शंभर बेडस उपलब्ध करून देण्याच्या आमदार मोनिका राजळे यांच्या सूचना - MLA Monica Rajale's suggestion to make 100 beds available | Politics Marathi News - Sarkarnama

शंभर बेडस उपलब्ध करून देण्याच्या आमदार मोनिका राजळे यांच्या सूचना

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 13 एप्रिल 2021

आमदार राजळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह व ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटरला भेट देवून रुग्णांची विचारपूस करत समस्या जाणून घेतल्या.

शेवगाव : तालुक्‍यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. रुग्णांना प्राथमिक वैद्यकीय सुविधा तत्काळ उपलब्ध करुन आधार द्यावा, वाढती रुग्णसंख्या लक्षात घेवून शंभर बेड उपलब्ध करुन देण्याच्या सूचना सूचना आमदार मोनिका राजळे यांनी अधिकाऱ्यांना केल्या. 

शेवगाव येथील ग्रामीण रुग्णालय व कोविड सेंटरला आमदार राजळे यांनी भेट दिली. त्यावेळी त्या बोलत होत्या. तहसीलदार अर्चना भाकड-पागिरे, तालुका आरोग्याधिकारी डॉ. सलमा हिराणी, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रामेश्‍वर काटे, डॉ. दीपक परदेशी, सहायक गटविकास अधिकारी बाळासाहेब कासार, सहायक पोलिस उपनिरीक्षक विश्‍वास पावरा, नायब तहसीदार रमेश काथवटे, विस्तार अधिकारी सुरेश पाटेकर, डॉ. विजय लांडे, नगरपरिषदेचे सोमनाथ नारळकर उपस्थित होते. 

आमदार राजळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह व ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटरला भेट देवून रुग्णांची विचारपूस करत समस्या जाणून घेतल्या. ग्रामीण रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर पिण्याच्या पाण्याची व सावलीची सोय करा, वाढती रुग्णसंख्या लक्षात घेवून शंभर बेड उपलब्ध करुन देण्याच्या सूचना तहसीलदार भाकड यांना दिल्या.

तालुक्‍यासाठी वाढीव लस लवकरच उपलब्ध करुन देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले. 

 

हेही वाचा...

सहायता केंद्रामुळे लसीकरणास वेग 

पाथर्डी : येथील उपजिल्हा रुग्णालयातील लसीकरण केंद्राबाहेर भाजप युवा मोर्चाचे माजी तालुकाध्यक्ष अमोल गर्जे व मुंकुद गर्जे यांनी लसीकरण सहायता केंद्र सुरू केले आहे.

उपजिल्हा रुग्णालयात लस घेण्यासाठी आलेल्या व्यक्तींचा ऑनलाइन नोंदणी करण्यात वेळ जात होता. लसीकरण केंद्रातही कमी मनुष्यबळ असल्याने नागरिकांच्या रांगा लागत होत्या. त्याची दखल घेवून अमोल गर्जे यांनी सहायता केंद्र सुरू केले. तेथे पाच ते सहा युवकांनी लसीकरणासाठी आलेल्यांची ऑनलाइन नोंदणी केली. त्यामुळे लसीकरण केंद्रातील कर्मचाऱ्यांचाही वेळ वाचला. नोंदणी झाल्याने दिवसभर चालणारे लसीकरणाचे काम दुपारी दीड वाजताच संपले. 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख