा प्रयत्न विमानतळ विकास प्राधिकरणाचा आहे.
Edited By - Murlidhar Karale

