"वैद्यकीय'च्या अडचणी हटल्या, आता साईसंस्थानला बळ हवे मुख्यमंत्र्यांचे  - "Medical problems have been removed, now Sai Sansthan needs the strength of the Chief Minister | Politics Marathi News - Sarkarnama

"वैद्यकीय'च्या अडचणी हटल्या, आता साईसंस्थानला बळ हवे मुख्यमंत्र्यांचे 

सतीश वैजापूरकर
बुधवार, 21 एप्रिल 2021

ऑक्‍सिजन निर्मिती प्रकल्प सुरू झाल्यानंतर आणखी 230 ऑक्‍सिजन बेड तयार होतील. एवढेच नाही तर सध्या कोविड रूग्णालय असलेल्या धर्मशाळेत तब्बल एक हजार ऑक्‍सिजन बेडचे रूग्णालय सुरू करता येईल.

शिर्डी : ऑक्‍सिजन निर्मिती प्रकल्प, आरटीपीसीआर चाचणी प्रयोगशाळा, रेमेडेसिवीर इंजेक्‍शनसह अन्य औषधांची व वैद्यकीय सामुग्रीची खरेदी याबाबत साईसंस्थानला येणाऱ्या कायदेविषक अडचणी आज दूर झाल्या.

आता परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी या रूग्णालयाला तातडीने पाठबळ दिले, तर संपूर्ण जिल्ह्याला जिवघेण्या कोविड लाटेतून सुखरूप बाहेर काढण्यात, हे रूग्णालय महत्वाची भूमिका बजावू शकेल. 

कोविड रूग्णालयाच्या विस्तारासाठी व संचालनासाठी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून आपत्ती निवारणाचा अनुभव असलेल्या अधिकाऱ्याची तातडीने नियुक्ती करायला हवी. खास बाब म्हणून पुरेसे डॉक्‍टर, वैद्यकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करायला हवी. तसे झाले तर राज्यातील सर्वात मोठे दीड ते दोन हजार ऑक्‍सिजन बेडचे सुसज्ज कोविड रूग्णालय पुढील आठ ते दहा दिवसात उभे राहिल. शिवाय सध्याच्या रूग्णालयास मोठा आधार मिळेल. 

साईबाबांच्या झोळीत भाविकांनी दोन हजार कोटींहून अधिक दान जमा करून ठेवले आहेत. सध्या माणसे ऑक्‍सिजन वाचून तडफडून मरत आहेत. साईसंस्थानचा सुमारे सुमारे पावणे दोन कोटींचा ऑक्‍सिजन निर्मिती प्रकल्प पुढील दहा दिवसात उभा राहू शकतो. सरकारी दराने खुल्या बाजारातून हवी तेवढी रेमडेसिवीर इंजेक्‍शन, सी पॅप, बाय पॅप व व्हेंटीलेटर खरेदी करता येतील. सध्या साईसंस्थानकडे साडे सहाशे बेडचे कोविड रूग्णालय आहे. त्यात 130 ऑक्‍सिजन बेड आहेत.

ऑक्‍सिजन निर्मिती प्रकल्प सुरू झाल्यानंतर आणखी 230 ऑक्‍सिजन बेड तयार होतील. एवढेच नाही तर सध्या कोविड रूग्णालय असलेल्या धर्मशाळेत तब्बल एक हजार ऑक्‍सिजन बेडचे रूग्णालय सुरू करता येईल. त्यासाठी तेथे युध्दपातळीवर ऑक्‍सिजन निर्मिती प्लॅन्ट उभे करता येईल. मात्र त्यासाठी या क्षेत्राचा अनुभव व सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची क्षमता असलेला अनुभवी अधिकारी मुख्यमंत्र्यांनी तातडीने नियुक्त करायला हवा. तसे झाले तर हे रूग्णालय केवळ नगर नव्हे तर नाशिक व औरंगाबाद जिल्हाला देखील काही आधार ठरू शकेल. 

तर आणखी कोविड रुग्णालय शक्य

साईसंस्थानच्या पाठीशी सरकारी यंत्रणा उभी राहिली तर पुढील दहा ते पंधरा दिवसात युध्दपातळीवर तयारी करून आणखी एक हजार ऑक्‍सिजन बेडचे कोविड रूग्णालय उभे करता येईल. आता साईसंस्थानला ऑक्‍सिजन निर्मिती प्लॅन्ट, वैद्यकीय यंत्रसामुग्री व औषधे खरेदी करण्यास कुठलीही अडचण राहिलेली नाही, असे मत सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी व्यक्त केले.

 

Edited By - Murlidhar Karale

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख