आमदार जगताप, मनपा सत्ताधाऱ्यांमुळे नगर शहर व्हेंटिलेटरवर ! काॅंग्रेसच्या काळे यांचा आरोप - MLA Jagtap, accused of blackmailing Congress on city ventilator due to municipal authorities | Politics Marathi News - Sarkarnama

आमदार जगताप, मनपा सत्ताधाऱ्यांमुळे नगर शहर व्हेंटिलेटरवर ! काॅंग्रेसच्या काळे यांचा आरोप

मुरलीधर कराळे
रविवार, 25 एप्रिल 2021

आमदारांच्या नेतृत्त्वाखाली महापालिकेत भाजप, राष्ट्रवादीची सत्ता आहे. त्यांची नागरिकांप्रती असणारी अनास्था व असंवेदनशीलतेमुळे मनपाने जबाबदारी पूर्णतः झटकली आहे.

नगर : शहरातील सत्ताधाऱ्यांच्या नियोजनशून्यतेमुळे नगर शहरातील हजारो लोकांना आज आरोग्य आणिबाणीला सामोरे जावे लागत असून, यांच्यामुळेच शहर व्हेंटिलेटरवर गेल्याचा आरोप काॅंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केला.

काळे यांनी महापालिकेतील भाजप - राष्ट्रवादीच्या सत्ताधाऱ्यांसह आमदार संग्राम जगताप यांच्यावर टीका केली. प्रसिद्धी पत्रकात ते म्हणतात, की आमदारांच्या नेतृत्त्वाखाली महापालिकेत भाजप, राष्ट्रवादीची सत्ता आहे. त्यांची नागरिकांप्रती असणारी अनास्था व असंवेदनशीलतेमुळे मनपाने जबाबदारी पूर्णतः झटकली असून, ही महामारी एक वर्षापासून सुरू असूनही  शहरामध्ये कोणतीही आरोग्यविषयक यंत्रणा ते उभी करू शकलेले नाहीत. 

एका रुग्णाला खासगी रुग्णालयामध्ये जावे लागल्यास दीड ते दोन लाख रुपयांचा खर्च येतो. एका कुटुंबात चार सदस्य आहेत, असे गृहीत धरले तरी नव्या स्ट्रेन प्रमाणे एका व्यक्तीस बाधा झाल्यास घरातील सर्व व्यक्तींना बाधा होते ,असे निरीक्षणात आले आहे. त्यामुळे एका कुटुंबाचा खासगी रुग्णालयातील खर्च हा साधारणतः सहा ते आठ लाख रुपयांच्या घरात जातो आहे.

लॉकडाऊन मुळे रोजगार बंद असताना सर्वसामान्य नागरिक, गोरगरीबांना हा खर्च कोणत्याही परिस्थितीमध्ये परवडणारा नाही. प्रत्येक नागरिक खासगी रुग्णालयांमध्ये एवढा मोठा खर्च करून आरोग्य सुविधा मिळवू शकत नाही. 

शहरातील नागरिक कर भरतात. परंतु त्या बदल्यात नागरिकांना आरोग्य सुविधा देणारे मनपाचे एकही सुसज्ज रुग्णालय नाही. राज्यातील इतर महानगरपालिकांची स्वतःची अद्यावत सार्वजनिक आरोग्य व्यवस्था असून हॉस्पिटल्स अद्यावत आहेत याकडे काळे यांनी लक्ष वेधले आहे.

मंत्री थोरातांकडे केली मागणी

काळे यांनी काँग्रेसच्या वतीने महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कोरोना आढावा बैठकीमध्ये नगर शहरासाठी १००० बेडचे जम्बो ऑक्सिजन कोविड सेंटर उभे करण्याची मागणी केली आहे. थोरात यांनी महापालिका आयुक्तांना याबाबत तातडीने चाचपणी करण्याच्या सूचना बैठकीत दिल्या आहेत. या बैठकीनंतर काळे यांनी आमदारांवर टीका केली आहे. 
 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख