पुणेकरांनी नगरचा ऑक्‍सिजन पळविला, याचा जाब आमदार रोहित पवारांनी द्यावा - MLA Rohit Pawar should ask the answer to the question that Pune residents stole the oxygen of the city | Politics Marathi News - Sarkarnama

पुणेकरांनी नगरचा ऑक्‍सिजन पळविला, याचा जाब आमदार रोहित पवारांनी द्यावा

निलेश दिवटे
मंगळवार, 11 मे 2021

येथील लोकप्रतिनिधींनी निवडणुकीत ज्या वल्गना केल्या, त्याची पूर्तता करताना दिसत नाहीत. मात्र, मतदारसंघ सोडून राज्याच्या आणि देशाच्या राजकारणावर मत मांडताना ते दिसत आहेत.

कर्जत :  ""पुण्याच्या मंडळींकडून नेहमीच अन्याय होत आहे. त्यांनी नगरचा ऑक्‍सिजन पळविला. त्यामुळे अनेकांचा बळी गेला. याचा जाब आमदारांनी द्यावा,'' अशी मागणी माजी मंत्री प्रा. राम शिंदे (Ram shinde) यांनी केली. (MLA Rohit Pawar should ask the answer to the question that Pune residents stole the oxygen of the city)

तालुक्‍यातील राशीन, कर्जत येथील कोविड सेंटरला भेट व कुकडी लाभक्षेत्रातील पाण्याअभावी जळालेल्या पिकांची पाहणी, तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत प्रा. शिंदे बोलत होते. 

""येथील लोकप्रतिनिधींनी निवडणुकीत ज्या वल्गना केल्या, त्याची पूर्तता करताना दिसत नाहीत. मात्र, मतदारसंघ सोडून राज्याच्या आणि देशाच्या राजकारणावर मत मांडताना ते दिसत आहेत. हरकत नाही; मात्र कुकडीच्या पाण्याचे नियोजन करता आले नाही. कुकडी धरण क्षेत्रात चांगला पाऊस होऊनसुद्धा पाणी मिळाले नाही, हे दुर्दैव आहे. "कुकडी'च्या इतिहासात आवर्तनाला स्थगिती मिळणे प्रथमच घडते आहे. पालकमंत्र्यांनी टंचाई घोषित केली नाही, तसेच तहसीलदारांनी प्रस्ताव दिला नाही. त्यामुळे सर्व सोपस्कार पार पडून "कुकडी'चे पाणी येईल असे वाटत नाही. 

ते पुढे म्हणाले, ""कोरोनाबाबत रुग्णांची हेळसांड होत आहे. आवश्‍यक सुविधा मिळत नाहीत. लसीकरणाची उपजिल्हा रुग्णालयात गर्दी होते आहे. बाधित रुग्णही इथेच आहेत. त्यामुळे "लसीबरोबर कोरोनाही घेऊन जा' अशी परिस्थिती आहे. ते ठिकाण बदलून जवळील शासकीय विश्रामगृह अथवा समोरील बाजारसमितीमध्ये लसीकरण करावे. कोरोनाची तपासणी केलेल्यांचे अहवाल चार ते पाच दिवस विलंबाने येत आहेत. ते चोवीस तासांच्या आत तपासणी अहवाल मिळाला पाहिजे.'' 

हेही वाचा...

रक्षक बनला भक्षक

उपजिल्हा रुग्णालय अथवा गायकरवाडी येथील कोरोना सेंटरमध्ये रुग्णांना असुविधांचा सामना करावा लागत आहे. तेथे ऑक्‍सिजनची सुविधा नाही. रुग्णाला त्याच्या गावाजवळ असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा ग्रामपंचायतीने केलेल्या विलगीकरण कक्षात ठेवावे. या दोन्ही ठिकाणी पुरेसे मनुष्यबळ नसल्याने मृतदेहसुद्धा पडून राहत आहेत. तालुक्‍यात रेमडेसिव्हिरची टंचाई असून, आलेले व्हेंटिलेटर बेड परत गेले आहेत. 

तत्पूर्वी विविध मागण्यांचे निवेदन अप्पर आयुक्त भानुदास पालवे यांना देण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, जिल्हा बॅंकेचे संचालक अंबादास पिसाळ, तालुकाध्यक्ष डॉ. सुनील गावडे, सचिन पोटरे, प्रसाद ढोकरीकर, अशोक खेडकर, वैभव शहा, सुनील यादव, गणेश पालवे, अनिल गदादे आदी उपस्थित होते. 
 

 

 

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख