"कुकडी'च्या पाण्यासाठी आमदार पाचपुते यांचा आंदोलनाचा इशारा - MLA Pachpute warns of agitation for 'Kukdi' water | Politics Marathi News - Sarkarnama

"कुकडी'च्या पाण्यासाठी आमदार पाचपुते यांचा आंदोलनाचा इशारा

संजय आ. काटे
शनिवार, 8 मे 2021

येत्या 12 मे रोजी न्यायालयात सरकारने बाजू पटवून दिली पाहिजे. काय निर्णय होतोय ते पाहू; सकारात्मक निर्णय झाला नाही तर आम्ही धरण, कालव्यांवर आंदोलन करू.

श्रीगोंदे : "कुकडी (Kukadi) प्रकल्पातील डाव्या कालव्यातून आवर्तन सोडण्याचे नियोजन झाले; मात्र न्यायालयाने पिंपळगाव जोगे धरणातील अचल साठा सोडण्यास तूर्त स्थगिती दिली. त्यामुळे आवर्तन पुढे जाणार आहे. मात्र, नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर न सोडता सरकारने या भागातील लोकांसाठी हे पाणी किती महत्त्वाचे आहे, हे वास्तव सांगून पाणी सोडण्याची जबाबदारी घ्यावी. सरकार कमी पडल्यास, कोरोना संकट असले तरी आंदोलनाची आम्हाला सवय आहेच; आमचा संयम पाहू नये,'' असा इशारा आमदार बबनराव पाचपुते (Babanrao Pachpute) यांनी सरकारला दिला आहे. (MLA Pachpute warns of agitation for 'Kukdi' water)

पाचपुते म्हणाले, ""कुकडी प्रकल्पातून पिण्याच्या पाण्याचेच नियोजन करून, त्यातून फळबागांचे भरणे करावे, असे मला वाटत होते. त्याबाबत मंत्री व अधिकाऱ्यांशी बोललोही होतो. मात्र, शेतीचे नियोजन करून ठेवले. आता पिंपळगाव जोगे धरणातील अचल साठा सोडण्याला विरोध करणारी याचिका दाखल झाली आणि या पाण्याला न्यायालयाने तूर्त स्थगिती दिली. यापूर्वीचे जे झाले, ते बाजूला ठेवून आता डाव्या कालव्यावरील जुन्नर, पारनेर, श्रीगोंदे, कर्जत व करमाळा या तालुक्‍यांतील शेतकरी जगविण्यासाठी सरकारला तातडीने निर्णय घ्यावा लागेल. जलसंपदामंत्री जयंत पाटील, कर्जत- जामखेडचे आमदार रोहित पवार, पारनेरचे आमदार नीलेश लंके यांच्याशी चर्चा झाली आहे.

पिंपळगाव जोगे धरणातील अचल साठा उचलण्याच्या माध्यमातून तेथील शेतीला वापरण्यासाठी पाण्याची तरतूद झाल्याने त्यांची अडचण दूर होणार आहे. त्यामुळे त्यांच्या वाट्याचे पाणी त्यांना देऊन उर्वरित पाणी येडगाव धरणात आणले, तर डाव्या कालव्याचे आवर्तन सुरळीत होईल.'' 

हेही वाचा...

जामखेडमध्ये जनता कर्फ्यू

सरकार काय करतेय, याची आम्ही थोडे दिवस वाट पाहतोय, असे सांगत पाचपुते म्हणाले, """कुकडी'च्या पाण्यात राजकारण करण्याची सगळ्यांनाच गंमत वाटत आहे. शेतकरी भरडला जात असताना हे चांगले नव्हे. पाण्याबाबत चर्चा करायला अनेक समाजसेवक, नेते तयार झाले आणि ते जे सांगतील तेच खरे, असे सांगत सुटले आहेत. आम्ही चाळीस वर्षे याच संघर्षात मोठे झालो आहोत. त्यामुळे सगळ्यांनीच भान ठेवून चर्चा करावी. येत्या 12 मे रोजी न्यायालयात सरकारने बाजू पटवून दिली पाहिजे. काय निर्णय होतोय ते पाहू; सकारात्मक निर्णय झाला नाही तर आम्ही धरण, कालव्यांवर आंदोलन करू. कोरोनात घरी बसून मरण्यापेक्षा तेथे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मरण पत्करण्याची तयारी आहे.'' 

अभ्यास करा, मगच निवेदन द्या 

"कुकडी'च्या पाणीप्रश्नी एकत्र या, असे सांगणारे काही नेते एकटेच जाऊन जलसंपदामंत्र्यांना भेटतात, अशी खिल्ली उडवीत पाचपुते म्हणाले, ""अगोदर "कुकडी'चा अभ्यास करा, अधिकाऱ्यांशी बोला, समजून घ्या आणि मग प्रश्न हाती घ्या. मात्र, राजकारणात आता मोठे होण्याची स्वप्ने यांना पडू लागल्याने, मंत्र्यांना निवेदने देऊन त्याचे फोटो व्हायरल केले म्हणजे "कुकडी'चा प्रश्न सुटला, असे समजणाऱ्यांनी तालुक्‍याला ओळखले नसल्याचे लक्षात येते.'' 

 

 

 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख