आमदार लंकेंच्या कोविड सेंटरला विदेशी पावले, पन्नास लाखांचा निधी जमा - MLA Lavin's Kovid Center gets overseas steps, raises Rs 50 lakh | Politics Marathi News - Sarkarnama

आमदार लंकेंच्या कोविड सेंटरला विदेशी पावले, पन्नास लाखांचा निधी जमा

मार्तंड बुचुडे
शनिवार, 24 एप्रिल 2021

सोशल मीडियाच्या माध्यमातून लंके यांच्यामार्फत आरोग्य केंद्रांची महती सर्वदूर पोहचली. त्यामुळे मदतीचा ओघ सुरू झाला आहे. निलेश लंके प्रतिष्ठाणच्या सेंट्रल बॅंकेतील खात्यावर अनेक नागरीक थेट मदत पाठवत आहेत.

पारनेर : आमदार निलेश लंके यांनी भाळवणी येथील नागेश्‍वर मंगल कार्यालयात सुरू केलेल्या शरदचंद्र पवार आरोग्य मंदिरासाठी देशविदेशातून मोठ्या प्रमाणात मदत निधी मिळत आहे. आतापर्यंत 50 लाख रुपयांहून अधिक जमा झाला आहे. याशिवाय गावागावांमधून दुध, धान्य, भाजीपाला, फळे, अंडी आरोग्य केंद्रामध्ये भेट म्हणून दिली जात आहेत. 

सोशल मीडियाच्या माध्यमातून लंके यांच्यामार्फत आरोग्य केंद्रांची महती सर्वदूर पोहचली. त्यामुळे मदतीचा ओघ सुरू झाला आहे. निलेश लंके प्रतिष्ठाणच्या सेंट्रल बॅंकेतील खात्यावर अनेक नागरीक थेट मदत पाठवत आहेत. गुगल तसेच फोन पेच्या माध्यमातूनही दररोज लाखो रुपयांची मदत जमा होत आहे. या मदतीची सबंधित व्यक्तीला आयकरातून सुट मिळणार आहे. 

तालुक्‍यातील प्राथमिक शिक्षकांनी साडेसहा लाखांपेक्षा अधिक मदत केली आहे. सेवानिवृत्तांनीही मदतीचा हात देताना एक लाख रूपयांची मदत दिली. विदेशातून अनेक तरुण थेट खात्यावर रक्कम पाठवित आहेत. 

या कोविडसेंटरमध्ये पारनेर, नगर मतदारसंघाबरोबरच जिल्ह्यातील विविध तालुक्‍यातील रुग्ण दाखल होत आहेत. रुग्ण दाखल करताना कोणताही भेदभाव केला जात नाही. प्रत्येकाची वैयक्तिक काळजी घेतली जाते. मागील वर्षीही लंके यांनी कर्जुलेहर्या येथे सुरू केलेल्या शरदचंद्र पवार आरोग्य मंदिरामध्येही साडेचार हजार रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले होते. 

साखरसम्राट काय करतात 

साखर कारखानदारांचा जिल्हा म्हणून नगर जिल्हयाची ओळख आहे. कोरोनाच्या महामारीचे मोठे संकट उभे राहिलेले असताना सहकारी साखर कारखानदारांनी कोविड सेंटर सुरू करण्यासाठी पुढाकार घेतलेला नाही. मात्र आमदार लंके यांनी लोकसहभागातून सुरु केलेले असे कोविड सेंटर देशात पहिलेच असावे. त्यामुळेच इंग्लंडमधील प्रसन्नकुमार व सुनीलकुमार या भारतीय वंशाच्या नागरिकांनाही प्रत्येकी 100 पौंडची (प्रत्येकी 10 हजार 500) मदत प्रतिष्ठानच्या खात्यावर वर्ग केली आहे. 

हेही वाचा...

भाळवणीत औषधाची फवारणी 

भाळवणी : पारनेर तालुक्‍यातील भाळवणी येथे गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. या परिस्थितीत येथील विठ्ठल रूक्‍मिणी चॅरिटेबल ट्रस्ट या सेवाभावी संस्थेंचे अध्यक्ष अशोक रोहोकले यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण गावात जंतू निर्जंतुकीकरणाचे सोडियम हायप्रोक्‍लोराईड या औषधाची फवारणी करण्यात आली.

या वेळी स्मशानभूमी, गावठान, शाळा परिसर व गावातील गल्लीबोळात फवारणी करण्यात आली. 

 

 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख