आमदार लंकेंच्या कोविड सेंटरला आयपीएस अधिकारी सुंबे यांची देणगी - MLA donates IPS officer to Lanka's Kovid Center | Politics Marathi News - Sarkarnama

आमदार लंकेंच्या कोविड सेंटरला आयपीएस अधिकारी सुंबे यांची देणगी

सनी सोनावळे 
बुधवार, 28 एप्रिल 2021

सुंबे यांचे डीसीपी ट्रॅफिक म्हणून उल्लेखनीय काम आहे. लॉकडाउन पाळत ठेवण्यासाठी त्यांनी ड्रोनचा वापर केला होता.

टाकळी ढोकेश्वर : पाडळी तर्फे कान्हुर (ता. पारनेर) येथील रहिवासी मात्र गुजरात राज्यातील सुरत जिल्ह्यात उपायुक्त पदावर काम करत असणारे आयपीएस अधिकारी प्रशांत सुंबे यांनी आमदार निलेश लंके यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटर ला ५१ हजार रूपयांची देणगी दिली आहे.

कोरोना आजाराचा प्रादुर्भाव संपुर्ण देशभर मोठ्या प्रमाणावर पसरत आहे. पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे आमदार निलेश लंके यांच्या पुढाकारातून अकराशे रूग्ण संख्या क्षमता असणारे शरदचंद्र पवार आरोग्य मंदिर कोविड सेंटर सुरू करण्यात आले. तालुक्यासह थेट परदेशातून भुमिपुत्र या करीता आर्थिक मदत पाठवत आहे. सुरत जिल्ह्यात उपायुक्त पदावर कार्यरत असणारे प्रशांत सुंबे यांनाही आपल्या मायभुमीची नाळ सोडली नाही. कोविड सेंटरची माहिती मिळाल्यानंतर आमदार लंके यांच्याशी संपर्क करून त्यांनी ही देणगी सुपुर्द केली आहे.

सुंबे यांचे डीसीपी ट्रॅफिक म्हणून उल्लेखनीय काम आहे. लॉकडाउन पाळत ठेवण्यासाठी त्यांनी ड्रोनचा वापर केला होता. सुरतची मोठी लोकसंख्या व ३५ लाख वाहनांचे व्यवस्थापन करण्याचे कठीण काम ते अतिशय सुस्थितीत करत आहेत.

पोलिसांसाठी प्रशिक्षणात सर्वसामान्यांशी कसे संवाद साधायचा आणि वेळ व तणावाचे कार्यक्षमतेने व्यवस्थापन कसे करावे, याविषयी त्यांनी सातत्याने ते मार्गदर्शन करतात. मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी याबाबत व्यक्तिशः कौतुक केले. नंतर हा प्रकल्प राज्य व देशभर राबविण्यात आला. राष्ट्रीय डायरेक्टर जनरल ऑफ पोलिस कॉन्फरन्स २०२० मध्ये या उपक्रमाचे राष्ट्रीय स्तरावर कौतुक झाले.तालुक्यातील सुरत स्थित नागरिकांनाही ते कायम सहकार्य करतात.

नागरीकांना आधार देण्याची गरज आहे. कोविड सेंटरच्या माध्यमातून लोकांची सेवा घडत आहे. माझे काय होईल, ते होईल, मात्र माझ्या लोकांचे जीवन अनमोल आहे. 
सर्व अन्नदान व आर्थिक मदत करणारे,शारीरिक योगदान देणारे प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी व सहकारी मित्रांचे मी आभार मानतो, असे मत आमदार नीलेश लंके यांनी व्यक्त केले.

आपला मतदारसंघ कुटुंब मानुन आमदार निलेश लंके हे काम करत आहेत. कोविड सेंटरचे काम आदर्शवत आहे. सर्व स्तरातून त्याकरीता मदत होत आहे. तालुक्याविषयी असणाऱ्या भावनेतून ही मदत केली आहे, अशी प्रतिक्रिया सुरतचे उपायुक्त प्रशांत सुंबे यांनी दिला.

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख