रेमडेसिव्हिरला सुचविलाय आमदार रोहित पवारांनी पर्याय, केला हा प्रयोग - MLA Rohit Pawar suggested to Remadesivir that he did the experiment | Politics Marathi News - Sarkarnama

रेमडेसिव्हिरला सुचविलाय आमदार रोहित पवारांनी पर्याय, केला हा प्रयोग

मुरलीधर कराळे
गुरुवार, 15 एप्रिल 2021

क्सिजन थेरपी, विटामिन, स्टेरॉइड, ब्लड थिनर्सची एकत्रितपाने योग्य पद्धतीने उपचार केल्यास रुग्ण लवकर बरा होत असल्याचे निरीक्षण 'कोविड टास्क फोर्स'मधील डॉक्टरांनीही नोंदवले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

नगर : कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असलेले रेमडेसिव्हिर या इंजेक्शनचा राज्यभर तुटवडा असल्याने सर्वच संतप्त असताना आमदार रोहित पवार यांनी काही प्रयोगाअंती त्यावर पर्याय असल्याचे म्हटले आहे. त्यांनी सोशल मीडियावर याबाबत पोस्ट टाकली आहे.

ते म्हणतात, की कोरोना रुग्णांसाठी हे इंजेक्शन हा एकमेवर उपचार असल्याचा समज तयार झाला आहे. त्यामुळे प्रचंड मागणी वाढून तुटवडा निर्माण झाला. परंतु याबाबत वैद्यक तज्ज्ञांचं मत जाणून घेतले असता केवळ हे इंजेक्शन हा एकच उपाय नसल्याचे त्यांचे मत आहे. ऑक्सिजन थेरपी, विटामिन, स्टेरॉइड, ब्लड थिनर्सची एकत्रितपाने योग्य पद्धतीने उपचार केल्यास रुग्ण लवकर बरा होत असल्याचे निरीक्षण 'कोविड टास्क फोर्स'मधील डॉक्टरांनीही नोंदवले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आमदार पवार यांनी त्यांच्या जामखेड-कर्जत मतदारसंघात राबविलेल्या एका प्रयोगाचा दाखला दिला आहे. ते म्हणतात, की माझ्या मतदार संघात जामखेडमध्येही आरोळे हॉस्पिटलच्या कोविड सेंटरमधील डॉक्टरांनी स्वतंत्र उपचारपद्धती राबवत रेमडेसिव्हिर या महागड्या औषधाचा कमीत कमी वापर करत ३७०० रुग्णांना बरं केले आहे. या उपचार पद्धतीची माहिती मी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या माध्यमातून 'महाराष्ट्र कोव्हीड टास्क फोर्स'पर्यंत पोचवली आहे. मला वाटतं या उपचार पद्धतीबाबत अधिक संशोधन करून एक मॉडेल उपचार पद्धती संपूर्ण राज्यभरासाठी राबवता येईल का, याबाबत तज्ज्ञांनी विचार करायला हवा.

इतर राज्यांतही कोरोनाचा कहर

दरम्यान, उत्तरप्रदेश, गुजरात, बिहार, पश्चिम बंगालसह अनेक राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परिणामी औषध पुरवठा, मेडिकल इक्वीपमेंट, आरोग्य व्यवस्थेवरील ताण प्रचंड वाढतोय. यामुळं आपल्याला खूप सूक्ष्म नियोजन करावं लागणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारने ICMR च्या माध्यमातून पर्यायी उपचार पद्धतीबद्दल त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी पवार यांनी केली आहे.

दिला हा सल्ला

योग्य वेळी योग्य पावलं उचलणं गरजेचे असून, उशीर झाल्यास सामान्य जनतेला गंभीर परिणाम भोगावे लागतात. रेमडेसिव्हिर निर्यात तसेच भारताबाहेरील लसींना मान्यता देण्याबाबतीत जी दिरंगाई झाली, ती आपल्या देशाला परवडणारी नाही. आजपर्यंत चुका कुणी काय केल्या, याची उजळणी करण्यापेक्षा यापुढं चुका होणार नाहीत, याची काळजी सर्वांनीच घ्यावी आणि कोरोनाच्या महामारीतून देशाला बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षाही आमदार पवार यांनी व्यक्त केली आहे.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख